Homeन्यूज अँड व्ह्यूजआशिया कप फायनलमध्ये...

आशिया कप फायनलमध्ये रंगला ‘क्रिकेट मानापमान’चा प्रयोग!

बिहार, पश्चिम बंगाल विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीवर झालेल्या राजकीय रंगरंगोटीच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला आशिया टी-20 क्रिकेट चषक (कप) अखेर दुबईतच राहिला. दुबईमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दोन चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला. मात्र स्पर्धेतल्या पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यापासूनच ‘क्रिकेट मानापमान’ नाटकाला सुरूवात झाली. या नाटकाचा शेवटचा अंक काल रात्री उशिरा पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात संपला आणि चषकावर आपले नाव कोरल्यानंतरही भारतीय संघावर फक्त आभासी चषक हाती घेऊन मायदेशी परतण्याची वेळ आली.

अशिया कप क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानविरोधात खेळावे की नाही यावर विविध विरोधी पक्षांनी देशभर आपापल्या कुवतीनुसार, ताकदीनुसार विरोध केला. परंतु भारत या स्पर्धेत कायम राहिला. स्पर्धेतला पाकविरूद्धच्या पहिला सामन्यातच टॉस उडवल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूम गाठले. तेव्हापासूनच आशिया कप मॅचपेक्षा जास्त मानापमान नाटकातच रंगणार, हे स्पष्ट झाले होते. या सामन्यात मग पाकिस्तानच्या खेळाडूंकडून केले जाणारे हातवारे, भारतीय खेळाडूंकडून त्याला दिला जाणारा प्रतिसाद, असे छोटेमोठे प्रवेश या नाटकात पाहयला मिळाले. पाकविरूद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय कर्णधाराने पाकिस्तान टीमबरोबर टीमहस्तांदोलन करण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यातल्या सर्वसामान्य पर्यटकांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त केल्या. यादवने हा विजय ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांना अर्पण केला.

यानंतर स्पर्धेतला सुपरफोरचा सामनाही भारताने जिंकला. त्यात भारत तसेच पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध प्रचंड उचकवणारी काही काही कृत्यं केली. परंतु दूरचित्रवाणीवरच्या चित्रिकरणात त्याला पुन्हा दाखवण्यात फार रस घेतला गेला नाही. योगायोगाने या स्पर्धेतला अंतिम सामना भारताला पाकिस्तानच्याच विरोधात खेळावा लागला आणि तो सामना रविवारी रात्री खेळला गेला. देशात सर्वत्र नवरात्रीचा माहोल असताना भारतीय क्रिकेट संघाने या रोमहर्षक सामन्यात 19.4 षटकांत पाच बाद दीडशे धावा फटकावत आशिया चषकावर आपली मोहोर उमटवली. आशियामध्ये क्रिकेटच्या पुरूष संघांत भारतीय संघच अव्वल असल्याचे जगाला दाखवून दिले. त्याआधी पाकिस्तान संघाला 19 षटकांत 146 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले.

फायनल झाल्यानंतर पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाची तयारी झाली. परंतु पाकिस्तानचे खेळाडू काही मैदान गाठींनात. ते ड्रेसिंग रूममध्येच बसून राहिले. भारतीय खेळाडू मात्र मैदानात जल्लोष करत होते. स्टेडियममधले भारतीय समर्थक त्यांना दाद देत होते तर पाकिस्तानच्या समर्थकांनी सामना निकालात निघाल्याबरोबर घरचा रस्ता धरला. त्यामुळे भारतात तसेच दुबईत सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. अशा वातावरणातच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. साधारणतः 80 मिनिटांनंतर पाकिस्तानचे खेळाडू उपविजेतेपदाचे सन्मानचिन्ह घ्यायला मैदानात आले. सुरुवातीला कर्णधार आगा आणि मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आले. नंतर हळूहळू सगळे खेळाडू व्यासपीठावर उपस्थित झाले. तेथे काही पुरस्कर्त्या कंपन्यांचे भारतीय प्रतिनिधी तसेच क्रिकेट बोर्डाचे अधिकारी होते. मात्र त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचे बक्षीस स्वीकारण्यास पाकिस्तानच्या खेळाडूंनी नकार दिला. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनीच पाक खेळाडूंना उपविजेतपदाचे मेडल सोपवले.

यानंतर मानापमान नाटकातला शेवटचा अंक सुरू झाला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार दिला. साधारण तासभर चषक घेऊन नकवी तिथे उपस्थित होते. परंतु भारतीय कर्णधाराने पाकिस्तानच्या कोणत्याही व्यक्तीच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार दर्शवला. त्यानंतर रागाने लालबुंद झालेले नकवी चषक आणि इतर बक्षिसे आपल्यासोबत घेऊन व्यासपीठावरून माघारी फिरले. त्यामुळे हा चषक दुबईत आयोजकांच्या कार्यालयातच राहिला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही जीव तोडून केलेल्या कामगिरीने हा चषक मिळवला. त्यामुळे या चषकावर आमचाच हक्क आहे असे भाष्य त्याने केले. दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमक मंडळाकडे (आयसीसी) तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

या नाट्यप्रयोगाच्या मध्यंतरात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एन्ट्री घेतली. भारतीय खेळाडूंनी आशिया चषक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर आता मैदानातही सुरू असल्याचे ट्विट केले. या सामन्याचे वैशिष्ट्य असे होते की, पाकिस्तानमध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दुबईत भारताने ऑपरेशन तिलक केले. भारताच्या तिलक वर्मा, या उमद्या खेळाडूने नाबाद 69 धावांची खेळी करत आशिया चषक खेचून आणला. पाकिस्तानच्या संघाने आणि खास करून त्यांच्या कर्णधार व व्यवस्थापनाने भारताचे आघाडीचे फलंदाज अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव तसेच शुभमन गिल यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या खेळाचा विशेष अभ्यास करून क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली. त्यात त्यांना यशही आले. पण ते विसरले की, नुसत्या शर्मावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही तर भारतीय संघात वर्माही आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना ठाकरे ब्रँडच्या प्रमोशनसाठी?

दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवाजीपार्क मैदानाच्या वेशीवर असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या अर्धपुतळ्यावर लाल रंग टाकून त्याची विटंबना करण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. खरेतर कोणाच्याही पुतळ्याची विटंबना करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. त्यात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे काही कारणच असू...

‘ठाकरे’ ब्रँड मराठी माणसांचा नाही, तर फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरेंचे चालले तरी काय, हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घुटमळतोय. त्याचं कारणही तसंच आहे. जो विषय प्रत्यक्षात उतरलाच नाही, त्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रणकंदन करत आहेत, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत...

इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून सक्तीची टोलवसुली सुरूच! शासननिर्णय केराच्या टोपलीत!!

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूरदरम्यान असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू यावर 100% पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय होऊन आज दोन महिने झाले तरीही या मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून पथकर उकळून...
Skip to content