Homeकल्चर +‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या ‘ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘माळ’ ही केवळ ओसाड जागेची प्रतिमा नसून, मनातील रिकामेपणाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या वाचनातून प्रभावीपणे उलगडले. मास्तर आणि काशीताई यांसारख्या व्यक्तिरेखा जणू रंगमंचावर सजीव झाल्याचा भास रसिकांना झाला. उपस्थितांनी या वाचनाला उत्स्फूर्त दाद दिली.

यानंतर ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचे वितरण करण्यात आले. पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले यांना ‘ध्यास सन्मान’ प्रदान करण्यात आला, तर प्रख्यात लेखक व भाष्यकार सुरेश गोसावी यांना ‘रंगकर्मी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मान स्वीकारताना शुभांगी दामले यांनी सांगितले की, नाट्यदर्पण रजनीकार सुधीर दामले यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याची दिशा मिळाली आणि इतरांना संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातून आपली वाटचाल घडली. तर सुरेश गोसावी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “आजपर्यंत लिहिले खूप, पण बोलण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला. बाजूस पडलेल्या दगडाला मोठेपण द्यायचा आज उत्सव आहे. नमस्कार..”

याप्रसंगी निलेश जाधव यांनी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना स्वतः तयार केलेल्या विठोबाच्या तैलचित्राची आकर्षक फोटोफ्रेम भेट दिली. तसेच त्यांना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा उदात्त निर्णय घेत, पेण येथील दिव्यांग मुलांसाठी कार्यरत ‘सुहित जीवन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेखा पाटील यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘ॲड फिझ’ निर्मित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल पुस्तकाची झलकही सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी ‘रंग विठ्ठल’ हा खास ‘चैत्र चाहूल’साठी सादर केलेला अभंग रसिकांसमोर सादर केला. त्यांच्या सुरेल गायनाला तबल्यावर यती भागवत, संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्यावर सूर्यकांत सुर्वे, पखवाजवर हनुमंत रावडे, बासरीवर अमर ओक तसेच स्वरसाथीसाठी निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे आणि स्वराली जोशी यांनी समर्थ साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content