Friday, November 8, 2024
Homeन्यूज ॲट अ ग्लांस‘बंद’ मागे! पवारांनी...

‘बंद’ मागे! पवारांनी नेले काँग्रेस व ठाकरेंना फरफटत!!

बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या म्हणजे शनिवारी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र बंद, आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. मात्र या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या सहकारी पक्षांना सोबत फरपटत नेल्याचे चित्र दिसून आले.

महाविकास आघाडीच्या या प्रस्तावित ‘बंद’ला एड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत उद्याचा हा बंद बेकायदेशीर ठरवला होता. कोणत्याही राजकीय पक्षाला ‘बंद’च्या माध्यमातून जनतेला वेठीस धरता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. न्यायालयाचा हा निर्णय येताच शरद पवार यांनी आपल्याबरोबरच्या सहकारी पक्षांना विचारात न घेता ‘एक्स’वर ट्विट करत उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले.

पवार

बदलापूरमधली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याविरोधात जनभावना प्रक्षुब्द्ध आहेत. या भावना लक्षात घेत घटनेचा मूलभूत अधिकार वापरत आम्ही उद्या बंदची हाक दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याइतका पुरेसा वेळ नसल्यामुळे आम्ही या बंदमधून माघार घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. न्यायसंस्था संविधानात्मक असल्यामुळे या संस्थेच्या निर्णयाचा पुरेपूर आदर राखला जाईल, अशी मल्लिनाथीही पवार यांनी केली.

पवार यांच्या या भूमिकेपाठोपाठ लगेचच काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एका तासात यावर काँग्रेस निर्णय घेईल, असे स्पष्ट केले. मात्र काही मिनिटांतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांच्या ताज्या भूमिकेला साथ दिली. न्यायालयाने दिलेला निर्णयाविरुद्ध आम्ही जाणार नाही. लोकांना त्यांचा आक्रोश व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो केला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही, असे ते म्हणाले. आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाही. मात्र त्याऐवजी सकाळी 11 ते दुपारी बारा वाजेपर्यंत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तसेच काळे झेंडे फडकवत आम्ही निषेध व्यक्त करू असे पटोले म्हणाले.

पवार

दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी सात वाजता आपली भूमिका स्पष्ट करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची भूमिका स्पष्ट होण्याआधीच शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना एकाकी पाडले. त्यांनी नाना पटोले यांनी जाहीर केलेल्या निषेधाच्या आंदोलनात पुण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध करत बसण्याचे जाहीर केले.

संध्याकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांनीही न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याइतका वेळ नसल्याने आपण बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यांनी बंद करावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्या सकाळी ११ वाजता शिवाजापार्कवर शिवसेनाभवनासमोर तोंडाला काळी पट्टी बांधून आपण निषेध आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पवार

त्याआधी काल एका पत्रकार परिषदेत उद्याच्या महाराष्ट्र बंदची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी ही विकृती विरूद्ध संस्कृतीची लढाई असल्याचे सांगितले होते. इतकेच नव्हे तर आज दुपारी न्यायालयाचा निकाल येण्याआधीच पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला की, तुम्ही बंदचा फज्जा उडवायचा प्रयत्न कराल तर लोक तुमचा फज्जा करतील हे लक्षात ठेवा. त्यानंतर न्यायालयाचा निकाल आला. शरद पवारांनी अंग काढून घेतले. त्यापाठोपाठ काँग्रेसने किनारा केला आणि बंद फसणार हे लक्षात आल्यानंतर ठाकरे यांनीही पवारांच्याच भूमिकेची री ओढून बंद मागे घेतल्याचे जाहीर केले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content