Homeटॉप स्टोरीआजही पवारांची मित्रपक्षांवर...

आजही पवारांची मित्रपक्षांवर कुरघोडी! पुन्हा पावसात भिजण्याचा प्रयोग!!

बदलापूर मध्ये घडलेल्या चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यापासून आपल्या मित्रपक्षांवर केलेली कुरघोडी आज शरद पवार यांनी कायम राखली. त्याचप्रमाणे भरपावसात भिजत आंदोलन करून शरद पवार यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत लोकांकडून मिळालेली सहानुभूती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्नही केला.

आज सकाळी अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत, असा एक तास तोंडाला काळी पट्टी लावून तसेच काळे झेंडे घेऊन निषेध करण्याचे आंदोलन काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. हे जाहीर करताना त्यांनी आपण, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी, तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आज सकाळी दहा वाजण्याच्या आधीच शरद पवार यांनी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध आंदोलनाला सुरुवात केली. वयोमानानुसार ते खाली बसू शकले नसले तरी खुर्चीवर मात्र ते स्थानापन्न झाले.

त्यांनी तोंडाला काळा मास्क लावला होता. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या खासदार सुप्रिया सुळे याही त्यावेळी हजर होत्या. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकरही शरद पवार यांच्या बाजूला दिसत होते. मात्र मोहन जोशींनी तोंडाला काळी पट्टी लावल्याचे किंवा तसा मास्क लावल्याचे दिसून आले नाही. किंबहुना तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावण्याऐवजी कपाळावर, डोक्यावर काळी रिबीन लावली होती. काही जणांनी दंडाला काळा पट्ट्या लावल्या होत्या. त्यातच पुण्यात पावसाला सुरुवात झाली आणि भर पावसातच पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवले. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या साडीचा काळा पदर डोक्यावरून घेत पावसातच खुर्चीत बसकण मारली होती. कदाचित मागच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये भरपावसात केलेल्या भाषणाने राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा विजय सोपा केला होता, तसा इम्पॅक्ट यावेळीही होईल का, असा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला असावा, अशी चर्चा तेथे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

शपथपत्राचे वाचन करत शरद पवारांनी ११ वाजून पाच मिनिटांनी आंदोलन संपवले आणि त्यांचा ताफा रवानाही झाला. मात्र, तोपर्यंत ना उद्धव ठाकरे आपल्या आंदोलनस्थळी पोहोचले, ना नाना पटोले. साडेअकरा वाजोपर्यंततरी त्यांच्या नियोजित आंदोलनस्थळी त्यांचे समर्थकच आपल्या नेत्यासाठी ताटकळत होते.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content