Homeटॉप स्टोरी.. बाळासाहेबांचे स्मारक...

.. बाळासाहेबांचे स्मारक आधी नीट करा!

कालच्या जन आशिर्वाद यात्रेत मी २० ठिकाणी भेटी दिल्या. दादरमध्ये मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापुढे नमस्कार केला. मी कोणाला नमस्कार करायचा, कोणापुढे विनम्र व्हावे हा माझा प्रश्न आहे. त्यानंतर एका-दोघांनी जाऊन तेथे गोमूत्र शिंपडले. ज्यांना गोमूत्र शिंपडायचे, गोमूत्र प्यायचे असेल त्यांनी ते करावे. पण, बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल इतका अभिमान असेल तर त्या स्मारकाची स्थिती सुधारा. त्यांचा मुलगा मुख्यमंत्री आहे ना.. काय अवस्था आहे स्मारकाची? लॉन नाही, फुले नाहीत.. आसपास सगळी दलदल.. काल मी गेलो तेव्हाही मला पॅन्ट वर करून तेथे पोहोचावे लागले. ही अवस्था! बाळासाहेबांना साजेसे जागतिक कीर्तीचे एक स्मारकही उभारता येत नाही. तसे उभारा आणि मग तेथे गोमूत्र शिंपडा. आणि गोमूत्र कोणी शिंपडावे? गोमूत्राला आम्ही पवित्र मानतो. एखादा ब्राह्मण तरी बोलवायचा. मला सांगितले असते तर मी पाठवला असता.. आमच्याकडे भरपूर आहेत, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत शिवतीर्थावरील कालच्या शुद्धीकरण प्रकरणाचा समाचार घेतला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून मुंबईत जन आशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल त्यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला वंदन केले. त्यानंतर काही शिवसैनिकांनी त्या जागेचे कथित शुद्धीकरण केले. त्यावर राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांना भेटून ओळख करून देतो!

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे कोण, असा सवाल केले असल्याचे सांगितले असता राणे म्हणाले की, त्यांना भेटून समोर ओळख करून देतो.. आणि एकच हंशा पिकला.

६० हजार गुन्हे दाखल करा!

आमच्या जन आशिर्वाद यात्रेबद्दल पोलिसांनी ६० गुन्हे दाखल केल्याचे सांगताच ते म्हणाले की, ६० नाही, ६० हजार गुन्हे दाखल करा. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. तुमच्या डोक्यावर दिल्लीतही कोणी बसले आहे, याचे भान राखा. कोरोना काळात शिवसेनेकडून कोणी, कुठे आणि किती ठिकाणी सभा घेतल्या, गर्दी केली, कार्यक्रम घेतले.. सगळी माहिती आहे माझ्याकडे. डोळ्यांनी पाहिल्या आहेत व आजही बघतोय.. औरंगाबाद ते नागपूरपर्यंत जे गुन्हे केले ते बघा. हे राठोड कोण काही संत, महात्मा आहेत? शिवसेनेचे लोकप्रतिनिधी कसे वागतात, आम्हाला कळत नाही का? दुष्टबुद्धीने वागणाऱ्यांना जनता न्याय देत नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईतला बकालपणा जाणे गरजेचे!

गेल्या ३२ वर्षांत मुंबईचा बकालपणा वाढला आहे. त्यामुळे सध्याची सत्ता उलथवून भाजपाकडे सत्ता आणणे गरजेचे आहे. महापालिकेच्या येत्या निवडणुकीत भाजपा सत्ता ताब्यात घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

औषधांतही पैसे खाणारे लोक..

कोरोना हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांनी जर व्यावस्थितपणे कोरोना हाताळला असता तर लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले नसते. वैद्यकीय टेंडरमध्ये १२ टक्के देत नाही म्हणून टेंडर रद्द करणारे हे सरकार आहे. औषधांमध्येही पैसे खाणारे हे लोक आहेत. सिंधुदूर्गात एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ११० कोरोनाचे रूग्ण होते. दोन डॉक्टर.. त्यातला एक कानाचा तर दुसरा दातांचा.. हे उपचार करणार कोरोना पेशंटवर.. अशी सेवा दिली तर लोक मरणार नाही तर काय, अशी टीकाही राणे यांनी केली.

आजची शिवसेना लाचारी करणारी!

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी एक बैठक बोलावली असून त्यात शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होत असल्याबद्दल विचारले असता केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, ३९ वर्षे मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांबरोबर होतो. हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी त्याग करण्याचा त्यांचा विचार होता. पण, आताची ही शिवसेना लाचारी करणारी शिवसेना आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी या बैठकीकडे पाहतो.

तेव्हा का बोलला नाहीत?

मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न करू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या समितीचा मीही अध्यक्ष होतो. घटनेच्या १५ (४) आणि १६ (४) कलमांप्रमाणे एखाद्या समाजाला मागासलेपणा मान्य करण्याचा अधिकार राज्याचा आहे. याच अधिकाराखाली तामिळनाडूबरोबरच १५ राज्यांनी आरक्षण दिले. ५०-५२ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या अधिकारांबद्दल सुस्पष्टता यावी म्हणून आता घटनेत दुरूस्ती करण्यात आली. लोकसभा आणि राज्यसभेत ते बिल मांडण्यात आले. तेव्हा का बोलला नाहीत? का चर्चा केली नाही, असा सवालही राणे यांनी केला.

आम्हाला ताट दिले आहे, पण हातपाय बांधले, असे शरद पवार म्हणाल्याचे सांगताच ते म्हणाले की, हातपाय कसे सोडवायचे हे ५० वर्षे राजकारण करणाऱ्या पवारांना माहित नाही का? प्रत्येक गोष्ट केंद्राकडे ढकलण्याचे आता बंद करा.

शिवसेनेचे आता पाच खासदारही येणार नाहीत!

आम्ही सोबत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डोक्यावर हात होता म्हणून तुमचे हे खासदार आता दिसतात. हा हात बाजूला गेल्यावर तुमचे पाच लोकही निवडून येणार नाहीत, असेही राणे शिवसेनेवरील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा पूर्ण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या अपेक्षेने माझ्यावर उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे. या अपेक्षांची पूर्तता करतानाच राज्यातल्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांच्या या कोकणपट्ट्यात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीच्या आधारावर असलेल्या विविध उद्योगांचे जाळे उभारण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कोकणात उद्योगांचे जाळे वाढले की, सर्वसामान्यांसाठी रोजगाराची निर्मिती होईल आणि राज्याचा पर्यायाने देशाचा जीडीपी वाढण्यास हातभार लागेल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दाम या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. तब्बल सात आयएएस अधिकारी माझ्याकडे आहेत. या सर्वांची बैठक घेऊन मी, देशातल्या कोणकोणत्या भागात उद्योगधंद्याचा बॅकलॉग आहे, याची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रावर मी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विविध उद्योगांसाठी आम्ही कमीतकमी ३५ टक्क्यांपासून ९०, अगदी १०० टक्के सबसिडी देतो. महाराष्ट्रातल्या तरूणांनी पुढे यावे, उद्योग उभारून रोजगार निर्माण करावा, जीडीपी वाढवावा, असे आवाहनही राणे यांनी केले.

अशी होत आहे जन आशिर्वाद यात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेल्या आम्ही चौघा मंत्र्यांनी महाराष्ट्रात जन आशिर्वाद यात्रा काढली आहे. पंतप्रधानांनी सांगितले, त्यांचा आदेश म्हणा किंवा सूचना.. तुम्ही आपापल्या भागात जा. लोकांना भेटा. त्यांना आपल्या सरकारने गेल्या सात वर्षांत केलेल्या कामांची, घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या. त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. आणखी काय-काय करायचे ते समजून घ्या आणि मग कामाला लागा. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार कालपासून माझ्या जन आशिर्वाद यात्रेला विमानतळापासूनच सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन यात्रेला सुरूवात केली. संध्याकाळी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना वंदन करून कालच्या दिवसाच्या जन आशिर्वाद यात्रेचा समारोप केला. या काळात सर्व ठिकाणी भरपावसातही जनतेकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या सात वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला दिली. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुढच्या २५ वर्षांत देशाला महासत्ता कसे बनवता येईल, जगाच्या नकाशावर भारताचे नाव कसे ठळकपणे दिसेल, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी नेमकी काय आहे, याची माहिती दिली, असे त्यांनी सांगितले.

या पंतप्रधानांनी गोरगरीबांना अन्न मिळावे म्हणून तब्बल एक लाख ७० हजार कोटी रूपये दिले. प्रत्येक भारतीयाचे बँकेत खाते असावे म्हणून ३५ हजार कोटी दिले. देशात एकही कुपोषित बालक राहू नये म्हणून त्यांना पौष्टिक अन्न पुरवण्याचे काम चालू आहे. इतके जास्त पैसे देणारा देशातला पहिला पंतप्रधान मी पाहिला. पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीकडून कुपोषित बालकापर्यंतचा बारीकसारीक विचार करणारा पहिला पंतप्रधान मी पाहिला. काश्मीरचे ३७०वे कलम रद्द करण्याचा निर्णय अमित शाह यांनी घेतला. असे सहकारी असल्याचा अभिमान वाटतो, असेही राणे म्हणाले.

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content