मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेले छप्परफाड भाषण म्हणजे अपघात नव्हता, हे सोमवारी विधानसभेत सिद्ध केले. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याची सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकाच्या चर्चेला उत्तर देताना शिन्दे यांनी चौदा ते पंधरा मिनिटांच्या भाषणात विरोधकांची दाणादाण उडवली.
हे विधेयक म्हणजे लोकशाहीचा खून आहे, गोरगरीब माणूस थेट जनतेतून निवडून येऊ शकत नाही, धनदांडगे लोकांवर प्रभाव टाकू शकतात, मसल पॉवर, मनी पॉवरमुळे लोकशाहीच्या विरोधात हे विधेयक आहे, असे मुद्दे विरोधकांनी मांडले होते. त्याला चोख उत्तर देताना शिन्दे यांनी अनुक्रमे जितेन्द्र आव्हाड, छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे या सर्वांना गप्पगार केले.
दादागिरी करणं किंवा पैशाचा प्रभाव घोडेबाजार छोट्या भागात होऊ शकतं, असं सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले, ही गोष्ट संपूर्ण शहरात होऊ शकत नाही. आव्हाडसाहेब मुंब्र्यामध्ये फार तर दोन-तीन वॉर्डात तुम्ही हे करू शकता पण ठाणे जिल्हा खूप मोठा आहे आणि मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, त्यामुळे मी हे सांगू शकतो. शिन्दे यांच्या या टिप्पणीवर संपूर्ण सत्ताधारी सदस्यांनी दाद दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये मी भुजबळसाहेब आणि अजितदादा पवार या दोघांच्या मध्ये बसायचो, याचा उल्लेख भुजबळसाहेबांनी केला, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, त्यामुळेच भुजबळसाहेब काळजीपोटी मला कायम विचारायचे. काय एकनाथ सर्व काही ठीक आहे ना, तर मी त्यावर सर्व ओक्के आहे आणि ओक्केच होणार असे सांगायचो. सगळं ओक्के होणार, याची अजितदादांनाही कल्पना होती, अशी पुस्तीही मुख्यमंत्री शिन्देंनी जोडली आणि संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

महाविकास आघाडी सरकारमधले नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही विधेयकाला विरोध करणारे भाषण केले होते. ते करताना त्यांनी एकनाथ शिन्देच विभागाचे मंत्री असल्याने त्यांची काम करण्याची स्टाइल मला माहिती आहे आणि ते न बोलता काम करणारे मंत्री आहेत, असा गौरव त्यांनी केला होता. त्याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्र्यांमधले सर्वात जास्त अधिकार देण्यात आलेले मंत्री होते आणि मी त्यांना अधिकार दिले कारण जयंतरावांनीच मला सांगितले होते. मुख्यमंत्री शिन्दे यांच्या या टिप्पणीवरही सभागृह हास्यकल्लोळात बुडाले कारण प्राजक्त तनपुरे जयंत पाटील यांचे भाचे आहेत आणि आपण सांगितलेले एकनाथ शिन्दे कायम ऐकायचे, असे जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले होते.
नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करायची तर मुख्यमंत्रीपद जनतेतून का निवडत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यावर शिन्दे म्हणाले की, नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचे नियम करण्याचा अधिकार भारतीय घटनेनेच राज्यांना दिलेला आहे. पण मुख्यमंत्रीपदाची निवड कशी व्हावी, हे भारतीय घटनेने ठरवलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री थेट जनतेतून निवडण्याचे सुचवताना अजितदादा पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच बदलायचीय का काय…. असा सवाल मुख्यमंत्री शिन्दे यांनी करताच अजित पवार यांनी बसल्या जागेवरूनच त्यांना हात जोडले आणि विधेयक मंजुरीला टाका बाबा…, असे सुचवले.
त्यावर अजित पवारांना आणखी एक टोला हाणत मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले, माझ्या क्षमतेवर काही जणांनी प्रश्नचिन्ह लावलं पण मी इतका सक्षम नसतो तर इतका मोठा कार्यक्रम म्हणजे करेक्ट कार्यक्रम करू शकलो असतो का… अजितदादा, अहो, माजी मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) तुमचं ऐकत होते म्हणून आमचं ऐकत नव्हते. त्यामुळे तर करेक्ट कार्यक्रम झालाय.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेचा प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, ताट वाटी आणि चलो गुवाहाटी अशा घोषणा विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या गेल्या. त्यात मुंडेसाहेब तुमचा आवाज खूप मोठा होता. तो मी टीव्हीवरून ऐकला. पण मुंडेसाहेब तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. तुम्ही इतक्या जोरात ओरडत होतात की जणू काही तुम्ही खूप वर्षे शिवसैनिक आहात. तुम्हाला माहीत आहे ना… देवेन्द्रजींनी तुमच्यावर प्रेम, दया, करुणा दाखवली ते. करुणा शर्मा यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते, या संदर्भाचा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टिप्पणीमुळे संपूर्ण सभागृह पुन्हा एकदा हास्यकल्लोळात बुडाले. शिन्दे यांनी आणखी बोलण्यासारखे खूप आहे आणि बोलू का… असे विचारत आपले भाषण संपवले आणि विरोधकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

