Homeमुंबई स्पेशलमाहिम समुद्र किनारा...

माहिम समुद्र किनारा झाला सुंदर.. आदित्य ठाकरेंनी केले लोकार्पण!

मुंबईच्या विशेषतः माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असा माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्‍याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते आज सायंकाळी करण्यात आले.

मुंबई महापालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाच्‍या वतीने माहिम समुद्र किनारी पर्यावरणपूरक असे सौंदर्यीकरण करण्‍यात आले असून मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण आता खुले झाले आहे.

या लोकार्पण प्रसंगी मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर, स्‍थानिक आमदार सदा सरवणकर, स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य, नगरसेविका श्रद्धा जाधव, अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उपायुक्‍त (परिमंडळ २) हर्षद काळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) प्रणय अशोक, जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर आदी मान्‍यवर उपस्‍थ‍ित होते.

जी/उत्तर विभागातील माहिम रेतीबंदरचा परिसर पूर्वी बहुतांशी अवजड वाहनांच्या अनधिकृत वाहनतळाने व्यापलेला होता. सोबत, किनाऱ्याच्या उत्तरेकडील भाग तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामे, झोपड्या यामुळे बाधित होता. दक्षिणेस माहिम पोलीस वसाहतीची भिंत मोडकळीस आलेली होती. समुद्र किनाऱ्यालगत कचऱ्याचे ढीगदेखील जमा होत होते. त्यातच समुद्र किनाऱ्यावर लहान-मोठ्या स्वरुपाचे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले होते.

पालिका आणि पोलीस प्रशासनाने सातत्याने उपाययोजना आणि कार्यवाही करुनही या समस्या वारंवार उद्भवत होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे किनारा संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने किनाऱ्याची धूप होण्यापासून रोखण्याचे आव्हान निर्माण झाले होते. एकूणच, वारंवार उपाययोजना करुनही माहिम रेतीबंदर समुद्र किनाऱ्याचे विद्रुपीकरण होत होते. या सर्व समस्यांचा विचार करता, त्यावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी तसेच माहिम समुद्र किनाऱ्याचे संवर्धन करण्यासाठी माहिम समुद्रकिनारा सौंदर्यीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला.

सर्वप्रथम, माहिम समुद्र किनाऱ्यावरील सुशोभिकरणास बाधित होत असलेल्या ५ झोपडीधारकांना पर्यायी जागा देऊन सदर झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. तसेच, समुद्र किनाऱ्यालगतचा संपूर्ण कचरा तसेच नको असलेले दगड इत्यादी हटवण्यात आले. संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.

यानंतर, किनाऱ्यावर पूर्वी झालेली धूप लक्षात घेता, निर्माण झालेली खोली भरुन काढण्यासाठी आणि भविष्यात धूप होऊ नये, यासाठी संपूर्ण माहिम समुद्र किनाऱ्यावर तब्बल ५ फूट उंचीपर्यंत वाळू पसरविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाच्या कामातून उपलब्ध होणारी वाळू आणल्याने त्यासाठी पालिकेवर वेगळा आर्थिक भार पडलेला नाही.

समुद्र किनारा संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यात आली असून या भिंतीवर माहिम परिसरासह मुंबईची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दर्शविणारी ललित चित्रे रेखाटण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर म्हणून, तळहातामध्ये झाड जपल्याचे सुंदर असे नैसर्गिक शिल्पदेखील साकारण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन सुरक्षित हातांमध्ये असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

किनाऱ्यावर विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये वादळी हवेचा वेग कमी करण्याची क्षमता असणारे सुरु या झाडाच्या २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. सोबत, टिकोमाची ३५० आणि चाफ्याची २०० तर बांबूची ३०० रोपे लावण्यात आली आहेत. संपूर्ण सुशोभित किनाऱ्याभोवतीदेखील बांबूचे कुंपण लावण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी लावण्यात आलेले व्यायामाचे साहित्य व उपकरणे इत्यादीदेखील लाकडापासून बनवलेले आहे.

या समुद्र किनाऱ्यावर दगडाची पायवाट बनविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना किनाऱ्यावर सुलभतेने फिरता येईल. तसेच, माहिम किनारा परिसर न्याहाळता यावा, म्हणून सुमारे ३० मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा (Viewing Tower)देखील उभारण्यात आला आहे. या मनोऱ्यावरुन वांद्रे-वरळी सागरी सेतूसह अरबी समुद्राचे मनोहारी दृश्य पाहता येते. एकूणच, माहिम समुद्र किनाऱ्याचे एकप्रकारे पुनरुज्जीवनच करण्यात आले असून ही कामे करताना पर्यावरण पूरक, पर्यावरण संवर्धक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन रुप धारण केलेला संपूर्ण माहिम किनारा हा नैसर्गिक अनुभूती देणारा ठरत आहे. जवळपास ४ कोटी रुपये खर्च करुन हे संपूर्ण सुशोभिकरण करण्यात आले आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना माहिम समुद्र किनारा आता खुणावणार, यात शंका नाही!

1 COMMENT

  1. माहीमच्या किल्ल्यातील झोपड्या काढल्या काय… मी मागे गेलो होतो तेव्हा किल्ला आतून बघता आला नव्हता…

Comments are closed.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content