Friday, November 22, 2024
Homeमाय व्हॉईसपवारांना विचारून केली...

पवारांना विचारून केली का ही काळी कमाई?

भर्तृहरी आपल्या नीतीशतकात लिहितो की काही सज्जन सत्पुरुष असतात, ते आपला स्वार्थ सोडून केवळ दुसऱ्याच्या हितासाठी धडपड करीत असतात. दुसऱ्या प्रकारात सामान्य लोक असतात, जे आपला स्वार्थ बुडणार नसेल तर इतरांना मदत करायला तयार असतात. तिसऱ्या प्रकारातले आपल्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करतात म्हणजे इतरांना छळून, लुटून, लुबाडून, ओरबाडून स्वतःचा स्वार्थ साधतात, काळी कमाई करतात. या लोकांना त्याने मानव राक्षस म्हटले आहे.

चौथ्या प्रकाराला काय नाव द्यावे त्यालाच प्रश्न पडलेला आहे. अशी माणसे जी कारण नसताना इतरांना सतत छळतात. मानसिक पिळवणूक करतात. ज्यात त्यांचा काहीही, कोणताही फायदा नसतो. केवळ इतरांना छळण्याचा त्रास देण्याचा, त्यांचे मनःस्वास्थ्य बिघडवण्याचा, अस्थिर करण्याचा अशांना विकृत आनंद मिळत असतो.

मित्रहो, केवळ आपल्या या राज्याचा आज विचार केला तर पहिल्या प्रकारातली माणसे शोधावी लागतात आणि तिसऱ्या तसेच चौथ्या प्रकारातली माणसे जागोजाग बघायला, अनुभवायला मिळतात. जागोजाग सापडतात म्हणजे अशी विकृत, विक्षिप्त, वेडी, वाह्यात पण वरचढ ठरणारी ठरलेली माणसे तुम्हाला, आम्हाला, आपल्या कुटुंबात, नातलगात, गावात, शेजारी, नोकरीत, समाजात, राजकारणात, थोडक्यात विविध रूपात जागोजाग पाहायला मिळतात. भर्तृहरीचे हे नीतीशतक मला येथे तुरुंगाच्या दारात उभ्या असलेल्या अनिल देशमुख आणि देशमुख कुटुंबावरून आठवले.

अनिल देशमुख तर माझे हे लिखाण जुने होईस्तो गजाआड असतीलच, पण अद्याप काही ईडीच्या नजरेआड आहेत. तेही गजाआड व्हावे म्हणून हे लिखाण.. लढणे केवळ माझ्या हातात असते. यश किंवा अपयश याचा विचार करायचा नसतो. मित्रहो, तुम्ही फार काही करू नका, अगदी सोप्या भाषेतले भर्तृहरीचे नीतीशतक किंवा चक्रधर स्वामींच्या कथा व उपदेश वाचा म्हणजे जीवनाचे नेमके सार अगदी सहज त्यांच्या लिखाणातून समजते..

१९९५मध्ये शिवसेना-भाजपा व अपक्ष आमदारांचे म्हणजे युतीचे सरकार सत्तेत आले आणि काटोल विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी त्यांना राजकारणात आणले त्या भावाला म्हणजे रणजित देशमुख यांना कोपऱ्यात ढकलून ते अपक्ष आमदार झाले. तत्पूर्वी याच रणजित देशमुख यांनी अनिलबाबू यांना व्यवसायातून राजकारणात आणले आणि नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. तेव्हापासूनच अनिलबाबू समोर दिसणाऱ्या शासकीय संपत्तीवर डल्ला मारायला लागले, अशी वदंता आहे.

जेव्हा केव्हा अनिलबाबूंच्या पापांचा पाढा वाचला जाईल तेव्हा सर्वात आधी, आपण शाळेत असताना जी कथा वाचलेली आहे, त्या पद्धतीने अनिलबाबू यांच्या पत्नी त्यांच्या कानाचा नक्की चावा घेतील. कारण त्यांनी वेळीच जर वाम मार्गाकडे झुकणाऱ्या नवऱ्याला आवर घातला असता तर आज त्यांच्या पापांचे पाढे भर बाजारात वाचावे लागले नसते. तुम्हाला काय वाटते? हे असे लिहितांना मला विकृत आनंद होतोय? नाय, नो.. नेव्हर.. कारण अनिलबाबू माझे आवडते, जवळचे मित्र. त्यांना वारंवार सांगून, बजावूनदेखील त्यांनी कधी माझे ऐकलेच नाही.

