Homeब्लॅक अँड व्हाईटमोकळ्या वातावरणातले चित्रपट...

मोकळ्या वातावरणातले चित्रपट महोत्सव म्हणजे सुपरडुपर हिट‌ची हमीच!

अतिशय प्रसन्न समुद्रकिनारा आणि संध्याकाळची सहा-सातची वेळ. त्यात वाळूत ‘सिनेमाचा पडदा’! समोर (आणि समोर शक्य नसेल तर पाठीमागे) वाळूत खाली बसून अथवा आपल्या घरुन खुर्ची आणून त्यावर बसून चित्रपट पाहण्याचा मनसोक्त मनमुराद आनंद घेतोय हे कसं वाटतं? मल्टीप्लेक्स आणि ओटीटीच्या युगात हा असा खुल्या वातावरणात चित्रपट पाहायचा? आज वयाची पन्नाशी आणि साठी-पासष्टी पार केलेल्या चित्रपटरसिकांना एव्हाना आपणही एन्जॉय केलेल्या ‘गल्ली चित्रपट संस्कृती’ची आठवण आली असेल. त्यात एका अधिकृत मध्यंतरसह आणखी दोन अनधिकृत मध्यंतर. कारण काय तर, प्रोजेक्शनवरचे रिळ काढून दुसरे रिळ चढवायचे आहे. मी गिरगावात लहानाचा मोठा होताना ही गल्ली चित्रपट संस्कृती छान अनुभवलीय.‌

आज आपण डिजिटल युगात वावरतोय आणि ‘चित्रपटाची रिळे’जाऊन सीडी आली आहे. ती मोठीच तांत्रिक प्रगती. समुद्राच्या लहानमोठ्या लाटा निर्माण होताहेत आणि त्या नैसर्गिक हवेत आपण चित्रपट पाहतोय ही‍ केवळ कल्पना नाही तर ती वस्तुस्थिती आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळा, माहिम, केळवे, शिरगाव या परिसरातील चित्रपटरसिकांनी ग्लोबल कोकण मराठी चित्रपट महोत्सवात शिरगाव समुद्रकिनारी हा सुखकारक अनुभव घेतला. संध्याकाळ होतेय तोच चित्रपटरसिक शिरगाव समुद्रकिनारी उत्साहाने येऊ लागले. आणि मग एकेक दिवस करतकरत पावनखिंड, आदिशेष, एप्रिल मे ९९, छबी, गुलकंद आणि कुर्ला टू वेंगुर्ला हे चित्रपट दाखवले गेले आणि चित्रपटरसिकांनी ते मनापासून एन्जॉय केले. याच मराठी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ‘चित्रपट उद्योगासाठी संधी’ अशा आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाला स्थानिक नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कोकण महोत्सवात यासह अनेक गोष्टी होत्या.

चित्रपट महोत्सव म्हटला की तो शहरातील प्रशस्त चित्रपटगृहात त्याचे आयोजन असणार, त्यात प्रामुख्याने आमंत्रित करण्यात आलेल्यांना ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार आणि त्यातील परिसंवाद फार बौद्धिक असणार अशी चौकट अथवा समीकरण ठरुन गेलेले. तात्पर्य, ज्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर चित्रपट माध्यम आणि व्यवसाय जगतोय, ते अशा चित्रपट महोत्सवात पलिकडच्या फूटपाथवरुन जा-ये करीत राहणार, त्यांचा अशा चित्रपट महोत्सवात सहभाग जवळपास नाहीच. बरं, अशा चित्रपट महोत्सवातील चित्रपट हे जनसामान्यांसाठी जणू नसतात अथवा नसावेत हा अलिखित नियम का आहे हेच समजत नाही. कधीकधी अपवाद असतो. अनेकदा तर अशा चित्रपट महोत्सवातील वक्ते आपल्याकडील पारंपरिक चित्रपटांपेक्षा विदेशातील चित्रपटांना आपलेसे मानतात. वगैरे वगैरे वगैरे.

