केवळ पगाराच्या भरवशावर समाधान मानणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आनंद लिमये यांच्या मुलाने म्हणे त्यांना एकदा विचारले होते की, बाबा तुम्ही तलाठी कधी होणार आहात? जसे सध्या अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बायका त्यांना विचारताहेत की, वाझे यांच्या जागी तुमचे पोस्टिंग करून घेणे तुम्हाला शक्य आहे का? अनेक मुख्याध्यापकांच्या बायकाही त्यांना सांगतात की सोडून द्या हेड मास्तरकी आणि व्हा तुम्ही मास्तर. चार तास शिकवले की शिकवण्या घ्यायला, भरपूर पैसा मिळवायला तुम्ही मोकळे. मंत्री वडेट्टीवारांच्या पत्नी म्हणे अलीकडे तावातावाने त्यांना म्हणाल्या की, सोडा ती नामदारकी आणि व्हा एखाद्या मालामाल होणाऱ्या मंत्र्यांचे खाजगी सचिव, त्या संजीव पालांडेसारखे. अनिल देशमुख प्रकरणामुळे हे सारे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राज्याचे हे असे होणारे वेगाने अधःपतन, उद्या कदाचित अनेक घरातले नवरे आपल्या बायकांना सांगतील, सोड ती लॉयल्टी माझ्याशी आणि जाऊन ये चार घरी. तत्त्व आणि सत्त्व संपले की असे घडायला वेळ लागत नाही, जे अतिशय झपाट्याने या राज्यात घडते आहे. कारण, ज्यालात्याला तेही प्रचंड प्रमाणावर, खोऱ्याने पैसा कमवायचा नव्हे, त्यातून नको नको ते शासनात, प्रशासनात, या राज्यात प्रत्येक राजकीय पक्षात घडते आहे. या चार दशकात पत्रकारिता करताना आम्ही अनेकांशी पंगा घेतला. पण, कधीही घाबरायला झाले नाही जे अलीकडे आम्हालाही कधी नव्हे ते लिखाण करताना घाबरायला होते. कारण सत्तेतली आणि सत्तेशी संबंधित बहुसंख्य मंडळी बदला घेण्यासाठी कोणतीही लेव्हल विचार न करता गाठू लागलेली आहे. कफन बांधून लिखाण करणे सुरू आहे..
अगदी सुरुवातीपासून म्हणजे उद्धव शिवसेनेत ऍक्टिव्ह झाल्यापासून किंवा सेनेच्या माध्यमातून राजकारणात ते उतरले तेव्हापासून, जेव्हा केव्हा वेळोवेळी बहुसंख्य, असंख्य त्यांना अंडरएस्टीमेट करायचे, तेव्हा तेव्हा मी असेन किंवा नुकतेच वर गेलेले अनंत तरे किंवा दिवाकर रावते, सुभाष देसाई इत्यादी बोटावर मोजता येतील अशा नेत्यांनी किंवा माझ्यासारख्या काही पत्रकारांनी याच उद्धव ठाकरे यांना कधीही कमी लेखले नाही, नेमके आमचेच म्हणणे खरे ठरायचे. म्हणजे इतरांचे उद्धव यांच्याविषयी भाकिते व अंदाज खोटे ठरायचे आणि आम्ही सांगत असू त्या पद्धतीने उद्धव प्रत्येक राजकीय खेळीत प्रचंड यशस्वी होऊन बाहेर पडायचे. पण, यावेळी म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मी पुन्हा जे त्यांच्याविषयी सांगितले, लिहिले होते ते माझे सारे अंदाज खोटे ठरले आहेत. खोटे ठरणार आहेत.
क्रिकेटच्या मॅचमध्ये जसे त्या अंपायरचा निर्णय चुकल्यानंतर तो सर्वांदेखत माफी मागतो त्याच पद्धतीने याठिकाणी मी तुमची माफी मागतो. कारण, स्वर्गातून थेट ब्रह्मदेव किंवा बाळासाहेब खुद्द जरी खाली आले आणि म्हणाले की, आम्ही पुन्हा सेनेला व उद्धव यांच्या नेतृत्त्वाला गतवैभव मिळवून देतो तरीही ते यापुढे काही वर्षे शक्य होणारे नाही. उद्धव यांनी मुख्यमंत्री होऊन आणि त्याचवेळी पट्टराणी भाजपाला दूर सारून आणि जी कधीही त्यांची होणार नाही त्या काँग्रेस व राष्ट्रवादीला जवळ घेऊन स्वतःच्या पायावर भला मोठा धोंडा मारुन घेतलेला आहे, ज्याचे मला आज याठिकाणी अतिशय वाईट वाटते आहे. एखादया प्रियकराची प्रेयसी त्याला सोडून शेजारच्या तरुणासंगे पळून गेल्यानंतर तो जसा सैरभैर, अस्वस्थ, निराश, नाराज दुःखी होतो, तशी माझी उद्धव यांच्या या अशा चुकीच्या वागण्याने दारूण व करूण अवस्था झालेली आहे.
