पूजा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात गाजत राहिलेले वनमंत्री यांचा मंत्रीपदाचा राजीनामा आज अखेर मंजूर झाला. रविवारपासून दाबून ठेवलेला राठोड यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टीच्या दबावानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. तेथे तो लागलीच मंजूर करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते, असे राजभवनाकडून सांगण्यात आले.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. राठोड यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी केली जात होती. भाजपा नेत्यांनी या प्रकरणातील अनेक पुरावे
जनतेसमोर उघड केले होते. तरीही मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठिशी घालत होते. या काळात वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही राठोड यांनी केला. अखेर तब्बल २० दिवसांनंतर रविवारी, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला. या राजीनाम्याचे काय करणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला असता तो फ्रेम करण्यासाठी ठेवलेला नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा आपल्याकडेच ठेवला होता.
राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविलाच गेला नसल्याचे लक्षात येताच भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यातच कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. तशी एक व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांत फिरू लागली. त्याबरोबर जारकीहोळी यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ठाकरे यांच्यांवरील दबाव वाढला आणि त्यांना राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवावा लागला. आज दुपारी त्यांनी तो राजभवनाकडे पाठविला आणि राज्यपालांनी तो लगेचच मंजूर केला.