पशुधनाच्या मृत्यूनंतर मिळणारी नुकसानभरपाई मागच्या सरकारच्या तुलनेत वाढवण्यात आली आहे, हे सांगताना ही लक्षवेधी सूचना संपल्यावर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे फाइल सहीसाठी देणार आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही सही केलेली आहे. तुम्हीही करा आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊ म्हणजे नुकसानभरपाई आणखी वाढवता येईल. त्यावर विरोधी पक्षातील सदस्यांनी मुनगंटीवार यांच्या रांगेतच शेजारी बसलेल्या अजित पवारांकडे अंगुलीनिर्देश करत फाईल आताच द्या, असे सुचवले. त्यावर मुनगंटीवार यांनी फाईल अजित पवार यांच्याकडे देत उत्तर सुरू ठेवले.
अनिल देशमुख यांना उद्देशून मुनगंटीवार म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये तुम्ही सहभागी होता. त्या सरकारच्या अनेक पटींनी भरपाई वाढवली आहे. त्यावर वर्षा गायकवाड यांनी अजित पवारांकडे बोट दाखवले आणि तेही मागच्या सरकारमध्ये होते, हे सुचवले. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, वर्षाताई तुम्हीही इकडच्या बाजूला या… अनिल देशमुख यांना उद्देशून मुनगंटीवार म्हणाले की, तुम्हीही निर्णय घ्या. अजितदादा इकडच्या बाजूला आले, तुम्हीही या…
वर्षाताईंना उद्देशून मुनगंटीवार त्यांचे नाव घेत म्हणाले की, वर्षाताई तुम्हीही या बाजूला या. तुम्ही येत असाल तर मी लगेच मागे जाऊन पाचव्या रांगेत बसायला तयार आहे. त्यावर नाना पटोले काहीसे चिडून म्हणाले की, आम्ही त्या बाजूला येणार नाही. पण तुम्हालाच या बाजूला यावे लागेल. त्यावर काही भाजपा सदस्यांनी नाना पटोलेंना उद्देशून तुम्हाला घेणारही नाही, अशा घोषणा दिल्या. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही पंधरा वर्षे त्या बाजूलाच होतो आणि त्यामुळे आम्हाला त्याचे विशेष नाही.