जे माझे उद्धव यांच्याविषयी मन निराश झाले आहे, तेच शिवसेनेतल्या बहुतांशी सैनिकांचे आणि नेत्यांचे म्हणणे व सांगणे आहे. अस्वस्थ दिवाकर रावते किंवा रामदास कदम किंवा चंद्रकांत खैरे यांच्यासारखे करिअरचा विचार न करता सांगून, बोलून मोकळे झाले आहेत. इतर बोलत नाहीत. तोच काय तो फरक. पण, यावर उद्धव आणि कुटुंबियाने स्वतःला काही बाबतीत वेळीच आवर घातली नाही तर उद्या राज ठाकरे आणि भाजपा यांचे महत्त्व वाढेल व शिवसेना बहुतेकांच्या मनातून उतरलेली असेल, जे अजिबात घडता कामा नये.
अगदी अलीकडे अनंत तरे गेल्यानंतर अगदी रडवेल्या चेहऱ्याने मला त्यांच्या घरातल्यांपैकी कोणी सांगत होते की, ज्या अनंत यांनी उद्धव यांना त्यांच्या अतिशय कठीण दिवसात तन, मन, धनाने साथ दिली, ते गेल्यानंतर हेच उद्धव त्यांच्या दारावर साधे दुःख व्यक्त करायलादेखील फिरकले नाहीत. एवढेच नव्हे तर फोन करूनदेखील त्यांनी घरातल्यांचे सांत्वन केले नाही. या अशा एक ना अनेक चुका, सेनेतला जो तो मनातून अस्वस्थ व अशांत आहे, हे शंभर टक्के खरे आहे त्यातून मोठा स्फोट सेनेत घडण्याची दाट शक्यता असताना उद्धव यांचे काहीसे पक्षाकडे होणारे दुर्लक्ष शिवसैनिकांचा चिंतेचा व काळजीचा विषय आहे..
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांचे कायम देवानंदच्या सिनेमांसारखे असते. म्हणजे देवानंद लागोपाठ चार-पाच फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर एक सुपरहिट सिनेमा देत असे. राज ठाकरे यांची अलीकडली मुकेश अंबानीप्रकरणी झालेली पत्रकार परिषद एवढी सर्वोत्तम की राज्यातल्या प्रत्येकाने ती पाठ करावी आणि केंद्राने ती जशीच्या तशी उचलून त्या पद्धतीने निर्णय घेतल्यास राज्यातले कित्येक महनीय गजाआड असतील.
असो, अति लोभ आणि चुकीची माणसे सतत सोबतीला ठेवणे या दोन घोडचुका अनिल देशमुख यांना कायम भोवलेल्या असतानादेखील यावेळी गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्याच चुकांची पुनरावृत्ती केलेली आहे. म्हणजे दलाल, मग तो बद्री असेल की अतिभ्रष्ट संजीव किंवा नालायक राजेंद्र असेल किंवा रवी किंवा दलालाची थोर परंपरा पुढे रेटणारा चिंतन असेल किंवा विशाल. या अशा नालायकांच्या हजार चुका अनिलबाबूंना यावेळीदेखील विचित्र पद्धतीने भोवणार आहेत. आमचे हे मित्र दुर्दैवाने तुरुंगात न जावो हेच देवापुढे आता मागणे आहे.
अनिल देशमुख यांचे ते राज्यमंत्री किंवा मंत्री असताना केवळ व्हेस्टेड इंटरेस्ट ठेवल्यानेच त्या-त्या वेळी त्यांच्या टॉपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कधी जमले नाही, ज्यातून ते कायम बदनाम झाले आणि अडचणीत आले. अन्न व औषधे प्रशासन त्यांच्याकडे असताना त्यावेळेचे आयुक्त महेश झगडे अगदी उघड त्यांच्याशी पंगा घेऊन मोकळे झाले होते. सार्वजनिक बांधकाम उपक्रम खाते त्यांच्याकडे असताना सतीश गवई हेदेखील त्यांना कायम नडले. अन्न व नागरी पुरवठा खाते अनिलबाबूंकडे असताना याच अनिलबाबूंना त्यावेळेचे प्रशासकीय अधिकारी भगवान सहाय आणि अश्विनी जोशी या दोघांनीही घाम फोडला होता. आनंद कुलकर्णी तर याच अनिलबाबूंच्या कायम लक्षात राहतील.
यावेळीदेखील तेच घडले आहे. आयपीएस सुबोध जयस्वाल आणि परमबीर सिंह यांनी देशमुखांची, त्यांच्या या विविध व्हेस्टेड इंटरेस्ट्सवरूनच पार वाट लावलेली आहे. ज्यामुळे नजीकच्या काळात अनिल देशमुख यांना विविध मोठ्या संकटांना नक्की सामोरे जावे लागणार आहे. केवळ प्रेमापोटी यावेळी मला अनिल देशमुख तसेच त्यांच्या काही कुटूंब सदस्यांची आणि या अत्यंत नालायक स्टाफची अनेक असंख्य प्रकरणे माहित असतानादेखील मी शांत होतो. पण, आता या राज्याच्या गळ्यापर्यंत पाणी आल्याने माझ्याकडून शांत बसून गम्मत बघणे शक्य होईल, असे वाटत नाही. बेस्ट वे.. अनिलबाबूंनी आपणहून राजीनामा देऊन बाहेर पडावे असे मला वाटते..