Homeमाय व्हॉईसअमितजी व शरदबाबूः...

अमितजी व शरदबाबूः भ्रम, भ्रमित आणि भ्रमिष्ट!

एखादा मोठा भूकंप होणार असेल तर त्याच्या आधी जमिनीच्या पोटातून काही आवाज येत राहतात. काही महिने छोटे मोठे कंप जाणवत राहतात आणि मग एखादा मोठा उत्पात होऊन जातो. भूगर्भशास्त्रातील हे सत्य राजकारणात मात्र खरे ठरेलच असे नसते. राजकारणात काय होते, तर होणारे कंप हे मोठ्या भूकंपाचे सूचन आहे असा एक भ्रम तयार होऊ शकतो. पण त्यात अडकलेले कलांतराने भ्रमिष्ट ठरवले जाऊ शकतात. किंवा निदान भ्रमित तरी नक्कीच होतात!

तीन पक्षांचे सरकार सध्या महाराष्ट्रात राज्य करत आहे. तर चौथा मोठा पक्ष त्या बाहेर आहे. पण विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीकडेच सध्या राजकीय चर्चेचे सूत्रे आहेत. काही पक्ष व काही नेते भ्रम प्रसारक मंडळी म्हणूनच कार्यरत असतात. हे लोक विविध प्रकारचे भ्रम तयार करण्याचे काम करत राहतात आणि राजकीय चर्चा त्या भोवती फिरती ठेवतात. काही पक्ष व नेते अशा तयार भ्रमाच्या भोवऱ्यात गोंधळून भ्रमित ठरतात, तर काहींमध्ये वेडेपणाचे पुरते लक्षण दिसू लागल्याने त्यांना भ्रमिष्ट म्हणण्याशिवाय पर्याय उरत नाही!

सध्या दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे येथे जे चर्वितचर्वण सुरू आहे त्यामधून एक मोठा भ्रम तयार करण्याचा आणि त्याच्या नादात अनेकांना खुळे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गेल्या शनिवारी म्हणे अचानक शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली. कुठे? कधी? आणि कशासाठी? हे प्रश्न सहाजिकच उभे राहिले. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे जयपूरमध्ये काही कामानिमित्ताने गेले होते. तिथे त्यांच्यासाठी एक आलीशान खाजगी विमान तयार होते. त्यातून हे दोघे नेते अहमदाबादेत गेले.

हे विमान अदाणी कंपनीचे जरी असले तरी पवार व पटेल हे अदाणींच्याच घरी गेले की अन्यत्र कुठे गेले हे स्पष्ट झाले नाही! पण अहमदाबादमधील एक अतिश्रीमंत उद्योजकांच्या घरी ते गेले. ही भेट खाजगी स्वरुपाची होती. हे दोघे नेते तिथे पोहोचून साधारण पाऊण एक तास झाल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे त्याच उद्योगपतींच्या घरी दाखल झाले. तिथे या तीन नेत्यांची चर्चा व सहभोजन झाले. नंतर शाह दिल्लीला गेले आणि पवार मुंबईत दाखल झाले.

ही बातमी आधी ट्विटरवरून सुटली, नंतर एका गुजराती दैनिकाने त्याची हेडलाईन करून बातमी छापली. शनिवारी झालेल्या या भेटीची चर्चा रविवारी व सोमवारी रंगली होती. आता ही भेट खरोखरीच झाली की नाही? की फक्त त्या भेटीच्या कथा समाजमाध्यमांतून भ्रम प्रसारक मंडळींनी सोडल्या? आणि मग भ्रमित व भ्रमिष्ट अन्य माध्यमवीरांनी त्या पुढे रंगवत नेल्या? कारण, चर्चा रंगल्या तरी प्रत्यक्षात शाह-पवार भेट झाली की नाही या बाबतीत संभ्रम तयार कऱण्यात सारे संबंधित पक्ष व नेते यशस्वी ठरले आहेत.

शरद पवार हे या संदर्भात काहीच बोलले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांनीही या बैठकीविषयी थेट काही बोलणे टाळले. ते इतकेच म्हणाले की “अशा गोष्टींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ आणि केवळ पवार साहेबांमुळेच स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. सरकार नीट सुरू आहे!” आता यातील गंमत बघा. पवारसाहेबांमुळेच ठाकरे सरकारचा जन्म झाला हे कोणीच नाकारू शकत नाही. पण असे असतानाही इकडे शिवसेनेच्या मुखपत्रामधून राष्ट्रवादीवर आगपाखड होते, गृहखात्याच्या कारभारावरून शिवसेनेची नाराजी आणि तिसरा पक्ष काँग्रेसची अस्वस्थता व्यक्त होते.

त्याच सुमारास, “ज्यांनी मविआचे सरकार घडवले” तेच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गुप्त भेटीसाठी जातात, याला काय म्हणावे? जे घडवतात त्यांच्याकडेच बिघडवण्याचीही ताकद आहे हेही निराळे कुणाला सांगण्याची गरज नाही! इकडे मुंबईत मात्र नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड अशा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले आहे की अशी कोणतीही भेट झालेलीच नाही. आव्हाड म्हणाले की, शाह-पवार भेट झाली नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे शरद पवारांचेही प्रवक्ते आहेत असा आरोप त्यांचे सध्याचे भ्रमित मित्रपक्ष, काँग्रेस नेत्यांनी केलेलाच आहे. ते राऊत म्हणतात की, ही कथित भेट म्हणजे भ्रम पैदा करण्याचा उद्योग आहे! ही धुळवड बंद करा, असेही ते बजावतात. मात्र भाजपाचे नेते या भेटीबाबत गालातल्या गालात हसत आणखी भ्रम वाढवण्याचे काम करत आहेत.

