सद्गुरू अडाणेश्वरांचा भक्त परिवार म्हणून ओळखण्यात येणाऱ्या “अनाम प्रेम” परिवारातर्फे या दिवाळीत १५ हजार सैनिकांना फराळ पाठविण्यात आला आहे. मुंबईतल्या मालाड येथील कोळी समाज सभागृहात फराळ तयार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
आपल्या परिवारापासून दूर असलेले सैनिक प्राणांची बाजी लावून देशासाठी लढतात, बलिदान करतात याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लेह, लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू- काश्मीर, पंजाब-अमृतसर या सीमावर्ती भागात फराळ पाठविण्यात आला आहे. काही ठिकाणी नाविक दल आणि हवाई दलाच्या सैनिकांनाही हा फराळ पाठविण्यात आला आहे.
सीमेवरील सैनिकांना फराळ पाठविण्याचे हे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. केवळ सैनिकच नव्हे तर पोलीस, बेस्टचे वाहक-चालक, अनाथ मुले, देहविक्रय करणार्या निराधार महिला, रुग्णालयातील परिचारिका अशा विविध वर्गातील कर्मचार्यांना “अनाम प्रेम”चे प्रेम लाभले आहे.
“प्रेम शिंपित जा” या बोधवाक्याला अनुसरून परिवाराचे सर्व कार्यकर्ते मुंबई-महाराष्ट्राच्या विविध भागात हे कार्य करीत असतात. गेल्या वीस वर्षांपासून हे कार्य सुरू आहे, आणि यापुढेही असेच सुरू राहणार आहे, अशी माहिती “अनाम प्रेम” च्या हिमा नगरे (भ्रमणध्वनी – ९८७००९०९९४) यांनी दिली.