काळी कमाई

मंत्री असताना कायम त्यांनी आपल्या खाजगी सचिवांना हाताशी धरून, या नेत्याने आणि स्टाफने अवाढव्य, अमापसमाप संपत्ती जमा केली. म्हणून अनिलबाबूंची चौकशी ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष्य होते तेव्हापासून करायला हवी. वाटल्यास अनेकांचे पुरावे मी देतो. हिंदी सिनेमातले डाकू आणि अनिलबाबू छाप नेते, मंत्री यांच्यात कमालीचे साम्य असते. म्हणजे स्वतःचा तेव्हढा मतदारसंघ सांभाळायचा. त्यावर थोडासा खर्च करायचा. निवडून यायचे आणि देशाला लुटायचे, हे यांचे काम. संजीव पलांडेसारखे अधिकारी तर अख्खी काळी कमाई स्वतःच्या घरी न्यायचे कारण त्यांना काहीही खर्च नसतो. सारे काही फुकटात मिळत असते. वाचकमित्रहो, काळजी करू नका. कारण अमापसमाप काळी कमाई करणाऱ्या प्रत्येकाचा कळतनकळत संजीव पलांडे, अनिल देशमुख एक दिवस नक्की होत असतो..

हेच अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असताना एक मोस्ट करप्ट सरकारी अधिकारी त्यांचा खाजगी सचिव होता. त्यानंतर तो केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाही खाजगी सचिव होता. पण दानवेंना त्याचे नेमके धंदे कळले. त्यांनी त्याला लगेच काढून टाकले. महाआघाडी सरकारात केवळ नशिबाने म्हणजे राष्ट्रवादीत आपापसात मोठी स्पर्धा असल्याने अजिबात कुवत नसलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे शरद पवारांनी चुकून गृहखाते सुपूर्द केले. वास्तविक छगन भुजबळ यांचे याच खात्यामुळे तुरुंगात जाणे अनिलबाबू यांना माहित असूनही ते खाण्यात आणि वागण्यात त्यांच्याही पुढे गेले. ते गृहमंत्री झाले आणि त्याचदरम्यान सरकारी सेवेतून निवृत्त झालेला हा भामटा अधिकारी पुन्हा अनिलबाबूंच्या कार्यालयात हजर झाला.

विशेष म्हणजे कायद्यात अजिबात बसत नसताना त्याला चक्क सायरन असणारी मारुती अर्टिगा कार देण्यात आली. त्यात बसून हाच अधिकारी विविध ठिकाणाहून अनिलबाबूंसाठी व स्वतःसाठी पैशांची वसुली करीत असे आणि संजीव पलांडे यांच्या वसुलीचे काम अनिलबाबू यांच्या कार्यालयातील आणखी एक व्यक्ती करीत असे. या व्यक्तीच्या शंभर कोटींच्या मालमत्तेचे पुरावे मी ईडीकडे लवकरच सादर करणार आहे. त्याशिवाय पैशांची वसुली करणारे आणखी दोघे ईडीच्या नजरेतून सुटले आहेत ज्यांना संजीव पलांडे, अनिल देशमुख आदींचे काळे कारनामे तंतोतंत माहित आहेत. ते दोघे आहेत अनिलबाबू यांच्या कार्यालयातलेच आहेत.

त्याशिवाय या पापात सामील असलेल्या त्यांच्या नागपुरातील काही मित्रांवर याआधीच ईडीने धाडी घातलेल्या आहेत. अनिलबाबूंच्या कार्यालयातल्या या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केल्यास आणखी मोठे घबाड त्यातून बाहेर येईल. आणखी काही गंभीर पुरावे त्यातून सापडतील. झटपट श्रीमंत होण्याच्या वृत्तीतून अनिल देशमुख यांच्यासारखे नेते अडचणीत येत असतात. आज भुजबळ किंवा देशमुख आटोपले. उद्या असे अनेक नेते, दलाल व अधिकारी नक्की सापडतील, अडकतील.

अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आधी जे भुजबळ खाजगीत सांगायचे तेच आज अनिलबाबू सांगत सुटले आहेत- शरद पवार या संकटात आमच्या पाठीशी हवे तसे उभे नाहीत. तुम्हाला काय शरद पवार यांनी सांगितले होते काळी कमाई करायला? कधीच नाही. याउलट शरद पवार यांना अंधारात ठेवून तुम्ही सारे लुच्चे, लफंगे नेते हे असे काळे धन मिळवून मोकळे होता. का म्हणून पवारांनी आपले वजन खर्च करावे आणि तुम्हाला या केलेल्या पापातून बाहेर काढावे?

2 COMMENTS

  1. सुरेखच म्हणायला हवे.
    पण उडदामाजी काळे गोरे कोण ठरवनार?आर. आर. भले सज्जन होते पण त्यांच्या नावाने चरलेले काय कमी असतील?

Comments are closed.

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...
Skip to content