ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग मिळेपर्यंत पोहोचायला प्रत्येक खेळाडू किती प्रकारचे सराव आणि तणाव सांभाळत असतो ते ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे..’. हे खरे असले तरी सर्वोत्तम शारीरिक आणि मानसिक स्थिती कायम ठेवण्यासाठी ज्या वयापासून हे खेळाडू सुरुवात करतात त्यापूर्वी त्यांना सतावणारे काही रोग त्यांची पाठ सोडत नाहीत. अशावेळी त्या जुनाट रोगांवर मात करून आपली कामगिरी कायमच नव्हे तर उंचावण्यासाठी खास मानसिकता असावी लागते, यात शंका नाही. त्यातच जेव्हा तुम्ही आपल्या शरीराला आणि मनाला मर्यादेपेक्षा अधिक ताण देता तेव्हा साहजिकच त्यामधील वेदना सहन कराव्या लागतात. २०२३मधील एका अभ्यासावरून असे दिसते की, किमान १५ ते ३० टक्के ऑलिम्पिक खेळाडूंना दम्याचा विकार असतो. काही खेळांसाठी तर ही टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत असू शकते.
यात सर्वात नेहमीच्या असतात त्या इजा आणि दुखापती. त्याशिवाय ऑलिम्पिक गावामध्ये किमान १४ हजारांहून अधिक खेळाडू आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अधिकृत प्रशिक्षक तसेच डॉक्टर्सदेखील आवश्यक असतात. हे सगळे असले तरी कोणताही संसर्ग होऊच शकणार नाही असेही नसते. त्यामुळे त्यासाठीही प्रत्येक खेळाडू आणि त्याचे प्रशिक्षक डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतात. या सगळ्यात एक आजार हा अनेक खेळाडूंसाठी समान असतो आणि त्याचे नाव कदाचित आपण ओळखू शकणार नाही. हा आजार असतो ‘दमा’. एकूण खेळाडूंपैकी किमान २० टक्के खेळाडू या विकाराने ग्रासती होते आणि तरीही त्यांनी १९९६च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. हिवाळ्यातील ऑलिम्पिकमध्ये ही टक्केवारी वाढती असते.
दमा हा विकार अनेक प्रकारांनी माणसाला आणि जलतरण करणाऱ्यांना त्रास देत असतो. कदाचित लवकर लक्षात येत नसावा म्हणून असेल पण दमा हा जुना झाल्यानंतरच आपण त्यावर लक्ष देत असू. याचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिबंधक प्रतिसादाशी संबंधित असतो. हवेतले प्रदूषण आणि त्यामधील अतिशय सूक्ष्म असे कण या विकारासाठी कारणीभूत असतात. यामुळे वायूनलिका आकुंचन पावते. या विकाराने जगात दररोज किमान एक हजार लोक मृत्युमुखी पडतात अशी आकडेवारी मिळते.
खेळाडूंमध्ये दम्यासारखी अवस्था त्यांच्या व्यायामामुळेदेखील निर्माण होऊ शकते असे दिसले आहे. कारण यात श्वास जलद गतीने होण्याची आणि थकवा येण्याची शक्यता असते. एक कारण म्हणून फुफ्फुसांमध्ये हवेचा प्रभाव वाढतो असेही म्हटले गेले असले तरी अजून यावर निश्चित असे काहीही सांगितले गेलेले नाही. खास करून जलतरण करीत असताना जलतरणपटू अधिक वेगाने श्वास घेतात आणि थंड हवामानाच्या काळात हा प्रकार वाढतो. पण उन्हाळी स्पर्धांमध्येही हा प्रश्न खेळाडूंना त्रास देतोच.
पाण्याशी संबंधित इतर खेळांपेक्षा जलतरणपटूंवर याचा परिणाम अधिक होतो याचे कारण म्हणजे पोहताना ते क्लोरीन घातलेल्या तलावातील पाण्याचे सूक्ष्म तुषार आपल्या श्वासातून फुफ्फुसात घेत असतात आणि त्याचा फुफ्फुसांना निश्चित असा त्रास होतो. दमा हा रोग आणि त्याचा संबंध माहिती असूनही जलतरण स्पर्धांमध्ये तरुण जिद्दीने भाग घेतात. त्यांचे कौतुकच केले पाहिजे.