त्या सगळ्या पॅकेजला छेद देणारी गोष्ट म्हणजे, प्रत्यक्षात समाजातील खालच्या माणसापर्यंत पोहोचलेल्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित करण्यात येऊन त्याच चित्रपटरसिकांना खुल्या वातावरणात चित्रपट दाखविण्यात येणे. आपल्याला खूपच मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, एकेक तालुका करतकरत असे चित्रपट महोत्सव आयोजित करता येतील. इतकेच नव्हे तर इतरत्र मोकळ्या मैदानात, एखाद्या गार्डनमध्ये, डोंगराच्या पायथ्याशी, अगदी एखाद्या पहाडावर चित्रपट महोत्सव साजरे होत होत वाटचाल सुरू ठेवल्यास अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवता येतील. कुठे तीन दिवसांत तीन चित्रपट, तर कुठे एका आठवड्यात सात चित्रपट असे समीकरण उत्तम. मराठी चित्रपटासह कधी हिंदी चित्रपटही सहभागी करता येईल.‌ चित्रपटसंस्कृती ही अशी प्रत्यक्ष जनसामान्यांमध्ये जाऊन रुजवायला हवी आणि त्यासह आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात जनसामान्यांना माहीत असलेल्या चित्रपटांवर फोकस असावा, भाषाही सोपी असावी. साधारणपणे ऑक्टोबर ते मे अखेरपर्यंत आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. त्यातूनच सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरण ढवळून निघत असते. त्यात मोकळ्या वातावरणातील चित्रपट महोत्सव म्हणजे सुपरडुपर हिट‌ची हमी. नुसतं आपलं आपण बदलले पाहिजे, बदललं पाहिजे असे उठसूठ बोलून उपयोग नाही. प्रत्यक्षात कृती हवी. शिरगाव, सफाळा, माहिम, केळवे येथून मुंबईकडे निघताना असाच सकारात्मक विचार करत होतो…

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आर. के. स्टुडिओ, अंधेरी पूर्व! पत्ता चुकतोय?

काही काही वास्तूऺचे काही काही जागांशी अतिशय घट्ट नाते जुळलेय, त्याला चित्रपटाचे जगही अपवाद नाही. 'शोले' म्हटलं की मिनर्व्हा चित्रपटगृह आणि मिनर्व्हा चित्रपटगृह म्हटलं रे म्हटलं 'शोले' हे जगभरातील चित्रपट रसिकांमध्ये तब्बल पन्नास वर्षे रुजलेले नातं... आज भलेही मिनर्व्हा...

डिजिटल पिढीला हवंय सेलिब्रिटींच्या लग्नाचंही लाईव्ह कव्हरेज…

खात्रीने सांगतो,‌ तेलगू आणि कोडवा अशा दोन्ही रितीरिवाजानुसार उदयपूर येथे पार पडलेले विजय देवरकोऺडा आणि रश्मिका मन्दाना यांच्या शाही ग्लॅमरस लग्नाचं लाईव्ह कव्हरेज तुम्हाला नक्कीच आवडले असते.‌ (साऊथच्या फिल्मवाल्याचे उत्तर भारतात लग्न हादेखील यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अथवा ॲन्गल...

अमिताभ बच्चनचे ४५-५० चित्रपट मध्येच बारगळले!

पडद्यावर आलेल्या चित्रपटांपेक्षा तेथे पोहचू न शकलेल्या चित्रपटांच्या गोष्टी एकदम भारी. ताजे उदाहरण २०२१च्या "चकदा एक्स्प्रेस" या चरित्रपटाचे. भारतीय महिला क्रिकेट संघातील झुलेन गोस्वामी हिच्या आयुष्यावर आधारित हा चरित्रपट आहे. अतिशय गरीब कुटुंबातील ही युवती अतिशय मेहनतीने आणि संघर्षातून...
Skip to content