Homeमाय व्हॉईसअमेरिकेची हार, नंतर...

अमेरिकेची हार, नंतर माघार आणि परिणाम.. अफगाणिस्तान अस्थिर!

वीस वर्षानंतर प्रथमच अमेरिकन सैन्य मध्यपूर्वेतील प्रचंड मोठी मोहीम संपवून परतले आहे. ही मोहीम यशस्वी झालेली नाही हे लक्षात घेता ही अमेरिकेची तितकीच मोठी हार म्हणावी लागेल. खरेतर अफगाणिस्तानात अमेरिकेला घुसण्याचे कारणच नव्हते. रशियाने अफगाणिस्तानावर हल्ला केल्यानंतर तिथे जो संघर्ष उसळला त्यात अमेरिकेने अफगाणी बंडखोरांना रशियन सैन्याच्या विरोधात लढण्यासा मदत करायला सुरुवात केली. सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संघटना जगभरात अशाच कारवाया करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या सहाय्याने अफगाण बंडखोरोना शस्त्रं पुरवणे, त्यांना प्रशिक्षण देणे असे उद्योग सुरू केले.

आपण जे पेरतो ते आपल्या विरोधातच उगवेल याची जाणीव अमेरिकेला तेव्हा झाली नाही. पण त्यांनी जे अनेक भस्मासूर निर्णाण केले ते पुढे अमेरिकेच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाले. ओसामा बिन लादेन हा अरब इसम त्यातला प्रमुख भस्मासूर ठरला. रशिया विरोधात अफगाणी मुसलमान सैन्याच्या बरोबरीने लढताना ओसामाने अमेरिकेकडून जे प्रशिक्षण घेतले त्याचा वापर त्याने अमेरिकेच्या अल कायदा संघटनेच्या माध्यमातून सुरू केला.

1989पासून अफगाणिस्तानातून रशियन सैन्य परत फिरू लागले आणि तिथे तालिबानी बंडखोरांनी सत्ता ताब्यात घ्याला सुरूवात केली. एकापाठोपाठ एक महत्त्वाची शहरे आणि प्रांत काबीज करत तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिसतानवरच कब्जा केला. सत्ता सुरू केली. त्यांनी तातडीने तिथे इस्लामी शरिया कायदा लावला. पुरुषांना दाढी वाढवणे व बायकांनी संपूर्ण अंग झाकून गेमारा बुरखा वापरणे याची सक्ती सुरू झाली. सिनेमा, टीव्ही, मनोरंजन असले उद्योग बंद झाले. बंदुकीच्या धाकावर अफगाणिस्तानातील परकीय धार्मिक पंरपरा उखडून टाकण्यात आल्या. बमियान प्रांतात बुद्ध काळातली महाप्रचंड शिल्पे होती. ती बुद्ध शिल्पे बाँब लावून उद्ध्वस्त करण्यात आली.

जगाला धक्का बसला खरा, पण तोवर अमेरिकेच्याही हातात काही उरले नव्हते. 1996पासूनच अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील हस्तक्षेपाविरोधात अल कायदाच्या हालचाली सुरू झाल्या. त्याची परिणती 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या भीषण हल्ल्यात झाली. आजवर कुणी पाहिले नव्हते अशा कल्पनातीत बाँबचा वापर ओसामा बिन लादेनच्या आत्मघातकी सैन्याने केला होता. संपूर्ण इंधनाने भरलेली मोठी व्यापारी विमाने एकाचवेळी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतली आणि त्यातील दोन विमाने न्यूयॉर्क शहरातली वर्ल्ड ट्रेड टॉवर या ट्विन टॉवरमध्ये घुसवली.

जगाचा विमानांकडे व दहशतवादी धोक्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवणारी ती भीषण घटना होती. त्या हल्ल्यात तीन हजार अमेरिकन नागरिकांचा बळी तर गेलाच पण विमान कंपन्या, विमानप्रवास हे सारेच कायमचे बदलले. त्या घटनेनंतर अल कायदाच्या प्रमुखाला, ओसामाला, ताब्यात द्या ही अमेरिकेची मागणी तालिबान्यांनी धुडकावून लावली. तेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानात लष्करी कारवाया सुरू केल्या. पुढच्या तीन वर्षांत अमेरिकेने तिथे मोठे सैन्य व शस्त्रास्त्रे उतरवली. प्रचंड मोठे युद्ध सुरू केले. अमेरिकेच्या लष्करी दबावाखाली काबूलमध्ये तथाकथित लोकशाही सरकार स्थापन झाले खरे.. पण त्या सरकारला अफगाण नागिरकांची साथ अजिबात नव्हती.

जेव्हा अमेरिकेने सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू केली तेव्हा तर ते सरकार गळपटले. मुळातच कोणाही अफगाण राष्ट्रप्रमुखांना अमेरिकेने फारसे महत्त्व दिले नाही. ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना दोहा, कतार येथे अमेरिकेने तालिबान्यांशी थेट चर्चा केल्या. त्यात अमेरिकन सैन्यमाघारीच्या तारखा ठरत असताना अफगाणचे अधिकृत सरकार सहभागी नव्हते. सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अमेरिकेत रिपब्लिकन अध्यक्ष ट्रंप पायउतार झाले व डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन  सत्तेत बसले. पण तरी अमेरिकेने एकदा स्वीकारलेले सैन्यमाघारीचे धोरण त्यांनीही पुढेच नेले.

