मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा! एक मे एकोणीसशे साठ या दिवशी एकशे सहा बहाद्दरांनी आपल्या प्राणांची ‘आहुति’ देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे आंदोलन उभे राहिले होते. एसेम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, भाई डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, शाहिर अमरशेख आदी लढवय्या नेत्यांच्या आंदोलनानंतर केंद्रातले तेव्हाचे नेहरू सरकार नरमले आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला. अर्थात, विधानसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने अभूतपूर्व यश मिळवीत काँग्रेसची धुळधाण उडवली.
मध्य प्रदेशातला मराठी भाषिक भाग असलेला विदर्भ आणि त्यात विधानसभेच्या असलेल्या ६२ जागा काँग्रेसला खुणावू लागल्या होत्या. कारण त्या ६२ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या आणि त्या जर महाराष्ट्रात आल्या तर काँग्रेसचं वर्चस्व कायम राहील. आणि मग मध्य प्रदेशाची राजधानी असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी झाली. नागपूर करार झाला. विदर्भ महाराष्ट्रात आला. विदर्भ आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन मराठवाडाही आपल्यात आला.
त्यापूर्वी म्हणजे १९३७ साली बॉम्बे प्रोविन्सो अर्थात मुंबई इलाखा अस्तित्त्वात होता. सर धनजीशा कूपर हे १९३७ साली मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना पंतप्रधान म्हणून संबोधण्यात येत होते. १९ जुलै १९३७ रोजी बाळ गंगाधर खेर हे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री झाले. १९ जुलै १९३७ ते ४ नोव्हेंबर १९३९ आणि ३ एप्रिल १९४६ ते १६ एप्रिल १९५२ या कालावधीत खेर यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द केली. १७ एप्रिल १९५२ ते ३१ ऑक्टोबर १९५६ या कालावधीत कर्मठ प्रशासक असलेल्या मोरारजी देसाई यांनी बॉम्बे प्रोविन्सचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटले असताना केंद्राने आणखी डिवचण्यासाठी मुंबई द्विभाषिक राज्याचा घाट घातला आणि त्याचे १ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे सेनानी काही केल्या हटत नाहीत हे पाहिल्यावर दिल्लीने गुडघे टकले आणि १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच संयुक्त महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले.
यशवंतराव हे सुसंस्कृत आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जात. चीनने भारताशी युद्ध छेडले तेव्हा १९६२ साली पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना सन्मानाने बोलावले. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला’, असं वर्णन तेव्हा करण्यात आलं होतं. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची कारकीर्द १ मे १९६० ते २० नोव्हेंबर १९६२ अशी होती. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी यशवंतरावांचे उत्तराधिकारी म्हणून मारोतराव कन्नमवार हे वैदर्भीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मारोतरावांची कारकीर्द अल्पकालीन ठरली. मारोतरावांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे राज्यशकट हाकण्यासाठी ठोस व्यवस्था करणे गरजेचे होते आणि मुख्यमंत्रीपदाचं आसन रिकामं राहणं हेसुद्धा योग्य नव्हतं. म्हणून २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३ या कालावधीत बाळासाहेब सावंत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री झाले.

५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे वसंतराव नाईक यांनी स्वीकारली. विदर्भातले बंजारा समाजाचे वसंतराव महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून पुढे आले. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द मोठी होती. ती आणखीही मोठी झाली असती. पण, पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत आलेलं महाराष्ट्राचं नेतृत्त्व मराठवाड्यालाही मिळावं म्हणून उचल खाल्ली गेली आणि वसंतरावांच्या नेतृत्त्वाला २० फेब्रुवारी १९७५ रोजी पूर्णविराम मिळाला.
