विधानसभा सदस्यांकडून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठीही यावेळी निवडणूक अटळ असल्याचे चित्र असून भारतीय जनता पार्टीने याकरीता पाचव्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे. भाजपाने या निवडणुकीतही पंकजा मुंडे तसेच चित्रा वाघ यांना उमेदवारी नाकारली आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा पत्ता शिवसेनेने कापला आहे. भाजपानेही यावेळीही पंकजा मुंडे तसेच चित्रा वाघ यांना उमेदवारी नाकारली आहे. विनायक मेटे यांना उमेदवारी नाकारून भाजपाने मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्याचवेळी सदाभाऊ खोत यांनाही पुन्हा उमेदवारी नाकारून भाजपाने रयत संघटनेमार्फत सदाभाऊ भाजपासाठी कार्यरत राहतील, याची काळजी घेतली आहे. काँग्रेसने मुंबईतल्या उमेदवारांना संधी देऊन महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्ते अजून गुलदस्त्यातच आहेत.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होणार आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपाचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २८ मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह ११२ आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी ५४, शिवसेनेकडे ५६ तर काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत.
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेसाठीही भाजपाने एक जादा उमेदवार जाहीर केला आहे. भाजपाच्या वतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना संधी दिली आहे. पक्षसंघटनेत काम करणारे उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देऊन भाजपाने कार्यकर्त्यांना कष्टाचे चीज होते, हा संदेश दिला आहे. याच प्रक्रियेत पक्षाने पंकजा मुंडे तसेच चित्रा वाघ यांना उमेदवारी दिली नाही. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राम शिंदे यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यातील चार जणांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. खापरे उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत.
शिवसेनेने त्यांचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई तसेच दिवाकर रावते या दोघांनाही पुन्हा संधी देणे टाळले आहे. त्यामुळे उद्योगमंत्री असलेले सुभाष देसाई यांना सहा महिन्यांनंतर आपल्या पदावरून पायऊतार होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यांच्याऐवजी पक्षाने वरळी विधानसभेची जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोकळी करणाऱ्या सचिन अहिर तसेच नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेपाठोपाठ पक्षसंघटनेतल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन शिवसेनेने संघटनेलाही महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. दुसऱ्या जागेसाठी मात्र त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी तसेच इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला बळ देण्यासाठीच नेतृत्त्वाने जगताप आणि हंडोरे यांना संधी दिली असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने मात्र अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच अलिकडेच राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत.

