गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पाचव्या दिवशी, कला अकादमीमध्ये ‘दास्तान-ए-गुरु दत्त’, हा एक विशेष संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. फौजिया आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना प्रसिद्ध चित्रपटनिर्माते गुरु दत्त यांच्या जीवनप्रवासाचा तल्लीन करणारा कलाविष्कार पाहायला मिळाला. सत्राची सुरुवात प्रख्यात चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केली. रवैल यांनी भारतीय चित्रसृष्टीतील गुरु दत्त यांच्या योगदानाबद्दल आपले विचार मांडले. त्यानंतर, फौजिया यांनी आपल्या मोहक कथानकातून प्रेक्षकांना गुरु दत्त यांच्या जीवनप्रवासात नेले. त्यांच्या कथनासोबत लतिका जैन यांचे गायन, सुदीप यांचा तबला, ऋषभ यांचे हार्मोनियम आणि अंकित यांचे गिटार होते. आशा बत्रा यांच्या संशोधन सहकार्याने निर्मित या विशेष कार्यक्रमाचे नेतृत्त्व विकास जालान यांनी केले.
गुरु दत्त यांच्या सुरुवातीच्या आयुष्याचा मागोवा
फौजिया यांनी गुरु दत्त यांच्या कोलकात्यातील बालपणापासून आपल्या कथानकाची सुरुवात केली. त्यात गुरु दत्त यांना मातृकुळाकडून मिळालेल्या कलात्मक मार्गदर्शनावर प्रकाश टाकला. नंतर अल्मोडा येथील उदय शंकर सांस्कृतिक केंद्रातील गुरु दत्त यांच्या सुरुवातीच्या काळाचे वर्णन केले. गुरु दत्त यांनी वयाच्या 16व्या वर्षी तेथे प्रवेश घेतला होता. या संस्थेत व्यतीत केलेला काळ गुरुदत्त यांच्या कलात्मक जडणघडणीला आकार देण्यात महत्त्वाचा ठरला.

देव आनंदबरोबर असलेली मैत्री
या कार्यक्रमात गुरु दत्त आणि देव आनंद यांच्या मैत्रीवरही प्रकाश टाकण्यात आला. दोघांच्याही आरंभीच्या काळात पुण्यातील प्रभात स्टुडिओत मैत्री झाली. या मैत्रीने दोन्ही कलाकारांमध्ये एक दृढ नाते निर्माण झाले. आपण निर्मिती क्षेत्रात जेव्हा कधी पाऊल टाकू तेव्हा एकमेकांना सहकार्य करण्याचे वचन त्यांनी परस्परांना दिले. या वचनामुळे भारतीय चित्रसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित सर्जनशील भागीदारींपैकी एक सुरू झाली.
मुंबईतला प्रवास आणि चित्रपट दिग्दर्शक
त्यानंतर फौजिया यांनी गुरु दत्त यांच्या मुंबईतल्या दिवसांचे वर्णन केले. याच काळात देव आनंद यांनी नवकेतन फिल्म कंपनीची स्थापना केली होती. एकमेकांना दिलेले वचन पूर्ण करताना, देव आनंद यांनी गुरु दत्त यांना कंपनीचा पहिला चित्रपट “बाजी”चे दिग्दर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. इथूनच गुरु दत्त यांच्या गौरवशाली दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटादरम्यान गुरु दत्त यांनी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी यांना ‘जॉनी वॉकर’ हे पडद्यावरचे प्रसिद्ध नाव दिले. बाजीच्या यशानंतर, गुरु दत्त यांनी कालातीत क्लासिक्स तयार केले, ज्यात जागतिक चित्रसृष्टीत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “प्यासा” चित्रपटाचा समावेश आहे.

वैयक्तिक आयुष्याची झलक
या कार्यक्रमातील कथानकात गुरु दत्त यांच्या वैयक्तिक जीवनावरही भर देण्यात आला. ‘कागज के फूल’ या चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशानंतर त्यांच्या भावनिक संघर्षांवर आणि शेवटच्या काळात त्यांना आलेले नैराश्य आणि एकाकीपणाचाही फौजिया यांनी उल्लेख केला.
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या संगीतमय कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला. लतिका जैन यांच्या सुरेल सादरीकरणामुळे ही कथा अधिक प्रभावी झाली. कार्यक्रमाच्या शेवटी, निर्माते रवी कोट्टारकर यांनी ‘दास्तान-ए-गुरु दत्त’च्या संपूर्ण चमूचा सन्मान केला.

