राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीचा विषय निकालात निघण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे विधान भवनात हजर राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे चिरंजीव तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतःच या शक्यतेला पुष्टी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि कोरोनामुळे निर्माण करण्यात आलेल्या बबल केअर व्यवस्थेमुळे मुख्यमंत्री अधिवेशनात प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत. मात्र, सोमवारी किंवा मंगळवारी ते अधिवेशनात सहभागी होतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
तुम्ही सभागृहात एकटेच राहाल…
आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात महाराष्ट्र आज विधानसभेत चर्चा झाली आणि त्यावरून सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन करण्याची मागणी करताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना म्हणाले की, अशाप्रकारे धमक्या येत राहिल्या आणि त्यावर कारवाई केली नाही तर शेवटी अध्यक्षमहाराज, तुम्ही एकटेच सभागृहात राहाल.
शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित केला होता. आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीनंतर एका आरोपीला कर्नाटकमधून अटक करण्यात आल्याची माहिती देऊन सुनील प्रभू यांनी कर्नाटकमधे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि ते सरकार अशा लोकांना संरक्षण देत आहे, असा आरोप केला.
मुनगंटीवार यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्स अपवरून आलेल्या धमकीचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले की, व्हॉट्स अपवरून दिल्या गेलेल्या धमकीसंदर्भात इतक्या दिवसांनंतरही काहीही तपास होत नसेल तर देश कसा सुरक्षित राहील. आपल्यालाही धमक्या आल्या आणि त्यासंदर्भात गृहमंत्र्यांना भेटून माहिती दिल्यानंतरही काहीही कारवाई केली जात नाही, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांच्या सुरात सूर मिसळून अध्यक्षांनीच विधानसभा सदस्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, धमकीची ही बाब अतिशय गंभीर असून सरकारने निवेदन करावे, असे निर्देश अध्यक्षांच्या खुर्चीत विराजमान असलेल्या नरहरी झिरवाळ यांनी दिले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या संपूर्ण विषयावर राज्यस्तरीय एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा केली. ही एसआयटी आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वातली असेल, असेही त्यांनी जाहीर केले.
मुळात, २५ फोन केल्यावर पोलीस अधिकारी एकदा फोन उचलतात. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी माननीय अध्यक्षांची असल्याने आमदारांची समिती या विषयावर स्थापन करावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. त्याबरोबरच पोलिसांच्या समितीला विरोध करताना मुनगंटीवार म्हणाले की, पोलीस तपास करत राहतील, पण आपल्याला अशाच धमक्या येत राहिल्या तर शेवटी अध्यक्षमहाराज, तुम्ही एकटेच सभागृहात राहाल.