मराठवाड्याचे नेते आणि करड्या शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले जाणारे शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची २१ फेब्रुवारी १९७५ रोजी शपथ घेतली पण त्यांचं हे मुख्यमंत्रीपद १६ एप्रिल १९७७ पर्यंतच टिकले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली देशभरात संपूर्ण क्रांतीचे आंदोलन झाले आणि पंतप्रधान इंदिरा गांधींनी २५ जून १९७५ रोजी आणिबाणी लागू केली. सर्व विरोधकांना तुरुंगात डांबलं. त्यातून इंदिराजींना समजावण्यासाठी सरसावलेले मनोहर धारिया, चंद्रशेखर आणि कृष्णकांत हे स्वपक्षीय नेतेही सुटले नाहीत.
देशाच्या राजकारणाचे पडसाद राज्यात उमणार हे ओघानेच आले. शंकररावांच्या जागी सांगलीचे सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा आली. १७ एप्रिल १९७७ला मुख्यमंत्री झालेल्या वसंतदादांना ७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ अशी मुख्यमंत्रीपदाची दुसर्यांदा संधी मिळाली. पण त्यांच्या पाठीत त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या तरुण अशा मंत्र्याने, शरद पवार यांनी खंजीर खुपसला (असा वाक्पप्रचार तेव्हा रुढ झाला होता) आणि जनता पार्टी, शेकाप यांच्याबरोबर मोट बांधून पुरोगामी लोकशाही दल स्थापन करुन वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला. १८ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली पहिले बिगर काँग्रेसी मंत्रिमंडळ अधिकारारुढ झाले.
केंद्रात झालेल्या उलथापालथीमुळे पवारांची राजवट १७ फेब्रुवारी १९८०पर्यंतच टिकली. केंद्रातही आलेले बिगर काँग्रेसी सरकार काहींच्या कपाळकरंटेपणामुळे गमवावे लागले. दुहेरी निष्ठेच्या खडकावर जनता पार्टीची बोट फुटली. ज्या इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत रायबरेलीमध्ये राजनारायण यांनी पराभव केला होता आणि इंदिराजींना सत्तेपासून दूर केले होते, त्याच इंदिराजी नंतर फिनिक्ससारख्या उसळून वर आल्या. महाराष्ट्रात तोवर काँग्रेसचे तुकडे पडले होते. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, बॅ. रामराव आदिक, बॅ. अ. र. अंतुले, बॅ. बाबासाहेब भोसले, नासिकराव तिरपुडे ही मंडळी इंदिराजींसमवेत निष्ठेने राहिली तर यशवंतराव (चड्डी काँग्रेस-चव्हाण-रेड्डी), शंकरराव (मसकाँ) शरद पवार (समांतर काँग्रेस) अशी शकले काँग्रेसची झाली होती. काँग्रेस (इंदिरा)चे अंतुले या धाडसी नेत्याच्या गळ्यात इंदिराजींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. १२ जानेवारी १९८२पर्यंत तुफानी राजवट गाजवणार्या अंतुले यांना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.
एका बॅरिस्टरला पर्याय म्हणून इंदिराजींनी दुसरे बॅरिस्टर शोधले. ते होते विठ्ठलराव गाडगीळ. परंतु त्यांनी विनम्रपणे नकार देऊन दिल्लीतच राहणे पसंत केले. त्यामुळे अंतुलेंचे उत्तराधिकारी म्हणून २० जानेवारी १९८२ रोजी बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. विनोदबुद्धीच्या बॅ. भोसल्यांची कारकीर्द १ फेब्रुवारी १९८३पर्यंतच चालली. काँग्रेसमध्ये सत्तास्पर्धा एव्हाना उफाळून आली होती. काँग्रेसला सत्ता टिकवणं महत्त्वाचं होतं. म्हणून पुन्हा वसंतदादा पाटील यांच्याकडे हायकमांडने नेतृत्त्व सोपवलं. २ फेब्रुवारी १९८३ ते ९ मार्च १९८५ आणि १० मार्च १९८५ ते १ जून १९८५ या कालावधीत दादा मुख्यमंत्रीपदावर होते.

