Homeमाय व्हॉईससुनेत्राताईंच्या रूपाने महिलांचा...

सुनेत्राताईंच्या रूपाने महिलांचा सन्मान करण्याची संधी घेणार भाजप!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, एक कर्तबदार व्यक्तिमत्व अजित पवार ह्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने सगळा महाराष्ट्र हळहळतोय. त्यांचा वक्तशीरपणा, त्यांची करडी शिस्त, त्यांचा कामाचा झपाटा, स्पष्टवक्तेपणा, त्यांची प्रशासनावरील पकड, ह्या सगळ्या गुणांच्या आठवणी कार्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना आणि आम जनतेला, विशेषत: बारामतीकरांना येत आहेत. अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने राजकीय वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांना जाऊन दोन दिवसही झाले नाहीत तर काल इकडे दादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कोण होणार ह्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. प्रसारमाध्यमेही दिवसभर हीच चर्चा करत होत्या. आता सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची जागा घेतील हे नक्की झालंय. पक्षाची धुराही त्याच सांभाळणार का हे अजूनही निश्चित झाले नसले तरी त्यादृष्टीनेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा चालू आहेत.

भाजप

त्याआधी, दादांचे अस्थिविसर्जनही झाले नाही तर इकडे सुनेत्रा पवार ह्यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना भेटले. उपमुख्यमंत्रीपद आणि दादांकडे असलेली इतर खाती राष्ट्रवादी पक्षालाच मिळाली पाहिजेत असा आग्रह धरला. दादांच्या राष्ट्रवादी पक्षाची अवस्था आता निर्नायकी झाली आहे. पक्षामध्ये प्रफुल पटेल, छ्गन भुजबळ, सुनील तटकरे असे ज्येष्ठ नेते असले तरीही संपूर्ण पक्ष एकसंघ ठेवू शकेल, असा दादांच्या तोडीचा नेता नाही. आणि पक्षाच्या प्रमुखपदी जर दादांच्या घरातीलच व्यक्ती असेल तरच पक्ष एकसंघ राहू शकतो हेही तितकेच खरे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट ह्यांच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगत आहेत. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी काही ठिकाणी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या आणि नंतर हे दोन्ही गट एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती, असे आता काही नेत्यांनी बोलून दाखवले आहे. मग प्रश्न हा येतो की जर दोन्ही गट एकत्र आले तर हा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत राहील का? कारण स्वत: शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी म्हटले होते की, भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षाशी युती केली तरी चालेल, पण भाजपशी नाही. त्यामुळे पवार महाविकास आघाडीला  प्राधान्य देतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

भाजप

पवारांचा काही भरोसा नाही. 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्याच दिवशी त्यांनी भाजपने न मागताच एकतर्फी पाठिंबा जाहीर केला होता. अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री सध्या महायुतीत आहेत आणि सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचा ह्या विलिनीकरणाला विरोध आहे. म्हणूनच अजितदादांच्या कुटुंबातील व्यक्तिला जर उपमुख्यमंत्री केले तरच त्यांच्या राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, कार्यकर्ते एकत्र राहतील. कारण राष्ट्रवादीच्या सगळ्या घटकांना एकत्र आणायचे म्हणजे विचारधारा, पक्षसंघटना, पक्षशिस्त ह्याचा काही उपयोग नाही, तर घराण्याची मान्यता आवश्यक आहे. जर घराण्याशी एकनिष्ठ राहिलो तरच आपला निभाव लागेल हे ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत आहे. जरी सुनेत्रा पवारांना फारसा अनुभव नसला, प्रशासकीय कामाची माहिती नसली तरीही त्या दोन वर्षापूर्वीच राज्यसभा सदस्य झाल्या आहेत. अजितदादांची दोन्ही मुले पार्थ आणि जय, दोघांनाही फारसा राजकीय अनुभव नाही. त्यातल्यात्यात पार्थ पवार निवडणुकीला उभा राहिला होता, पण त्यात तो पराभूत झाला. नाही म्हणायला त्याने आईच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. पण अलीकडेच पुण्यातील महार वतन जमीन प्रकरणात त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळेच सुनेत्रा पवारांच्या नावाला सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी मान्य केली आहे. सुनेत्रा पवार ह्यांनीही होकार दिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील हे निश्चित आहे आणि भाजपही आम्ही काही वेगळे करतोय, महिलांना संधी देतोय हे दाखवण्यात यशस्वी होईल.

भाजप

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असली तरीही ते लगेच होणार नाही. शरद पवार गटाचे अनेक नेते, एकनाथ खडसे, अंकुश काकडे विलिनीकरण व्हावे ही दादांची अखेरची इच्छा होती, असे सांगत आहेत. खरेतर आता होणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी शरद पवार ह्यांनी अजितदादांवर दिली होती आणि दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार ह्यांची राज्यसभेची मुदत येत्या 2 एप्रिलला संपत आहे. त्यावेळी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार ह्यांनी घेतला होता. राज्याची जबाबदारी अजितदादा आणि पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे ह्यांची नेमणूक करणार होते. मात्र आता अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शरद पवार काय निर्णय घेतात हे बघावे लागेल. कारण कालच त्यांनी बारामतीमध्ये नीरा नदीवर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत चर्चा केली. ह्यावरून पवार ह्यांनी आपण पुन्हा सक्रिय झालो आहोत हेच दाखवून दिले. अजितदादांनंतरची पक्षातील पोकळी भरून काढण्यासाठी स्वत: पवारच मैदानात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे.

(लेखिका वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

आडमार्गाने राज्यसभेवर पोहोचण्याचा शरद पवारांचा डाव?

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जाहीर केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेच्या ७ जागांपैकी ६ जागा महायुती सहज जिंकू शकते आणि १ जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. सगळ्या पक्षांची सदस्यसंख्या लक्षात...

नगरसेवकांतली फूट टाळण्यासाठी ठाकरेंचा निवडणुकीतून पळ!

अखेर इतक्या दिवसाच्या प्रतिक्षेनंतर भाजपच्या रितू तावडे ह्यांची मुंबईच्या महापौरपदी  बिनविरोध निवड झाली. भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका, देशाची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेचे बजेट हेच ४८ हजार कोटींचे असते, जे इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे. ४४ वर्षांनंतर प्रथमच भाजपचा...

.. तर शरद पवारांनी ताबा घेतला असता ‘राष्ट्रवादी’चा!

अखेर अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अवघ्या ४ दिवसांत सुनेत्रा अजित पवार ह्यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्यावरून आता उलटसुलट चर्चा चालू आहेत. म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्ते, त्यांचे कुटूंबीय ह्यांच्या चर्चां, वहिनींवर टीका हे तर विविध प्रसारमाध्यमातून चालूच आहे. पण, एका...
Skip to content