कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहयोगाने, आसियान (ASEAN) मधील भारतीय मिशन अंतर्गत इंडोनेशिया येथे 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आसियान-भारत भरड धान्य महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला आहे. 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणारे लाइव्ह कुकिंग कार्यशाळा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल.
इंडोनेशियामध्ये दक्षिण जकार्ता येथील कोटा कासाब्लांका मॉल या खरेदीच्या महत्वाच्या ठिकाणी महोत्सवाचे उद्घाटन सत्र पार पडले. या महोत्सवाचा भाग म्हणून भरड धान्यांवर (मिलेट) केंद्रित प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, यामध्ये भरड-धान्य आधारित शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), स्टार्टअप्स आणि भारतीय शेफ्स यांचा सहभाग आहे.
यंदा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे होत आहे. त्या अनुषंगाने, ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आसियान सदस्य देशांमध्ये जागरूकता वाढवणे आणि भरड धान्ये आणि भरड धान्य-आधारित उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
महोत्सवासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून, ते भारतीय भरड धान्य परिसंस्थेशी संबंधित विविध व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करत आहे. यामध्ये शेफ्स, स्टार्ट-अप्स, शेतकरी उत्पादक संस्थांचे (FPOs) प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील धुरीण, राज्य सरकारांचे अधिकारी आणि इतर व्यावसायिकांचा समावेश आहे.
23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणारे लाइव्ह कुकिंग कार्यशाळा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल, ज्यामध्ये भारत आणि इंडोनेशिया मधील सेलिब्रिटी शेफ्स फॉक्सटेल मिलेट ताबूले, मिश्र मिलेट मठरी कॅनोपीज, मिलेट रिसोतो, मिलेट दही भात, रागी ब्राउनी आणि कुकीज यासारख्या भरड धान्यांची पोषण क्षमता सिद्ध करणाऱ्या, विविध पाककृती सादर करतील. सेलिब्रिटी शेफ्स विनेश जॉनी, रिस्मा विद्यास्तुती, अनाहिता धोंडी, सब्यसाची गोराई आणि अंबिका जोहर या कार्यशाळांमध्ये दररोज नवीन पदार्थ सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील.
महोत्सवातील आजच्या दिवसाची सांगता आशियाई संकल्पनेवरील भरड धान्यांवर आधारित मेजवानीने झाली, ज्यामध्ये बाजरीचे अष्टपैलुत्व आणि पोषण मूल्य प्रदर्शित करण्यात आले.