महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत राज्यातली अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये 24 ते 26 एप्रिलदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एकूण 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. या तीन दिवसांमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक 121, कोकण परिक्षेत्रात 117, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात 92 तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत 53 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या वीजचोरीप्रकरणी अंदाजे 3 कोटी 50 लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असून पुढील कार्यवाही चालू आहे.
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) सुमित कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.