त्यानुसार आता अमेरिकेचे सैन्य अगाणिस्तानमधून पूर्णपणे माघारी परतले आहे. मागील २० वर्षांपासून येथे सुरू असणारा अमेरिकेचा संघर्ष संपल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. तिथल्या अमेरिकन सैन्यदलाचे प्रमुख व अमेरिकचे राजदूत अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन ठरले. अमेरिकेला आणखी पुष्कळ अफगाण नागिरकांना बाहेर काढायची इच्छा होती. ते मात्र त्यांना जमले नाही. जनरल केंथ मॅकेन्झी यांनी संपूर्ण सैन्य मागे घेतल्याची घोषणा केली.

प्रथेप्रमाणे कोणत्याही मोठ्या व व्यापक अशा घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जनतेला भाषणाद्वारे त्याची माहिती देतात. तसेच बायडन यांनी केले. जन. मॅकेन्झींनी नमूद केले की, सैन्यमाघारीचे शेवटचे उड्डाण अमेरिकन वेळेनुसार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3.40 वाजता झाले व त्यायोगे अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानी लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरू केलेले मदतकार्य पूर्ण झाले आहे.

लष्करी मदतकार्य संपलं असलं तरी राजनैतिक पद्धतीने अमेरिकन आणि अफगाणी नागरिकांना मदत करणे आपण सुरूच ठेवणार असल्याचेही जन. मेकन्झी यांनी स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष  बायडेन यांनी नमूद केले की मागील १७ दिवसांमध्ये अमेरिकन लष्कराने लष्करी इतिहासातील सर्वात मोठ्या मानव कल्याण मोहिमेअंतर्गत एक लाख २० हजार अमेरिकन नागरिक, अफगाणिस्तानमधील सहकारी आणि इतरांना एअरलिफ्ट केले.  तालिबान्यांनी या घटनेचा उत्सव साजरा केला आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहोत, असे तालिबानने नमूद केले.

२० वर्षे अविरत सुरू राहिलेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानापुढे हात टेकत, सैन्य मागे घेऊन टाकले. अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला आहे. पण या महाप्रचंड लढाईची फार मोठी किंमत अमेरिकेने आणि जगानेही चुकवली. 2003पासून अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याच्या मदतीसाठी युरोपीय देशांची सैन्यदलेही दाखल झाली होती. त्यांच्याही हजारो सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकन लष्कराचे 3500 जवान मृत झाले, तर किमान वीस हजार गंभीर जखमी झाले.

शेवटचे अमेरिकन सैन्यांचे बलिदान देशातून इतरांना बाहेर काढताना घडले. दोन-तीन दिवसांपूर्वी काबूल विमानतळावर दहशतवाद्यांनी जे बॉम्बस्फोट घडवले, त्यात तेरा अमेरिकन जवान मारले गेले. या वीस वर्षांत 69 हजार अफगान पोलीस व लष्करी जवान ठार झाले. अन्य अफगाणी नागरिकांपैकीही 51 हजार ठार झाले. याच कालावधीत बंडखोर तालिबानींचेही सत्तर हजार लढवय्ये मरण पावले. पकिस्तानी नागरिक, पोलीस व लष्करी जवानांचेही मोठे नुकसान झाले. या वीस वर्षांत अमेरिकेने तब्बल 74 लख कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन केला.

या सैन्यमाघारीनंतरही अमेरिकन बंदुका, अन्य घातक शस्त्रे, काही डझन हेलिकॉप्टर व विमाने, विमानविरोधी तोफा व अन्य आधुनिक अस्त्रे असा प्रचंड मोठा लष्करी खजिना तालिबान्यांच्या हाती लागला आहे. आता या सर्व दारुगोळ्यांचा वापर जगातील अमेरिकेच्या लष्करी व नागरिक वसाहतींवर, अन्य ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी वापरणारच नाहीत असे मुळीच नाही. तालिबानी नेते जगाला ओरडून संगत आहेत की आम्ही दहशवादी कारवाया आमच्या भूमीतून सुरू होऊ देणार नाही. पण त्यांचाच पायपोस त्यांच्यात उरलेला नाही. कारण तिथे  सध्या टोळीयुद्धासारखी, यादवी युद्धासारखीच स्थिती आहे. या अस्थिरतेमधून अफगाण नागरिकांची कधी मुक्तता होणार कोण जाणे?  

Continue reading

… तर एकनाथरावांच्या जागी दादा असते मुख्यमंत्री!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती नुकतीच साजरी झाली. राजीव गांधींच्या अखेरच्या निवडणुकीच्या स्फोटक धामधुमीच्या काळात अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात अवतरले. दुर्दैवाने दादांच्या राजकारणाची आणि आयुष्याची अखेरही भयंकर स्फोटक स्थितीत झाली. 1991 ते 2026 हा कालावधी मात्र, कायम...

दिल्लीत चर्चा फडणवीसांचीच!

मराठी माणसाला फार वर्षांपासून दिल्लीचे मोठे आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या दीडशे वर्षांच्या काळात असंख्य मराठी नेत्यांनी, क्रांतीकारकांनी देशाच्या राजकारणाला वेळोवेळी आकार दिला. त्याआधी पेशव्यांनी दिल्लीचे रक्षण केले आणि मुघल बादशहाला गादीवर बसवून राज्य चालवले. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी पेशव्यांनी अन्...

शिवसेना आणि शिव्यांच्या समीकरणात नवे ते काय?

शिवसेना आणि शिव्या हे काही नवे समीकरण नाही. मूळची ठाकरेंची सेना असेल वा आता एकनाथ शिंदेंची मान्यताप्राप्त खरी शिवसेना असेल, सेनेच्या आजी-माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी जाहीरपणाने शिवीगाळ केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता मंत्री असलेल्यांच्याही तोंडी पूर्वी अनेकदा शिव्या आल्याची असंख्य...
Skip to content