Homeमाय व्हॉईसदेवेंद्रभाऊ... ललितला मदत...

देवेंद्रभाऊ… ललितला मदत कारणाऱ्या सर्वांनाच उघडे पाडा!

नाशिकचा ड्रगमाफिया ललित पाटील पुणे मुक्कामाहून फरार होऊन तब्बल नऊ दिवसांनी चेन्नई येथे मुंबई पोलिसांच्या हाती लागला. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांसाठी ही बाब खासच म्हटली पाहिजे! मुंबईच्या ओशिवरा भागातील एका गुन्ह्याप्रकरणी तो हवाच होता. तशातच त्याने चेन्नईत गेल्यावर मुंबईतील एका साथीदाराशी संपर्कात असताना त्याचा कॉल ट्रेस झाला आणि गेले नऊ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा ललित पोलिसांच्या हाती अलगद लागला! पोलिसांनी पकडल्यावर त्याने तारे तोडले. सर्वांना उघडे पाडीन, हे करेन आणि ते करेन, अशा अनेक बाता मारल्या. पट्टीचे गुन्हेगार असे करतातच. त्यात नवल नाही.

ललितला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललितला मदत करणाऱ्यांना उघड पाडू, कुणालाही सोडणार नाही, असे प्रतिपादन केले आहे. आता थोड्या वेळेतच त्यांची ती ‘गौप्यस्फोट’ पत्रकार परिषदही होणार आहे. गृहमंत्री महोदय कुणाला सोडू नकाच. गुन्हेगाराबरोबरच त्यांना साथ देणाऱ्यांना बेनकाब कराच. महाराष्ट्रालाही पाहायचे आहे की हे नग कोण आहेत? राजकीय हिशेब तुम्ही चुकते करालच. पण कारागृह प्रशासन आणि डॉक्टरांनाही उघड करणे गरजेचे आहे. पोलीस बंदोबस्त असताना ललित पळाला म्हणून पोलिसांना दोषी धरणे योग्यच आहे. परंतु पोलिसांचेच कारागृह प्रशासन असते.  ते सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना फक्त पोलीस हा शब्दच दिसतो आणि तोच महत्त्वाचा असतो.

ललित हा रुग्णालयातून पळाला नव्हे तो नेहमीप्रमाणे चालतच जवळच असलेल्या तारांकित हॉटेलमध्ये गेला आणि तेथून त्याने सूबाल्या केले. राज्य सरकारच्या अखत्यारीतील ससून रुग्णालयातील कक्ष क्रमांक 16मध्ये तो दाखल होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याला कुठला आजार होता वा कुठली व्याधी होती हे अदयापही रुग्णालय वा सरकारने जाहीर केलेले नाही. ससून रुग्णालयातील कैद्यांचा कक्ष हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. वर्ष, दोन वर्षांनंतर हे रुग्णालय वर्तमानपत्रात गाजत असतेच.

सध्याच्या घडीला या कक्ष क्रमांक 16मध्ये 16 गुंड कैदी आहेत. (ललित पळाल्यावर यातील काहींना पुन्हा गजाआड पाठवण्यात आले.) यामधला मटकाकिंग विरल सावला गेले 247 दिवस रुग्ण म्हणून या कक्षात अक्षरशः मौजमजा करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वास्तविक याला कोल्हापूरमधून एका खूनप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला मोक्का (मकोका) लावण्यात आलेला आहे. आता इतक्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या अट्टल बदमाशाला इतके दिवस मोकळे ठेवण्यात येते म्हणजे नक्की कुणीतरी त्याचा ‘देवपीता’ असणारच. आणि हा ‘देवपीता’ गुजरातमधील असल्यास बोलणेच खुंटले!

ललित

तसेच 20 हजार कोटींच्या फसवणूकप्रकरणी विनय अरहाना, पुण्यातील नामचिन गुंड रुपेश मारणे तसेच माजी आमदार अनिल भोसले आदी अनेक जण या रुग्णालयातच मुक्कामाला आहेत. नामवंत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आजारी कैद्यांवर उपचार करण्यात गैर काहीच नाही. परंतु आजारपणाच्या ढोंगाखाली रुग्णालय पर्यटन करणे हा गुन्हाच आहे. आणि या गुन्ह्यात कारागृह प्रशासन आणि डॉक्टरमंडळीही तितकेच गुन्हेगार ठरावेत.

संतापजनक प्रकार येथेच संपत नाहीत. या रुग्णांचे नातेवाईक लोकप्रतिनिधी वा स्थानिक नेत्यांना गळ घालतात व त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येते. जर वशिला मोठा असेल तर कैदी रुग्णाची रवानगी खासगी रुग्णालयातही केली जाते. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून तुरुंगाची हवा खात असलेल्या वाधवान बंधू आणि कुटुंबाला मानवीय हेतूने मदत करणारे अभिनव गुप्तासाहेब कारागृह विभागाचे प्रमुख आहेत. त्याआधी ते पुणे शहराचे पोलीस आयुक्त होते. आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द चांगली झाली. परंतु कारागृहात आल्यावर मात्र त्यांच्या कारभारात काहीशी ढिलाई आल्याचे जाणवते.

काही महिन्यांपूर्वी चकमकफेम पोलीस अधिकारीही या रुग्ण कक्षात होते. तेव्हा त्यांची येथील कैद्यांशी चांगली ओळख झाल्याची माहिती मिळते. गृहमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केलेच आहे तर या चौकशीत केवळ पोलिसांची चौकशी नको, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, कारागृहातून रुग्णालयात सोडायला येणारे कर्मचारी, कामगार, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधणारे नातेवाईक आदी अनेकांची चौकशी होणे गरजेचे आहे. जाता जाता कुसुमाग्रज यांच्या काही ओळी आठवल्या…

“गंजलेल्या तलवारी घेऊन घरात घुसणाऱ्या

दरोडेखोरांना रोखण्यासाठी

तुमच्या कमरेला पिस्तूल आहे ना?

मग माळ्यावर चढून

गंजलेल्या तलवारींची शोधाशोध करू नका”…

याच धर्तीवर… उघडे जरूर करा. पण, उघडे करण्यात नेहमीप्रमाणे राजकारण मध्ये आणू नका!! कारण “In a total surveillance state complicity is much more likely than ignorance” हे कुणीही विसरू नये. तसेच ‘For the powerful, crimes are those that others commits” असंही व्हायला नको!!

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content