Homeमाय व्हॉईसदेवेंद्रभाऊंनी पवारांची फक्त...

देवेंद्रभाऊंनी पवारांची फक्त एक ओळच वाचली! उरलेल्यांचे काय?

काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकारण संपले आहे, असे विधान केले होते. त्याच पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’, या पुस्तकातील एका वाक्याचा आधार घेत काल देवेंद्रभाऊंनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. खरेतर या विषयावर मी लिहिणार नव्हतो, कारण ‘मुख्यमंत्री असताना उद्धव यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणार नव्हतं’ या एका वाक्यावर माध्यमांनी दोन दिवस दळण दळलं होतं. नंतर त्याचा फायदा घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमधील काहींनी वाक्बाण सोडले होते. त्याचवेळी मला शंका आली होती की, पवार असं काहीही करणार नाहीत. मग मी पुस्तकाबाबत विचारणा केली. तोवर म्हणजे अक्षरशः एका दिवसात या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली, असे मला सांगण्यात आले.

आठ दिवसानंतर पुस्तक उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. मला थोडे आश्चर्य वाटले की, आपल्या राजकारणी नेत्यांनी एका दिवसात हे पुस्तक संपवले. त्याचवेळी एक शंकेची पाल चुकचुकली. या बातम्या चालवण्यासाठी तर बाजारातून हे पुस्तक उचलण्यात आले तर नाही? की ही पुस्तकविक्रीची नवीन मार्केटिंग पद्धत आहे! त्यानंतर गेल्या आठ दिवसात दुसऱ्या बातम्यांना स्थान मिळाल्याने हे पुस्तक काहीसं नजरेआड झालं होतं. परंतु काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या टिकेनंतर मात्र राहवले नाही, म्हणून हे काहीसे पांढऱ्यावर काळे…

ही जी काही ठाकरे यांच्याबाबतीत लिहिलेली ओळ आहे, त्या परिच्छेदाची सुरुवातच पवार यांनी “मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरे यांच्या शर्टपँट, अशा मुंबईकर पोशाखात सहजपणानं वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाच होतं. कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद सहज आणि आपुलकीचा असल्यानं मध्यमवर्गाला तो फारच भावला. त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं या वर्गाला वाटत होतं.” आणि पुन्हा ते वाक्य येण्याआधी “उद्धवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या.” आगापिछा काहीही न पुरवता अशी टीका करणे भयानक आहे, इतकेच सांगायचे आहे. पवार यांच्या सूचनांवर कार्यवाही होत होती हेही पवार यांनी मान्य केले आहे. ‘मुख्यमंत्रीपदासाठी एक चेहरा लागतो आणि यावेळी यासाठी उद्धवच योग्य होते.’ असे मतही पवार यांनी व्यक्त केले आहे.

खरेतर उद्धव ठाकरे यांना राज्य करायला वेळच मिळाला नाही. म्हणजे, सुमारे अडीच वर्षे कोरोनाने खाल्ली. त्यावेळी तर पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यापासून तो गल्लीतील कुठलाही नेता घराबाहेर वा कार्यालयाबाहेर पडत नव्हता. कोरोनाचे निर्बंध काहीसे कमी झाल्यानंतर ठाकरेही घराबाहेर पडले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्यात सहजता नव्हती, हे मान्य. परंतु त्यांनी राज्यशकट नीट हाताळले हे मान्यच करावे लागेल.

आपल्या सोयीपुरते पवार यांच्या पुस्तकाचा उल्लेख करणाऱ्या देवेंद्रभाऊंनी पवार यांनी याच पुस्तकात लिहिलेल्या या ओळींकडे दपर्लक्ष केलं. ‘भाजप सत्तेत आल्यामुळे लोकशाहीच्या सुदृढीकरणाला गती आली का? याचे उत्तरद्यावे. दुर्दैवाने नाही असं उत्तर आहे. पन्नास-साठ वर्षे विरोधात बसलेल्या या पक्षाला लोकशाहीचं मर्म अधिक उमगलेलं असणं अपेक्षित होतं. पण तसं घडलेलं दिसत नाही. सत्तेचं अधिकाधिक केंद्रीकरण होताना दिसत आहे’, असंही म्हटलं आहे. कोरोना काळात धार्मिक स्थळे / मंदिरे उघडावीत म्हणून तत्कालिन राज्यपाल कोश्यारी यांचा पवार यांनी कडक शब्दात निषेध केला आहे. आपली नाराजी पवार यांनी पंतप्रधानांनाही कळवली होती.

मला असे वाटून राहिले आहे की, देवेंद्रभाऊंना या पुस्तकाचे ब्रिफ नीट दिलेले नाही. यावरून कबीरजींचा एक दोहा आठवला-

“जाका गुरू भी अंधला चोला खरा निरंध|

अंधे अंधा ठेलिया, दून्यू कूप पडंत|”

देवेंद्रभाऊंच्या या संपूर्ण प्रकारावर मला कवी शांताराम यांच्या पुढील ओळीही आठवल्या…

“मनात होते सटवीच्या तसे तसे झाले,

कोरलेले दगडावर पुसले नाही गेले,

वाटावे खोटे असे सर्व खरे झाले!

लाजत लाजत सूर्यदेव पश्चिमेला उगवले!”…

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content