Homeमुंबई स्पेशल३ लाख कोटींच्या...

३ लाख कोटींच्या करारांसाठी मुख्यमंत्री शिंदे उद्या दावोसला!

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, मंगळवारी १६ जानेवारी रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार असून या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास, या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ जात आहे. एमएमआरडीए व महाप्रित येथील ८ अधिकारी स्वतंत्ररित्या सहभागी होत असून या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौऱ्यामध्ये खाजगी विमानाचा वापर होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हिलियन) उभारण्यात आले असून याठिकाणी मुख्यमंत्री सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करतील तसेच मुख्यमंत्री प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशीदेखील चर्चा करतील. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्राच्या घोडदौडीविषयी माहिती देणारे दृकश्राव्य प्रदर्शनदेखील याठिकाणी असेल.

महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग करणार

 १६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. ओमानचे उद्योग मंत्री, सौदीचे वित्त मंत्री, दक्षिण आफ्रिकेचे उर्जा मंत्री, दक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर तसेच डीपी वर्ल्ड ( DP World), लुईस ड्रेफस (Louis Dreyfus ) वित्कोविझ एटोमिका (Witkowitz Atomica), या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची चर्चा होईल. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्नप्रक्रिया गटाचे सदस्यदेखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या दिवशी संध्याकाळी प्रमुख प्रतिनिधी व मान्यवरांना महाराष्ट्रातर्फे स्नेहभोजन आयोजित केले आहे.

दावोस

१७ तारखेस गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट असून त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास” या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील. याशिवाय ‘कृषी, महिला सहभाग व अन्नसुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रातदेखील ते सहभागी होतील

त्यानंतर मुख्यमंत्री मिशेल एडब्ल्यूएस (Michael aws), लिकस्टनस्टाईनचे (Liechtenstein)चे राजकुमार, हिताची कंपनीचे एमडी, कार्ल्सबर्ग ग्रुप (Carlsberg Group), दस्सो सिस्टिम्स (Dassault Systems), व्होल्व्हो कार्सच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठकीत सहभागी होतील. स्विसच्या भारतातील राजदूतांसमवेत चर्चादेखील होणार असून यात ८ कंपन्यांचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय इतरही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, माध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्र्यांसह, उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

१८ तारखेस सीआयआयने गोलमेज परिषद आयोजित केली असून त्याला केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. कॅपजेमिनी (Capgemini), एपी मोलेर मर्स्क (AP Moller Maersk), बॉल कॉर्पोरेशन (Ball Corporation), यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येणार आहे.

तीन लाख दहा हजार कोटींचे होणार करार

सुमारे अडीच लाख कोटीची गुंतवणूक या परिषदेच्या माध्यमातून होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते. पोलाद, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग, आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत – ग्रीन हायड्रोजन, हिरे व आभूषणे, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषी-औद्योगिक, कृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार २० सामंजस्य करार केले जातील. यामध्ये निपॉन आर सेलर मित्तल, इंडिया ज्वेलरी पार्क, कंट्रोल एस, आयनॉक्स, ए बी ब्रिव्हरी, जिंदाल ग्रुप हुंदाई व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सर्व करार परदेशी कंपन्यांशी केले जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्योग मुंबई, पुणे यासह छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड या जिल्ह्यातही येतील.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content