३ जून १९८५ रोजी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. पण वैद्यकीय परीक्षेत मुलीचे गुण वाढवण्याच्या आरोपामुळे निलंगेकरांना ७ मार्च १९८६ रोजी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. निलंगेकरांचे उत्तराधिकारी मराठवाड्याचेच शंकरराव चव्हाण १४ मार्च १९८६ला पुन्हा मुख्यमंत्री झाले. ते २४ जून १९८८पर्यंत या पदावर राहिले. याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडविणारे शरद पवार यांनी यशवंतरावांच्या चुका सुधारून पुढे झेप घेणे पसंत केले आणि राजीव गांधी यांना औरंगाबादेत बोलावून जाहीर मेळाव्यात आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. परिणामी शरदरावांच्या शिरावर २५ जून १९८८ रोजी मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढविण्यात आला.
काँग्रेसतर्फे शरदरावांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद ३ मार्च १९९०पर्यंत तसेच ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ आणि ६ मार्च १९९३ ते १३ मार्च १९९५ असे तीन वेळा उपभोगता आलं. १९९१ साली शरदराव केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री झाले. तेव्हा २५ जून १९९१ रोजी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. सुधाकरराव तर शरदरावांचे डमी आहेत असा आभास निर्माण करण्यात आला. पण २३ फेब्रुवारी १९९३पर्यंत सुधाकररावांनी जी कारकीर्द गाजवली त्यामुळे हा खरा शिकारी आहे, हे सिद्ध झालं. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शरदरावांनी १९९२ची दंगल हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून सुधाकररावांकडून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे द्यायला लावणं हायकमांडला भाग पाडलं.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ध्रुवीकरण सुरू झालं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या वाटाघाटीनंतर हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती अस्तित्त्वात आली. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत या युतीला घवघवीत यश मिळालं. पण सत्ता मिळू शकली नाही. १९९५च्या निवडणुकीत युतीने जोरदार मुसंडी मारली आणि पवारविरोधी आमदार गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून ‘मातोश्री’ बंगल्यावर डेरेदाखल झाले. पडद्यामागून विलासराव देशमुख आणि सुधाकररावांनी सोंगट्या फिरवल्या. १४ मार्च १९९५ रोजी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून दादरच्या शिवतीर्थावर शपथ घेतली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.
चार वर्षानंतर जोशींचे जावई गिरीश व्यास प्रकरण तापले आणि मग बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. तो दिवस होता ३० जानेवारी १९९९! १ फेब्रुवारी १९९९ रोजी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. ऑक्टोबर १९९९मध्ये लोकसभेच्या निवडणुकांबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा राजकीय जुगार राणे खेळले. याच वेळी सोनिया गांधींचे विदेशी मूळ असे कारण देऊन शरद पवारांनी काँग्रेसबरोबर फारकत घेऊन आपला ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ नावाने वेगळा संसार थाटला. त्यामुळे एका बाजूला शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस व राष्ट्रवादी अशी लढत झाली. पण फाजील आत्मविश्वास आणि आसुरी महत्त्वाकांक्षा यामुळे युतीला साडेचार वर्षांच्या सत्तेवर पाणी सोडावं लागलं.
काँग्रेसच्या विरोधात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी अशी सत्ता येऊ शकत होती. परंतु ऐनवेळी शरद पवारांनी विलासराव देशमुख यांना पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची राजवट सुरू झाली. १८ ऑक्टोबर १९९९ रोजी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. कोणताही वाद अंगावर ओढवून न घेता हसतखेळत, राष्ट्रवादीशी जुळवून घेत विलासरावांनी १८ जानेवारी २००३पर्यंत हा राज्यशकट चालविला. मॅडम सोनिया गांधींनी १८ जानेवारी २००३ रोजीच विलासराव आणि सुशिलकुमार या ‘दो हंसो का जोडा’मधला दुसरा हंस अर्थात सुशिलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं.

