Homeब्लॅक अँड व्हाईट१७५३ शेतकऱ्यांना दिवसा...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात झाला. या प्रकल्पामुळे १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प आहे. धोंदलगाव प्रकल्प ही सुरुवात आहे. यावर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या ९२०० मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांचा हा एक भाग आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

धोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या १३ एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कामासाठी महावितरणकडून संबंधित कंपनीला ७ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला. १७ मे रोजी वीजखरेदी करार करण्‍यात आला.

वीजपुरवठा

त्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यांत प्रकल्प उभारून ५ सप्टेंबरला तो कार्यान्वित करण्यात आला. हा प्रकल्प महाविरणच्या धोंदलगाव ३३ केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या ५ वीजवाहिन्यांवरील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

फडणवीस यांनी ३० जून २०२२ रोजी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर किमान तीस टक्के कृषी फीडर्स डिसेंबर २०२५पर्यंत सौरऊर्जेवर चालविण्यासाठी मिशन २०२५ जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. मिशन मोडवरील या योजनेतून सौरऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट ७ हजार मेगावॅटने वाढवून १६ हजार मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषी पंप चालवायचे अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content