Sunday, March 16, 2025
Homeडेली पल्सअंगणवाडी सेविकांना मिळणार...

अंगणवाडी सेविकांना मिळणार 1 लाखाहून जास्त स्मार्ट फोन

पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल फोन दिले जात आहेत. 2023-24मध्ये 110486 अंगणवाडी सेविका, 3899 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका, 589 तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण 1 लाख 14 हजार 974 स्मार्ट फोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. Take Home Ration Software & Migration Tracking Software तसेच राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम स्मार्ट फोनद्वारे लागू करता येतील. पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी स्मार्ट मोबाईल फोनद्वारे रियल-टाईम मॉनिटरींग पद्धतीने करण्यात येणार आहे.

यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या नोंदी स्मार्ट फोनद्वारे घेण्यात येणार असून संनियंत्रणासाठी केंद्र शासनामार्फत डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे. काल अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हातून स्मार्ट फोन मिळाला. वर्षा, या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरू होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा येथे येऊन थांबले होते.

मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती देताना, अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन्सचे वितरण झाले तर एक बहुमान मिळेल असे सांगितले. डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना लगेचच समिती कक्षात बोलावून घेऊन फोन्सचे वाटप करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रसारख्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते हा स्मार्ट फोन मिळाल्यावर या सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. डेनिस फ्रान्सिस यांनीदेखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली तसेच कार्यक्रमानंतर या सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्रदेखील काढून घेतले. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्याबद्धल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

प्रारंभी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल (ICDS) यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनस्वी मोहन काते, कविता बाबू व्हटकर, संगिता कुकरेती, शीतल लोखंडे, प्रेमा घाटगे, रजनी घाडगे, सुजाता जावळे, सीमा शिंदे यांना स्मार्ट फोन्स देण्यात आले.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content