फार पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फार बोजड असत आणि त्यामुळे ती सहजपणे हातात मावत नव्हती. त्यानंतर १९६०च्या दशकात हातात वागवण्यासारख्या स्वरुपात ट्रांझिस्टर नावाचे एक उपकरण बाजारात आले. त्यापूर्वी रेडिओ म्हणजे घरच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवून त्यावर कार्यक्रम ऐकता येत असत. त्यावेळच्या काही उपकरणांमध्ये सोन्याचे काही भाग असायचे. पण ते एकतर अगदी पातळ अशा उत्तम विद्युतवाहक आवरणाच्या स्वरूपात असत. त्यानंतर आलेल्या मोबाईलमध्येदेखील काहीसे सोने असावे लागायचे. पण ते अतिशय कमी प्रमाणात असते. मात्र संगणक आणि त्याचे सुटे भाग यामध्ये मात्र सोने विविध सुट्या भागांच्या निर्मितीत वापरले जाते. असे थोडे, थोडे करताकरता जागतिक पातळीवर आज जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाकाऊ म्हणून उपयोगातून बाहेर फेकली जातात त्यांची माहिती घेतली तर डोके चक्रावून जाईल. आज जगात सर्वाधिक अधिक कोणती टाकाऊ वस्तू असेल तर ती इलेक्ट्रॉनिक आहे.
२०२२, या एका वर्षात जागतिक पातळीवर ६ कोटी २० लाख मेट्रिक टन इतक्या इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू निर्माण झाल्या होत्या असे आकडेवारी सांगते. २०१० सालानंतर इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तूंचे प्रमाण दुप्पट झाले ही माहिती गेल्या महिन्यातली आहे. जगात सर्वाधिक प्रमाणात इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू निर्माण होतात, त्या देशाचे नाव चीन असून त्यांची २०२२मधली इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू निर्मिती १ कोटी २० लाख मेट्रिक टन इतकी होती. या क्षेत्रात भारतदेखील मागे नाही. भारत जगातला तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू निर्माण करणारा देश आहे. येथे दरवर्षी इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू निर्मिती २० लाख टन आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांची आयातही केली जाते असे म्हणतात. भारताने २०२२मध्ये ५ लाख २७ हजार मेट्रिक टन इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू जमवून त्यांच्यावर प्रक्रिया केल्याची माहिती नोव्हेंबर २२मधली आहे. भारतातील अशा ७० टक्के टाकाऊ वस्तू विविध उद्योगांकडून मिळतात तर घरगुती वापरात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू १५ टक्के असतात. उर्वरित भाग हा उत्पादक क्षेत्रातून येतो.

इलेक्ट्रॉनिक उद्योगाचा वाढता पसारा पाहून त्यातील टाकाऊ वस्तू रोखीचा ऐवज मिळवून देऊ शकतील आणि जागतिक उलाढालीत या संशोधनाला वेगळे महत्त्व असेल, या कल्पनेतून कोरियामधील कोरिया विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने यावर संशोधन सुरु केले. या टाकाऊ वस्तूंमध्ये उपयोगात आणले गेलेले सोने परत मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार आणि त्यावर प्रयोग सुरु केले गेले. कोरिया हा देश उद्योगी आहे. परंतु त्यांना आवश्यक ते सर्व धातू इतर देशांकडून आयात करावे लागतात. त्यामुळे तयार होणाऱ्या वस्तूंची किंमत वाढते, असे आढळले. त्यातूनच पुनर्चक्रांकित (रिसायकल) करण्याची संकल्पना तयार झाली. कापड उद्योगात उपयोगात येणाऱ्या वस्तूंच्या सहाय्याने प्रयोग करून कोरिया विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणामधील उच्च शुद्धतेचे सोने तसेच इतर धातू मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे जाहीर केले आहे. यात कापड उद्योगातील एक तंतूमय शोषक पदार्थ वापरला जातो. या प्रक्रियेतून निर्माण होणारे सोने शुद्ध तर आहेच परंतु ही प्रक्रिया ९९.९ टक्के कार्यक्षम आहे असेही संस्थेने म्हटले आहे.
या संस्थेच्या प्रक्रियेत टाकाऊ वस्तू विरघळवल्या जातात आणि सोने या धातूचे आयन (ions) प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पॉलीअॅक्रिलोनायट्राईट कापडाच्या धाग्यावर जमा होतात. त्यानंतर त्यांचे एकत्रिकरण होते आणि सोने मिळते. अगोदरच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीत अडीच पटीने सोने अधिक मिळू शकते असे या प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. अशा रीतीने पर्यावरणपूरक पद्धतीतून टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील सोने बाहेर काढता आले तर दागिने स्वस्त होणार नाहीत हे नक्की! कारण, जगात दागिन्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक सोने उद्योग जगतात नेहमीच लागत असते आणि त्यावरच सोन्याचे बाजारभाव ठरत असतात. भारतातील इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तूंचे प्रमाण अगोदरच्या ५ वर्षात ७२.५४ टक्के वाढून २०२३-२४मध्ये १७ लाख ५१ हजार मेट्रिक टन होते. यापैकी केवळ ४३ टक्के रिसायकल केले गेले. भारत हा इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू तयार करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात २०५०पर्यन्त या टाकाऊ वस्तू अंदाजे १६ कोटी टनांवर पोहोचतील असे म्हटले जाते. भारतातील ६५ शहरांमधून ६० टक्के अशा इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू येतात तर १० शहरे ७० टक्के इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तू एकत्र करतात. एकूण काय तर ही सोन्याची नवी खाणच तयार होणार आहे असे दिसते. सध्या समाधान इतकेच की आपल्या घरातही निदान थोडे तरी सोने या वस्तूंच्या माध्यमातून आहे…