विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी, याबाबतीत एक ते दोन दिवसात विचार करू आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज माध्यमांना सांगितले.
युनिफॉर्मची ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच युनिफॉर्मची ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. आम्ही स्काऊट, गाईड, एनएसएस सक्तीचे करणार आहोत. त्यांना एक विशिष्ट युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांना बूटसुद्धा देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून पुढच्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती नेमकी किती करायची हे स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. शंभर टक्के भरती केली जाणार आहे. त्यासाठी संचमान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पदभरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली जाईल. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसेच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असे नसले तरी जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असेही दीपक केसरकर म्हणाले.
शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.