बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे 1955 साली ‘श्याम’ हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. मधु दंडवते, प्रमिला दंडवते यांनी निवडणुकीत युती केली होती. मग ती महापालिका असो की लोकसभा. शिवसेना आणि समाजवादी हातात हात घालून काम करीत होते.
बाळासाहेब ठाकरे जातपात मानत नव्हते. ‘रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न’ ही संकल्पना त्यांनी स्पष्टपणे मांडली होती. मनोहर जोशी यांना ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री किंवा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडले नव्हते तसेच नारायण राणे यांना मराठा, लीलाधर डाके-गणेश नाईक यांना आगरी म्हणून आणि छगन भुजबळ यांना माळी म्हणून… त्यांची कार्यक्षमता पाहून पदे दिली होती. मुस्लिम नेते साबिर शेख यांना राज्याचा कामगार मंत्री बनविला. ठाकरे मुसलमानांविरोधात नव्हते तर पाकधार्जिण्यांच्या विरोधात होते. मोहम्मद अझरुद्दीनची म्हणूनच त्यांनी वाखाणणी केली होती. पाक क्रिकेटपटू जावेद मियाँदादसुद्धा ‘मातोश्री’वर येऊन वाहव्वा करुन गेला होता. हुसेन दलवाई, वसंत चव्हाण यांच्यासह अनेकांनी या भूमिकेचं कौतुक केलं होतं.
मला आठवतं, १९ जून १९६६ यादिवशी बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी ‘शिवसेना’ या संघटनेची स्थापना केली. ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत शिवसेनेनं आपलं स्वरुप दाखवायला सुरुवात केली होती. बाळासाहेबांवर प्रादेशिकवादाचे आरोप होऊ लागले. शिवसेनेने आपली सुवर्ण महोत्सवी वर्षाची झंझावाती वाटचाल पूर्ण केली आहे. एकचालकानुवर्ती संघटनेची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दिमाखदार नोंदही केवळ आणि केवळ शिवसेनेचीच आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे शिवसेना आज आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतरही राज्य सरकार आणि कित्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये सत्तास्थानी आहे. केंद्रातसुद्धा त्यांनी सत्तास्थान भूषविले होते.
एन. टी. रामाराव यांनी तेलुगु भाषेच्या अस्मितेसाठी तेलुगु देसम् स्थापन केला आणि अवघ्या नऊ महिन्यात तो आंध्र प्रदेशात सत्तेवर आणला. पण मराठी स्वाभिमान टिकविणाऱ्या शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी १९६६पासून १९९५पर्यंत वाट पहावी लागली. बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळत असतं. १९९५ ते १९९९ या दरम्यान निव्वळ शिवसेनेची एकहाती सत्ता नव्हती. शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युतीची सत्ता होती. २५ सप्टेंबर २०१४ रोजी ही युती तोडण्याची घोषणा झाल्यानंतर १५ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे एकटे महाभारतातल्या कुरुक्षेत्रावरच्या अभिमन्यूसारखे लढले आणि ६३ आमदार विधानसभेवर निवडून पाठविण्यात यशस्वी ठरले.
२८८च्या विधानसभेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते म्हणून केवळ जनमताचा कौल शिरोधार्य मानून तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपली खुर्ची टिकवण्यासाठी जी साद घातली तिला प्रतिसाद म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ डिसेंबर २०१४ रोजी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्राप्रमाणेच आजवर भूमिका यथायोग्य पार पाडली. शिवसेनेने अनेक वादळे, असंख्य आव्हाने, अगणित संकटे पचवलीत, परतवून लावलीत आणि ‘सामना’ही केला.
शिवसेना ही जगाच्या पाठीवरची अशी एकमेव संघटना आहे की ज्या संघटनेने आपल्या पन्नास पंचावन्न वर्षांच्या यशस्वी वाटचालीत अनेकांना लाल दिवा मिळवून दिला. पण स्वतः या लाल दिव्याचा मोह बाळगला नाही. अगदी आपली अर्धी हयात काँग्रेसमध्ये घालवूनही ज्यांना त्यांच्या हायकमांडने देण्याची दानत दाखविली नाही अशांनाही बाळासाहेबांनी सत्तेची फळे चाखण्याची संधी मिळवून दिली. बाळासाहेबांवर सडकून टीका करण्याचं काम मीडिया अव्याहतपणे करीत आली. पण त्याच मीडियामधल्या एक-दोन नव्हे तर तब्बल सहा पत्रकारांना संसदेत पाठवण्याचं धारिष्ट्य बाळासाहेबांनी दाखवलं.
१९९५ साली बाळासाहेबांवर दोन कौटुंबिक आघात झाले. आधी तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना काळाने हिरावून नेलं आणि नंतर चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांना रस्ता अपघातात आपले प्राण गमवावे लागले. मधल्या काळात त्यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रियाही झाली. अनेक संकटं लीलया झेलणाऱ्या या झुंझार सेनापतीनं १७ नोव्हेंबर २०१२ रोजी या जगाचा निरोप घेतला. १७ आणि १८ नोव्हेंबर २०१२ हे दोन दिवस केवळ मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या विश्वाने चमत्कार पाहिला. ज्या शिवतीर्थानं बाळासाहेबांच्या लाखोंच्या घणाघाती सभा अनुभवल्या त्याच शिवतीर्थानं हा झुंझार सेनापती आपल्या कुशीत चिरनिद्रेसाठी विसावताना पाहिला. सत्तेचं कोणतंही पद न भूषविणाऱ्या या नेत्याला शासकीय तोफांची अंतीम सलामी स्वीकारतानाही अवघ्या विश्वानं पाहिलं. आज त्यांच्या निधनाला १० वर्षे झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा!!