राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवे हात समजले जाणारे शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील अनधिकृत बांधकाम एका महिन्यात पाडण्याचे आदेश लोकायुक्त वी. एम. कानडे यांनी दिले आहेत.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा इमारत क्र. ५७ व ५८मधील अनधिकृत बांधकाम एका महिन्याच्या आत पाडून त्याचा अहवाल लोकायुक्त कार्यालयाकडे म्हाडाने सुपूर्द करावा असा आदेशही त्यांनी दिला.
भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी, अनिल परब वांद्रे पूर्व येथील म्हाडा कॉलनीच्या इमारत क्र. ५७ व ५८मधील मोकळ्या जागेत अनधिकृत कार्यालय बांधून त्याचा स्वतःचे कार्यालय म्हणून वापर करत असल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केली होती. हे बांधकाम अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. परंतु, मंत्र्यांच्या दबावामुळे म्हाडा हे अनधिकृत बांधकाम पाडत नाही, अशी तक्रारही त्यांनी लोकायुक्तांकडे मार्च महिन्यात केली होती.
गेले ३ महिने या याचिकेची सुनावणी लोकायुक्तांकडे सुरू होती. गेल्या आठवड्यात या याचिकेची अंतीम सुनावणी लोकायुक्त न्या. वी. एम. कानडे यांच्यासमोर झाली. त्यात जून व जुलै २०१९मध्ये २ वेळा म्हाडाने अनिल परब यांना इमारत क्र. ५७ व ५८मधील त्यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश दिले होते. अनिल परब यांनी हे बांधकाम तोडले नाही म्हणून म्हाडाने पोलीस व महानगरपालिकेची मदत मागितली होती, हे स्पष्ट झाले.

अनिल परब मंत्री झाल्यावर त्यांनी म्हाडावर दबाव आणला. भाजपा नेते डॉ. किरीट सोमैयांनी यासंदर्भात लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली व सुनावणीदरम्यान हे कार्यालय अनिल परब यांचे असल्याचे सिद्ध होत आहे आणि ते कार्यालय अनधिकृत आहे म्हणून पाडावे अशी मागणी केली. सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण सचिव मिलींद म्हैसकर, म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी लोकायुक्तांसमोर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य केले.
लोकायुक्तांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे बांधकाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाडण्यात येईल असे मान्य केले. हे अनधिकृत बांधकाम पाडल्यावर एका महिन्याच्या आत कार्यालयात अहवाल सादर करावा असे निर्देश लोकायुक्तांनी राज्य सरकारला दिले आहेत.
उद्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा जनतेसमोर
दरम्यान, भाजपा नेते डॉ. सोमैया यांनी उद्या राज्यातल्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघड करणार असल्याचे आज जाहीर केले. आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ आदी अनेक नेत्यांचे घोटाळे उघड करण्यात सोमैया यांनी पुढाकार घेतला होता.

