सुभाष घई दिग्दर्शित “हीरो”चा (१९८३) दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर चित्रपटगृहाच्या चौथ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समीक्षकासाठी असलेल्या खेळास जग्गूदादा श्रॉफ हजर होता. अर्थात चित्रपट समीक्षक आपल्या कामाबद्दल; चित्रपटाबद्दल कसं व्यक्त होताहेत याचं त्याला कुतूहल असल्याचं जाणवलं. स्वाभाविक होते ते. मध्यंतरात त्याची भेट घेऊन तुझी मुलाखत करायचीय; टेलिफोन करून भेटू; नंबर दे असं मी म्हणताच त्याने पटकन मला व्हिजिटींग कार्ड देत मला म्हटलं; भिडू वाळकेश्र्वर तीन बत्ती जहाँ मै रहता हूँ उस चाल में आजूबाजू रहने वाले तीन लोगो के यह केअर आफ नंबर है. कभी भी फोन करके बोल देना जग्गू से बात करनी है… त्यांच्या घरी तोपर्यंत फोन आला नव्हता. म्हणून त्याने असे शेजारच्याचे नंबर दिले होते. हे स्वाभाविक आहे.
… आणि आज काय पाहतोय? शुक्रवारी सकाळी लाँच झालेला महागडा आय फोन १७ अनेक सेलेब्रिटींजनी पहिल्याच दिवशी घेतला. त्यात आपला स्वप्निल जोशीही आहे. अर्थात आज मराठी चित्रपटसृष्टीत आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यामुळे आणखीन मराठी सेलिब्रिटीजनी अशाच महागड्या वस्तू खरेदी केल्यास आश्चर्य नको. केलेत तर कौतुक करा. पण हातोहाती मोबाईल फोन येण्यापूर्वीच्या काळात घरोघरी लँडलाईन फोन होता असेही नाही. काही कलाकारांच्या घरीदेखील फोन नव्हता. मी ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मीडियात आल्यावर त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीतील एका बहुचर्चित अभिनेत्रीशी छान ओळख झाली. प्लाझा चित्रपटगृहातील एका प्रीमियरला तिचा टेलिफोन नंबर मागताच तिने तो तत्काळ दिला. सहा आकडी असल्याने तो लक्षात राहिला. तेवढ्यात ती म्हणाली; मी अंधेरीतील डी. एन. नगरमध्ये राहते. पण हा नंबर पहिल्या मजल्यावरच्यांचा आहे. त्यांना सांग माझ्याशी बोलायचंय. ते मला बोलवायला वेळ लागतो. थोड्या वेळाने पुन्हा फोन कर… त्या काळातील अनेक पत्रकारांकडे फोन नव्हता. मी गिरगावातील अनेक पब्लिक फोन माहिती करून घेतले होते. त्यानुसार त्या अभिनेत्रीला पुन्हा एकदा फोन केला. त्या काळात फोन नोंदवल्यावरही काही वर्षांनी फोन मिळत असे.

मोबाईल युगातील गोष्टी आणखी वेगळ्या. विजय चव्हाण मोबाईल फोन वापरत नसे. याचं कारण आपल्या कामावरचा फोकस कायम ठेवतानाच कामाचा आनंदही आपण घ्यावा व इतरांनाही द्यावा हाच प्रामाणिक हेतू. आता यावर मार्ग काय? तो घरुन निघताना आपल्या पत्नीला एका गोष्टीची कल्पना देत असे; आज आपण कोणत्या चित्रपटाचे चित्रिकरण करतोय; कुठे करतोय; कोणासोबत करतोय. असाच एकदा मी फोन केला असता वरदने म्हणजे त्यांच्या मुलाने फोन उचलला. तो शालेय वयात होता. त्याने आईकडून माहिती घेऊन सांगितले आणि त्यानुसार मी एका कलाकाराला मोबाईल केला आणि तो सुपरिचित असल्याने त्याने अतिशय हसतच विजय चव्हाणकडे दिला…
कलाकार आणि त्याचे फोन यापासून सेलिब्रिटी आणि मोबाईल क्रांती हादेखील एक विषय. काही सेलिब्रिटीज अनोळखी नंबर उचलत नाहीत तर काही सेलिब्रिटीज ओळखीचेही नंबर उचलत नाहीत वा उशिराने वा दोन-चार दिवसांनीही परतीचा फोन करत नाहीत. तेव्हा मनात एक प्रश्न पडतो. आज मनोरंजन क्षेत्रात चित्रपट; मालिका; वेबसीरीज; जाहिराती; इव्हेंटस; प्रमोशन इतकं व असं वाढलंय की मोबाईल असून नि नंबर आल्याचे माहित असूनही परतफेड करता येत नाही. साठच्या दशकात अनेक कलाकारांकडे फोन नव्हता. बराचसा कारभार निरोप; चिठ्ठी व पत्र यावर चाले आणि त्यात विश्वासाचे नातेही होते… अगदी घट्ट!