मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे २९ एप्रिल ते १ मे, असा तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. ही सर्व नाटके संस्थेच्या पहिल्या मजल्यावरील वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात दररोज सायंकाळी ५.३० वाजता होतील. हा महोत्सव विमल ट्रस्ट व दिलीप काटदरे यांच्या सहयोगाने साजरा होत आहे.

शुक्रवार, दि. २९ एप्रिल रोजी रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ निर्मित पं. विद्याधर ओक लिखित आणि मनोहर जोशी दिग्दर्शित ‘संगीत ताजमहाल’ ही नाटके होणार आहेत. या नाटकाला महाराष्ट्र राज्य संगीत नाट्यस्पर्धेत वर्ष २०२०चा प्रथम पुरस्कार आणि वैयक्तिक दहा पुरस्कार लाभले आहेत.
शनिवार, दि. ३० एप्रिल रोजी ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट, पुणे’ निर्मित आणि अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत सौभद्र’ हे नाटक होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन दीप्ती भोगले यांचे असून संगीत मार्गदर्शन कीर्ती शिलेदार यांचे आहे.

रविवार, दि. १ मे रोजी साहित्य संघ निर्मित आणि पं. अरविंद पिळगावकर दिग्दर्शित ‘संगीत धाडिला राम तिने का वनी..’ हे नाटक सादर होणार आहे. भास यांनी लिहिलेल्या मूळ संस्कृत नाटकाचा स्वैर अनुवाद द. ग. गोडसे यांनी केला आहे. या नाटकाला २०२२ सालच्या राज्य नाट्य स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले असून अभिनय व गायनाची पाच पारितोषिके मिळाली आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:०२२-२४३०४१५०