२००४च्या विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढून आघाडी पुन्हा सत्तेवर आली. १ नोव्हेंबर २००४ रोजी पुन्हा विलासराव मुख्यमंत्री झाले. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे विलासरावांच्या शिरावरचा मुख्यमंत्रीपदाचा ‘ताज’ हिरावला गेला आणि त्यांच्याच राजकीय गुरूंचे चिरंजीव अशोक चव्हाण ८ डिसेंबर २००८ रोजी मुख्यमंत्री झाले. २००९च्या निवडणुकीत आघाडी पुन्हा सत्तेवर आली आणि मॅडम सोनियांनी पुन्हा अशोकरावांच्या पारड्यात वजन टाकलं. ७ नोव्हेंबर २००९ ला मिळालेलं मुख्यमंत्रीपद ‘आदर्श’ घोटाळ्यात नाव आल्यामुळं अशोकरावांना ११ नोव्हेंबर २०१०ला सोडावं लागलं.
त्याच दिवशी १० जनपथवरून सोनियाजींनी महाराष्ट्राकडे ‘मिस्टर क्लिन’ असं ‘पृथ्वी मिसाईल’ धाडलं. चार वर्षं महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद भूषविणार्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकीर्दीत बर्याच अघटित घटना घडल्या. २६ सप्टेंबर २०१४ रोजी दुसर्यांदा राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. नरेंद्र मोदी नावाच्या लाटेने मे २०१४मध्ये आधीच काँग्रेसची धुळधाण उडाली होती आणि ऑक्टोबर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातूनसुद्धा काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे चारही पक्ष आघाडी आणि युती तुटल्यामुळे स्वतंत्र लढले. भाजप विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आणि पंतप्रधान मोदी यांच्या पसंतीस उतरलेले ४४ वर्षांचे भाजपचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बिगर काँग्रेसी सरकारचे चौदावे मुख्यमंत्री झाले. वानखेडे स्टेडियमवरच्या ऐतिहासिक आणि शाही सोहळ्यात ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना तसेच मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे लढविण्यात आल्या. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निवडणुकांचे निकाल लागले. भाजपचे १०५ आमदार निवडून आले तर शिवसेनेच्या वाट्याला ५६ जागा आल्या. राष्ट्रवादीच्या ५४ आणि काँग्रेसच्या ४४ जागा निवडून आल्यामुळे एकहाती सत्ता कुणीही स्थापन करू शकत नव्हते. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना अडून बसली होती. भाजपचे तेव्हाचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान १८ फेब्रुवारी २०१९ रोजी मातोश्रीच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत तसे ठरले होते, असा शिवसेनेचा दावा आहे.
प्रत्येक पक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दरबारात हजेरी लावून येत होता. पण बहुमत कुणाजवळही नसल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. राजकीय घडामोडी वेगाने घडत होत्या. भाजपसमवेत निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली. या दरम्यान भाजपने अजित पवार यांच्याबरोबर संधान सांधले आणि २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी साडेसात वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. पण अस्थिर वातावरणात पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला नाही. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. अजितदादांनी शपथ घेतल्याच्या ऐंशी तासात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाची नोंद झाली.
सरकार बहुमत सिद्ध करू शकत नसल्याने फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या प्रमुखांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या राजकारणात धनजीशा कूपर ते यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरे ही मुख्यमंत्रीपदाची वैभवशाली परंपरा पाहताना काँग्रेसचे सरकार ते काँग्रेसच्या सहभागाचे सरकार हे एक राजकीय वर्तुळ पहायला मिळाले. या सर्वच घडामोडी पाहता सत्ता स्थापन करण्यासाठी कोणीही कुणाबरोबरही जाऊ शकतो. कोणीही कोणत्याही पक्षात ये-जा करू शकतो. निष्ठा, वैचारिक बैठक, तत्त्व, सिद्धांत, नीतिमत्ता, नैतिकता यांचा टेंभा कुणीही मिरवू नये, नाकाने कांदे कुणीही सोलू नयेत, हेच वास्तव आहे. राजकारणातसुद्धा ‘सोय जाणे तो सोयरा’ हेच खरे!

