बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणानंतर पकडण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळचे संबंध असल्याच्या आरोपावरून आज अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या भगिनी व महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्याचे संकेत दिले आहेत.

पंकजाताई धनंजय मुंडेंच्या चुलत भगिनी असून गेल्या कित्येक वर्षांपासून बीड जिल्ह्यावर मुंडे परिवाराचेच वर्चस्व राहिले आहे. सुरूवातीला गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा तसेच धनंजय मुंडे यांच्याभोवती बीडचे राजकारण तसेच सत्ताकारण फिरत राहिले आहे. जनतेच्या मनातली मुख्यमंत्री म्हणून २०१४ साली महाराष्ट्रात फिरणाऱ्या पंकजाताई आजही बीडचे पालकमंत्री मिळाले नाही म्हणून अस्वस्थ आहेत. बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर मला आनंद झाला असता. पण ठीक आहे. जालन्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. तेथील जनतेला कसा न्याय मिळेल हे मी पाहीन, अशा भावना त्यांनी जालन्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या होत्या.

गेल्या ९ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्मम हत्त्या झाली. या हत्त्याप्रकरणी पोलिसांनी धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी वाल्मीक कराड यांच्यासह सहा आरोपींना (सुदर्श घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, सुधीर सांगळे) अटक केली असून त्यांच्या विरोधात मकोकाअंतर्गत कारवाई सुरू आहे. कृष्णा आंधळे हा आणखी एक आरोपी फरार आहे. या सर्व आरोपींना इतकी हिंमत, इतकी ताकद धनंजय मुंडेंमुळेच मिळाली. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते तेव्हापासून वाल्मीक कराड बीडचा डमी पालकमंत्री म्हणूनच वावरत होता. त्याच्याच इशाऱ्यावरून बीड जिल्ह्यात अंधाधूंद गुंडाराज चालू होते. त्यामुळे देशमुख यांच्या हत्त्येचा तपास निपक्षपातीपणे करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती.

आवादा कंपनीकडून बीडमध्ये पवनचक्की योजना राबविली जात आहे. या कंपनीकडून खंडणी मागितली जात होती. याला सरपंच संतोष देशमुख यांनी विरोध केला होता. त्यामुळे त्यांची निर्मम हत्त्या करण्यात आली, असा आरोप झाला. ही खंडणी उकळण्याचे काम वाल्मीक कराडकडून केले जात होते. याच टोळीने सरपंच देशमुख यांचा काटा काढला. यासंदर्भामध्ये पोलिसांनी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असली तरीही त्यामागचा बोलविता धनी धनंजय मुंडेच आहे असे सांगत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर रान उठवले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची थेट मागणी न करता त्यांनी ‘आकाचा आका’ असा शब्दप्रयोग रूढ करून मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियमितपणे भेट घेऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला.

काल या प्रकरणाचे आरोपपत्र फास्टट्रॅक कोर्टामध्ये दाखल झाले. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना ज्या क्रूरतेने मारण्यात आले त्याचे काही व्हिडिओज जोडण्यात आले. हे व्हिडिओ आरोपींकडून सापडलेल्या तीन मोबाईलमध्ये आढळून आले. प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्या आरोपींनी हे व्हिडिओ वाल्मीक कराड यांना लाईव्ह दाखवले होते, असा पोलिसांचा आरोप आहे. वाल्मीक कराड ही धनंजय मुंडेंची सावली मानली जाते. त्यामुळे काल रात्री जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची एकच लाट उसळली. सध्या मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे तेथील कामकाजावर याचा परिणाम होईल. विरोधकांना आयते कोलीत मिळेल हे ओळखून काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे तसेच अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेही तेथे उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये साधारण दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री तिथून निघाले. या चर्चेमध्येच मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचे समजते.

आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांनी आपल्या सातपुडा, या शासकीय निवासस्थानी कोणाची भेट घेण्यास नकार दिला. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचे एक पीए मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सागर, या निवासस्थानी रवाना झाले. तेथे त्यांनी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला. दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे एक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केले. तितक्यात मुख्यमंत्री विधानभवनाच्या प्रांगणात दाखल झाले. तेथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मुंडेंनी राजीनामा दिल्याचे तसेच आपण तो स्वीकारून राज्यपालांकडे पुढच्या कार्यवाहीकरीता पाठवल्याचे सांगितले.

त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने मुंडे यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. काल त्यांच्या मारहाणीचे फोटो बघून मी व्यथित झालो. तसेच आजारी असल्यामुळे येत्या काही काळात मला वैद्यकीय उपचारही करवून घ्यायचे असल्याने मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे मुंडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात हे प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस प्रसिद्धीमाध्यमांची भरभरून बोलले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांच्यासोबत मस्साजोगपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चर्मकार समाजाच्या एका व्यक्तीची अशाच पद्धतीने हत्त्या झाली होती, त्यासंदर्भातले पुरावे गोळा करणार आहोत. १६ महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची अशाचप्रकारे निर्घृण हत्त्या झाली. अत्यंत बीभत्स पद्धतीने त्यांचा खून करण्यात आला. यासंदर्भातही आपण पुढाकार घेणार आहोत, असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर मुंडे पदावर राहिलेत काय की नाही, त्यांना एका प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. सातपुडा निवासस्थानी आवादाकडून खंडणी उकळण्याबाबत वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांबरोबर कट शिजला की नाही?, असे ते म्हणाले.

वाल्मीक कराड याची तुरुंगात कशी बडदास्त राखली जाते याचे तेरा मुद्दे आपल्याजवळ आहेत. हे सर्व मुद्दे आपण मांडणार आहोत, असेही ते म्हणाले. पंकजा मुंडे यांनी या विषयावर अजूनही कोणत्याही भाष्य केलेले नाही याकडे माध्यमांनी लक्ष वेधल्यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, आता पंकजाताई फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे पर्यावरण हा जागतिक विषय आहे. आता त्यांना बीडबद्दल प्रश्न विचारता कामा नये. त्याचे त्यांना काही सोयरसूतक राहिलेले नाही. राज्याबद्दल, देशाबद्दलही प्रश्न विचारण्याची गरज नाही. त्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ट्रम्प, पुतीन, बायडन, गाजा पट्टी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामानबदल असे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत. अशी उपहासात्मक टीकाटिप्पणी केल्यानंतरही धस थांबले नाहीत. पंकजाताईंनी आतातरी संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करावी. ही व्यक्ती आपल्या पक्षाची कार्यकर्ता होती. तुमच्या निवडणुकीत ते बूथप्रमुख राहिले आहेत. त्यांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडले तर कसे चालेल? देशमुख हत्त्याप्रकरणातल्या सर्व आरोपींचे पंकजाताईंबरोबर फोटो आहेत. पण म्हणून त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे, असे आपण बोलणार नाही. पण आपले अवतारी कार्य यापुढेही सुरू राहील, असे सांगत धस यांनी सूचित केले की, आता धनंजय मुंडे यांचा अध्याय संपत आला आहे आणि यापुढचे टारगेट पंकजा मुंडे राहतील.
सगळेच महाभयंकर आहे.