राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेंनी अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतात. पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही. भाजपाला संभाजी भिडेंच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींच्या फक्त मुसक्या आवळून चालणार नाही तर अशांना फाशी लावली पाहिजे असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेंना फाशी देणार का? हा सवाल आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातही संभाजी भिडेंचा हात होता. पण अजून ते मोकाटच आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडेंवर एवढे मेहरबान का आहे? संभाजी भिडे, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वांना माहित आहेत. भारतीय जनता पक्षाने भिडे संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी.

मुजोर संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी काँग्रेसने अधिवेशनात लावून धरली आहे. राज्य सरकारने भिडेंना अटक करुन कडक शिक्षा ठोठावण्याची काँग्रेस प्रतिक्षा करत आहे. अधिवेशनाला चार दिवसांची सुट्टी आहे. पण कारवाई झाली नाहीतर सुट्टीनंतर अधिवेशनात काँग्रेस संभाजी भिडेप्रश्नी सरकारला धारेवर धरेल. जोपर्यंत संभाजी भिडेंना अटक करुन कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.
काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा संभाजी भिडेंनी अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसने राज्यभर तीव्र आंदोलन केले. ठिकठिकाणी संभाजी भिडेंचा पुतळा जाळून व प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. धुळ्यात प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे, सातारा, शिंदेवाही, बुलढाणा, यवतमाळ, मोताळा, जळगाव जामोदसह राज्यभर आंदोलन करण्यात आले

