रामचंद्र काशीनाथ तथा रामभाऊ म्हाळगी! भारताच्या या थोर सुपूत्राची आज (९ जुलै) जन्मशताब्दी सुरू झाली. वर्षभर रामभाऊ म्हाळगी यांच्या संदर्भात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची आखणी, आयोजन होणार यात वाद नाही. रामभाऊ म्हाळगी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून केरळमध्ये काम केले. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्त्या झाल्यानंतर रा. स्व. संघावर बंदी आली, तेव्हा रामभाऊंनी भूमिगत राहून कार्य केले.
संघाची वैचारिक बैठक असलेले रामभाऊ भारतीय जनसंघाचे विधानसभेवर निवडून आलेले पहिले आमदार. त्यांनी जनसंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली. १९७५ साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली आणि रा. स्व. संघ, जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोक दल, संघटना काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. १९७७ साली परिस्थितीची जाणीव झाली आणि इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित केल्या.
काँग्रेसच्या तरुणतुर्क नेत्यांनासुद्धा इंदिराजींनी तुरुंगात डांबल्यामुळे तुरुंगातून बाहेर पडलेल्या तमाम नेत्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली जनता पक्षाची स्थापना केली. पण तत्पूर्वी लोकसभेच्या निवडणुका या सर्वांनी भारतीय लोक दलाच्या ‘नांगरधारी शेतकरी’ या चिन्हावर लढविल्या. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातील जनसंघाचे आमदार रामभाऊ म्हाळगी यांना समाजवादी नेते दत्ता ताम्हाणे यांच्याऐवजी ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. दत्तांनी मनाचा मोठेपणा दाखवीत रामभाऊंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.

नांगरधारी शेतकरी निशाणी घराघरात, मनामनात पोहोचली. माझे पिताश्री वसंतराव त्रिवेदी त्यावेळी जनता पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष असल्याने रामभाऊ म्हाळगी यांच्याबरोबर आमचा निकटचा संबंध प्रस्थापित झाला. आहुति हे वसंतराव त्रिवेदी यांचे साप्ताहिक. वसंतराव जरी पक्षीय राजकारणात असले तरी आहुतिला त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या वळचणीला बांधले नाही. रामभाऊ म्हाळगी ठाण्याचे खासदार झाल्याने त्यांनी ‘आहुति’साठी स्वतःच्या हस्ताक्षरात लोकसभेतील कामकाज पाठविण्यास सुरुवात केली. आहुतिमध्ये ‘संसदेत रामभाऊ’ हे सदर सुरू करण्यात आले. जेवढी वर्षे रामभाऊ खासदार होते तेवढी वर्षे आहुतिमध्ये नियमितपणे हे सदर सुरू होते.
जनता पक्षाची स्थापना कशी आणि का? याची सविस्तर माहितीसुद्धा रामभाऊंनी आम्हाला सांगितली होती. इंदिरा गांधी यांच्या मेहेरबानीने तुरुंगात गेलेल्या सर्वच नेत्यांनी चर्चा केली. आपण भिन्न विचारांचे असलो तरी आपली मते किती टक्के जुळताहेत आणि मतभेद किती टक्के आहेत? नव्वद टक्के मते जुळतात आणि मतभेद केवळ दहा टक्के आहेत. मग जुळणाऱ्या नव्वद टक्के मतांनी आपण एकत्र येऊ. हा विचार करुन समाजवादी, जनसंघ, भारतीय लोक दल आणि संघटना काँग्रेस तसेच चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत या काँग्रेसमधील तरुण तुर्कांनी जनता पक्ष स्थापन केला. रामभाऊ म्हाळगी यांनी ही इत्थंभूत माहिती आम्हाला सांगितली.
रामभाऊ म्हाळगी यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ भाईंदर येथे केशवसृष्टीत ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ स्थापन करण्यात आली. या प्रबोधिनीचा उद्देश राजकारणात सुसंस्कृत नेते निर्माण व्हावेत. एक चांगली शाळा म्हणून राजकारण्यांसाठी या प्रबोधिनीचा उपयोग व्हायला हवा. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विनय सहस्रबुद्धे यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे या प्रबोधिनीची धुरा वाहताहेत. या नेत्यांकडून सर्वच राजकीय कार्यकर्त्यांना चांगल्या अपेक्षा आहेत.
या वर्षात रामभाऊ म्हाळगी यांचे विचार, त्यांची संसदीय कामगिरी समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीबरोबरच महाराष्ट्र विधानमंडळातील ‘वि. स. पागे संशोधन आणि अभ्यास केंद्रा’ने पुढाकार घ्यावा ही अपेक्षा योग्य राहील असे वाटते. रामभाऊंना विनम्र अभिवादन!

