Homeटॉप स्टोरीशिवसेनेच्या आजच्या जाहिरातीनंतरही...

शिवसेनेच्या आजच्या जाहिरातीनंतरही भाजपा नाराजच!

शिवसेनेकडून आजही बहुसंख्य वृत्तपत्रांना जाहिराती देऊन कालची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये उफाळून आलेली नाराजी काही कमी होताना दिसत नाही. कानाच्या दुखण्याचे कारण देत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूरचा मुख्यमंत्र्यांबरोबरचा दौरा टाळला. त्यानंतर आजही त्यांनी मुंबईबाहेरचे दौरे रद्द केले. आज त्यांनी फक्त सह्याद्रीवर बैठका आयोजित केल्या. आजची अकोला सभा आणि उद्याच्या धाराशिव येथील सभेलादेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार नाहीत. विमान प्रवास टाळण्यासाठी दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या आहेत, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कालच्या जाहिरातीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेची कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. कालचा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आज झाला. पण पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

या जाहिरातीमुळे थोडे मतभेद झाले. पण पण मनभेद नाहीत. दोन सख्ख्या भावांमध्येदेखील मतभेद होतात. शिवसेना आणि भाजपा हे दोन स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे मतभेद होणे  साहजिक आहे. हा विषय आता संपला आहे. देवेंद्र पाच वर्षे मुख्यमंत्री होते. भाजपाचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून त्यांची क्वॉलिटी आहे, अष्टपैलू कामगिरी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांना घडवले. पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी, आमदार, खासदार यांचे मन दुखावले आहे. शिंदे उत्कृष्ट आहेत. पण फडणवीस यांच्याशी तुलना नको. शिंदे मोठ्या मनाचे माणूस आहेत. ज्यांनी कोणी एकनाथ शिंदेंची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली हे अचंबित करणारे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया स्वाभाविक असतील, असेही ते म्हणाले.

कालचा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आज झाला. हे युतीसाठी, आमच्या आणि त्यांच्या पक्षासाठी चांगले आहे. आमच्याकडून चूक झाली, आम्ही दुरुस्त करायला पाहिजे. त्यांनी चूक केली तर त्यांच्याकडून दुरुस्त झाली पाहिजे. पण अशा चुका दुरुस्त करुन पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. याबाबत मी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याशी बोललो आहे. शिंदे आणि फडणवीस लहान-मोठ्या भावासारखे काम करत आहे. अशा परिस्थितीत कोण ठिणगी पाडत आहेत. सरकारला नुकसान करण्यासाठी कोण काम करत आहे, यासाठी शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेणार आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शिवसेनेने सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सरस असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. आज यावर उतारा देताना शिवसेनेने पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली. या जाहिरातीत मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आनंद दिघे, केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फोटो आहेत.

शिवसेने

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, या आशयाची जाहिरात काल राज्याच्या बहुतांशी वर्तमानपत्रात झळकली खरी, पण त्यामुळे नाराज झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरचा आपला कोल्हापूरचा दौरा रद्द केला तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याचे बोलले जाते.

काल दिवस उजाडला तो शिवसेनेच्या याच जाहिरातीमुळे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे..
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजपा आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली, अशा आशयाचा मजकूर या जाहिरातीत लिहिला आहे.

या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती असल्याचे म्हटले आहे. या जाहिरातीवरून उलटसुलट चर्चा चालू असतानाच त्यामध्येच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या बैठकीतही भाजपा मंत्र्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद दाराआड शिवसेनेच्या मंत्र्यांशी चर्चा केली. आजच्या जाहिरातीवरुन शिवसेना-भाजप युतीत असलेल्या वादाबद्दल यामध्ये चर्चा झाल्याचे कळते. त्यावेळी देवेद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र दिला. कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार. सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, आपण एकत्रच आहोत. ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. युतीत खडा पडेल असे कोणतेही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका, असा सल्ला फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याचीही चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस बाहेर आले. त्यांनी माध्यमांना हात जोडले आणि ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या या सूचक मौनाची सर्वत्र चर्चा आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस शासन आपल्या दारी, हा कोल्हापूरला होणाऱ्या कार्यक्रमाला प्रकृतीच्या कारणामुळे जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या कानाच्या पडद्यांना सततच्या विमान प्रवासामुळे त्रास झालेला आहे. वैद्यकीय सल्ल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचे केसरकर म्हणाले. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जाहिरातीत काही चूक झालेली असू शकते. ती नंतर सुधारली जाऊ शकते. या सरकारमधले एक मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई म्हणाले की, ही जाहिरात शिवसेनेने दिलीच नाही तर शिवसेनेच्या कोणी हितचिंतकाने दोन्ही पक्षांमध्ये वादंग निर्माण व्हावा या हेतूने प्रसारित केली आहे. ती जाहिरात कोणी प्रसिद्ध केली आहे याची माहिती घेतली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य करताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आमचे सरकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. सर्वच प्रकल्प वेगवान सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने मला आणि देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत, आमची जबाबदारी वाढली असून आणखी कामे करू.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर मत व्यक्त करताना जनतेची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही पसंती असल्याचे दाखवले आहे आणि सरकारचे यश हे दोन्ही पक्षांच्या समन्वयामुळेच आहे असे ठासून सांगितले. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी या जाहिरातीबद्दल नापसंती व्यक्त केली. या जाहिरातीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोणी कमी दाखवण्याचा प्रयत्न करते का हे पाहिले पाहिजे. शिवसेना भाजपाच्या युतीत मिठाचा खडा कोण टाकतोय? वातावरण कोण कलुषित करण्याचा प्रयत्न करतोय हे बघणे आवश्यक आहे. ही जाहिरात पूर्णपणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content