चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात, गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घरोदारी गुढी उभारुन हा दिवस साजरा केला जातो. समस्त मराठी जणांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची सुरुवात जेथून करावी तो सण. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून स्वागतयात्रांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. गुढ्या, पताका, ध्वज उभारण्यापासून ते मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल या दिवशी ठेवली जाते. अनेकजण या दिवशी सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी शुभ दिवस म्हणून करत असतात. यंदा गुढीपाडव्यावर कोरोना या भयंकर महामारीचे सावट आहे. शासनाने सार्वजनिक कार्यकंमांवर निर्बंध लादलेले असल्यामुळे आपल्याला घरातूनच यंदाच्या नववर्षाचे स्वागत करावे लागले आहे.
गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. गुढीपाडव्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने शकांचा पराभव केला. आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते, त्याची सुरुवात करण्यात आली.
चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. आणि याच चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ ही गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्त्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठी चांगली असतात.
चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरू होतो. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. ह्या दिवशी हाती घेतलेले काम यशस्वी होते असे मानले जाते. अर्थात नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे अध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. झाडांची पाने शिशिर ऋतूमध्ये गळून गेली असतात तर गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते. सभोवतालची झाडे वृक्षवल्ली टवटवीत दिसतात. त्यामुळे वातावरणदेखील प्रफुल्लित असते.
अशा प्रकारे या गुढीपाडव्याचे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व नैसर्गिक महत्त्व खूप मोठे आहे. मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने पुरते व्यापून गेलेलो आम्ही इंग्रजी राजवटीतून अद्याप मुक्त झालेलो नाही. कॅलेंडर वर्षाचे पान पलटताना आजही आपण केवळ इंग्रजी महिनाच पाहतो. यावरून आपली इंग्रजाळलेली प्रखर भक्ती दिसून येते. ३१ डिसेंम्बर या इंग्रजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला उत्साह, मादक व मनमुरादपणे आनंद लुटणारे आपल्यातले बरेच जण गुढीपाडव्याच्या दिवसास मात्र अनभिज्ञ व नामानिराळे असतात ही वस्तुस्थिती आहे. ३१ डिसेंम्बरला नववर्षाचे स्वागत करणारे याच दिवशी रात्री 12 नंतर नवे वर्ष सुरू होते असे मानतात. त्या दिवशी दारू, नाचगाणी, धिंगाणा करतात. रात्री १२नंतर डिजेचा कर्णकर्कश नाद, दारू पिणारे, नाचणारे आणि धांगडधिंगा करणारे तरुण यांच्या सहवासात वर्षाचा प्रारंभ आपल्याला योग्य वाटतो का? ते पाहून ‘खरेच हा नववर्षारंभ आहे, असे आपल्याला वाटते का? याबाबत जरा विचारमंथन करा.
आपल्या दिवसाचा प्रारंभ दुःखाने झालेला आपल्याला आवडेल का? हिंदू संस्कृतीनुसार रात्री १२ वाजल्यानंतरचा काळ हा असुरांचा मानला जातो. मग अशा वातावरणात वर्षारंभ होऊ शकत नाही. आपण ज्या प्रकारे दिवसाचा प्रारंभ करतो, त्याप्रमाणे दिवसभरातील प्रत्येक कृतीवर त्याचा परिणाम होतो. दिवसाचा आरंभ जर आदर्श असेल, तर दिवसातील प्रत्येक कृती आदर्श होते. याचप्रमाणे वर्षारंभ जर आदर्श भारतीय संस्कृतीप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला केला, तर त्या व्यक्तीचे जीवन आदर्श बनेल. गुढीपाडवा हे शास्त्रानुसार व इतिहास असलेली तिथी आहे. उलट १ जानेवारी हे शास्त्रहीन व इतिहासवजा नववर्ष आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला नव्या वर्षाची खऱ्या अर्थाने सुरुवात करून वाईट प्रवृत्ती, चालीरीती, प्रथा यांना तिलांजली देऊया. कोरोना महामारीशी एकदिलाने व निकराने लढण्याचा संकल्प करुया!