Homeटॉप स्टोरीआशाताईंवर आज संध्याकाळी...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशाताईंचे पुत्र, आनंद भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आई आज (रविवारी) गेल्या. उद्या, सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत लोअर परेल येथील ‘कासा ग्रँड’ या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.” शासकीय इतमामात आशाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आशाताईंना श्रद्धांजली देताना राज्य सरकारने आजचे सर्व शासकीय तसेच करमणुकीचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

शनिवारी, ११ एप्रिल रोजी, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आशाताईंना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या नातीने, जनाई भोसले हिने, आशाताईंना “अत्यंत थकवा” आणि “छातीचा संसर्ग” (चेस्ट इन्फेक्शन) यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली होती. सकारात्मक अपडेट देऊ, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, रविवारी दुपारी डॉक्टरांनी आशाताईंच्या निधनाची औपचारिक घोषणा केली. उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी सांगितले की, “आशा भोसले यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात काही वेळापूर्वी अखेरचा श्वास घेतला. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले.”

आठ दशकांचा अद्वितीय स्वरप्रवास

८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताईंनी संगीत क्षेत्रात आठ दशकांहून अधिक काळ अतुलनीय कार्य केले. वयाच्या दहाव्या वर्षी ‘चला चला नव बाळा’ या मराठी चित्रपट गाण्याने सुरू झालेला त्यांचा प्रवास अखेरपर्यंत अव्याहत सुरू राहिला. त्यांनी मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी यांसह अनेक भारतीय भाषांत गाणी रेकॉर्ड केली. आपल्या ८ दशकांहून अधिक कारकिर्दीत आशाताईंनी १२,५००हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने २०११मध्ये त्यांना जगातील सर्वाधिक रेकॉर्डेड कलाकार म्हणून मान्यता दिली.

संगीतातील वैविध्य – आशाताईंचे सर्वात मोठे सामर्थ्य

भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्रसंगीत, लोकगीते किंवा पॉप – संगीताच्या प्रत्येक प्रकारात आशाताईंनी आपला अनोखा ठसा उमटवला. त्यांनी ‘उमराव जान’ (१९८१) या चित्रपटासाठी गायलेल्या ‘दिल चीज क्या है’ आणि ‘इन आँखों की मस्ती के’ या गझलांसाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवला, तर ‘मेरा कुछ सामान’ या गाण्यासाठी ‘इजाजत’ (१९८७) चित्रपटात दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आशाताईंनी २०२६मध्ये ब्रिटिश व्हर्च्युअल बँड ‘गोरिलाझ’च्या नवव्या स्टुडिओ अल्बमवरही काम केले होते – वयाच्या ९२व्या वर्षीही त्यांची संगीत साधना सुरू होती.

पुरस्कार व सन्मान

त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. २००० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार तर २००८मध्ये पद्मविभूषण या सन्मानाने भारत सरकारने त्यांना गौरवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content