स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक काल जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2023साठी 53 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’ आणि एका जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 8 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 41 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना पदके
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘अग्नि सेवा, नागरी सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालय’ यांच्याद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केली आहेत. त्यात मुंबई अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक घोष, दुय्यम अधिकारी सुनील गायकवाड, प्रमुख अग्निशामक पराग दळवी, अग्निशामक तातू परब यांचा समावेश आहे.

प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर गेले ३० वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्यांना यापूर्वी राष्ट्रपतींचे शौर्य पदक, आयुक्तांचे अतुलनीय शौर्य पदक आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक घोष हेदेखील गेली ३० वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्यांना यापूर्वी राष्ट्रपतींचे शौर्य पदक, आयुक्तांच्या अतुलनीय शौर्य पदकाने गौरविण्यात आले आहे. घोष यांनी ‘फायर इंजिनीअरींग’ या विषयात इंग्लंड येथील विदयापीठातून पी.एचडी. पदवी प्राप्त केली आहे. ‘आयर्नमॅन’ किताब पटकाविणारे ते भारतीय अग्निशमन सेवेतील एकमेव अधिकारी आहेत. जागतिक अग्नि स्पर्धेत (वर्ल्ड फायर गेम) सहभागी होऊन त्यांनी भारतासाठी ७ पदके पटकाविण्याची कामगिरीदेखील केली आहे.

शहर भागातील मेमनवाडा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी (सब ऑफिसर) सुनील गायकवाड गेली ३२ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्यांना उत्कृष्ट अग्निशामक पारितोषिकाने यापूर्वी दोनवेळा गौरविण्यात आले आहे. भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) पराग दळवी गेली ३१ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्यांना खात्याअंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. अग्निशामक (फायरमन) तातू परब सध्या विक्रेाळी अग्निश्मन केंद्रात कार्यरत असून त्यांनी मुंबई अग्निशमन दलात ३२ वर्षे सेवा बजाविली आहे. त्यांनादेखील खात्याअंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त करीमखान पठाण, फायर इंजिन चालक करीमखान पठाण, फायरमन कसाप्पा माने, रुग्णवाहिका परिचर (आग) नरसिंह पटेल, यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निसेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

गृहरक्षक, नागरी संरक्षण पदकांचीही घोषणा
देशातील 48 कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 05 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 43 कर्मचारी / स्वयंसेवकांना जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक
1. तुषार वरंडे, सेंटर कमांडर (एचजी)
2. अय्युबखान पठाण, ऑफिसर कमांडिंग (HG)
3. राजेंद्र शहाकर, होमगार्ड
4. सुधाकर सूर्यवंशी, नागरी संरक्षणाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक (सीडी) 5. विजय झावरे, फायर रेस्क्यू लीडर (नागरी संरक्षण)