अमित शाहांना दिल्लीत पत्रकारांनी सोमावारी गाठले तेव्हा त्यांनी भेट झाली की नाही हे स्पष्टपणाने न सांगता इतकेच म्हटले की, राजकारणात सर्वच गोष्टी काही उघड सांगायच्या नसतात. पुण्यात भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबईत खासदार नारायण राणे,  दोघांनी अशी भूमिका घेतली की दिल्लीमधून अमित शाह, मोदीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे, जे व जसे आदेश देतील, तशी कृती मुंबईत, महाराष्ट्रात नक्कीच केली जाईल.  आमच्या पक्षात नेत्यांच्या निर्णयावर प्रश्न करण्याची पद्धत नाही, असेही राणे म्हणतात ही आणखी गंमतीशीर बाब आहे!

या साऱ्यामधून असा संदेश देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे की, शाह-पवार भेटीमध्ये जे काही घडले व शिजले त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार आहेत. पवार व मोदींच्या मधुर सबंधांविषयी भरपूर भ्रम, संभ्रम आधीच तयार झालेले आहेत. मोदींनी जाहीर सांगितले होते की, मी अधूनमधून पवार साहेबांबरोबर चर्चा करत असतो. त्यांचा सल्ला घेत असतो. पवार माझे दिल्लीतील गुरू आहेत. या संदर्भात शरद पवारांनी स्पष्ट केले होते की, मोदी काही माझे शिष्य वगैरे नाहीत. अन्यथा मी सांगितलेल्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्याच असत्या.

मोदी, पवार व शाह यांच्या दिल्लीतील नियमित गाठीभेटींपेक्षा अहमदाबादमध्ये पार पडलेली किंवा न पार पडलेली शाह-पवार भेट महत्त्वाची ठरते आहे. राष्ट्रवादीने कितीही इन्कार केला असला तरीही ही भेट झालीच असणार असे अहमदाबादेत शोध घेणारे पत्रकार सांगत आहेत. अमित शाह त्या शनिवारी रात्री अहमदाबादमध्ये मुक्कामाला होते हे स्पष्ट झाले आहे. त्यांची या उद्योगपतींच्या घरी झालेली भेट गुप्त ठेवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या होत्या.

केंद्रीय गृहमंत्री जेव्हा कुणाच्याही घरी जातात तेव्हा त्या घराची व परिसराची झडती स्थानिक पोलीस आधी करतात. तिथे बाँबशोधक पथक आधी काही तास जाते. सारे रस्ते बंद केले जातात वगैरै वगैरे.. हे सुरक्षेचे उपाय केले जाणे अपिरहार्य असते. पण त्या रात्री उद्योगपतींच्या घरी अमित शाह भोजनासाठी जाण्याआधी अशा पोलिसी व सुरक्षाविषयक हालचाली करायच्या नाहीत अशा सक्त सूचना होत्या. म्हणून तर ती भेट प्रत्यक्षात पार पडेपर्यंत गुप्त राहू शकली.

आता स्वतः शरद पवार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले असताना असा भ्रम व संभ्रम होत राहणे हे जरी योग्य नसले तरी ते झाले हे खरे. ती भेट म्हणजे सध्याच्या मित्रपक्षांना इशारा आहे का याचा विचार मविआच्या अन्य घटकांनी भ्रमित वा भ्रमिष्ट न होता करणे हे योग्य.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

विधानभवनाच्या पायऱ्यांवरील नकलाकारांना चाप तरी कधी बसणार?

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचे चौथे आणि पहिलेच पावसाळी अधिवेशन होते. प्रत्यक्षात सभागृहांतही भरपूर कामकाज पार पडले. तीन आठवड्यांतील कामकाजाच्या पंधरा दिवसांच्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या जशा संमत केल्या,...

धनखडांच्या राजीनाम्यामुळे न्या. वर्मा वाचणार?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजस्थानचे. आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही त्याच राज्याचे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे कायमस्वरुपी सभापती असतात. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नेतृत्त्व राजस्थानी नेत्यांकडे राहिले. हा एक दुर्मिळ योगायोग परवा संपला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी अचानक धनखड...

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हसऱ्या चेहऱ्याची राजकीय टोलेबाजी!

परवा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अत्याधुनिक अशा ई-मोटारीच्या नव्या शोरूमचे उद्घाटन केले. त्यांनी टेस्ला वाय प्रकराच्या मोटारीत बसण्याचा, गाडी हाताळण्याचाही अनुभव घेतला. टेस्लाने हीच गाडी अमेरिकेत पंधरा दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या घरी ड्रायव्हरशिवाय पाठवली होती. म्हणजे गाडीच्या संगणकात ग्राहकाचा पत्ता...
Skip to content