Thursday, November 21, 2024
Homeडेली पल्सअलविदा दिलीपसाब!

अलविदा दिलीपसाब!

२०१४ साली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेला, अभिनयाचे शहेनशहा दिलीप कुमार यांच्या ‘द सबस्टन्स अँड द शॅडो [The Substance and the Shadow] या आत्मचरित्राचा दिमाखदार सोहळा आज आठवतो आहे. ज्यांच्या अभिनयातील सूक्ष्म बारकाव्यांनी अभिनयाची नवी परिभाषा लिहिली होती आणि बॉलीवुडला पहिला अनभिषिक्त सम्राट लाभला होता, त्या दिलीप साहेबांची आणि सायराजींची माझी पहिली भेट तिथे झाली.

दिलीप साहेबांची भेट झाली, या म्हणण्याला काही अर्थ नाही.. कारण अल्झायमरमुळे ते काही समजण्या-उमजण्याच्या केव्हाच पलीकडे गेले होते. पण तरीही ते होते! ओठांवर मंद स्मित खेळवत हा रुबाबदार शहेनशहा पूर्ण कार्यक्रमभर तिथे बसला होता. बॉलीवुडचं संपूर्ण तारका दळ तिथे अवतरलेलं होतं. दिलीप कुमार यांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. त्यांच्यावर स्तुती सुमनं उधळली जात होती. मात्र यातला एक शब्दही मनापर्यंत पोहोचत नसतानाही हा शहेनशहा त्याच्या खानदानी ‘अदब’चा परिचय देत तिथे बसून होता.

त्याचं ते तिथे असणं हेसुद्धा खूप होतं! गेली काही वर्षं ते सतत इस्पितळाच्या आत-बाहेर करत होते. पण तरी त्यांचं हयात असणं हेच त्यांच्या, आपल्यासारख्या करोडो चाहत्यांसाठी पुरेसं होतं. आज ते संपलं! एक दिमाखदार सेंच्युरी थोडक्यात हुकली. आज एक विलक्षण पोकळी जाणवते आहे.

खरं तर माझं त्यांच्याशी कधीच बोलणं झालं नाही. पण याच पुस्तकाच्या मराठी भाषांतरासाठी इंडस्ट्रीमधून, पत्रकारितेतल्या काही दिग्गजांकडून आणि पुस्तकाच्या मूळ लेखिका, ‘स्क्रीन’च्या माजी संपादिका व माझी मैत्रीण उदयताराजी नायर यांच्याकडून माझं नाव सायराजींना सुचवलं गेलं होतं. त्या कार्यक्रमाचं मला आमंत्रण होत तेही त्याचमुळे.  सगळीकडून माझंच नाव गेल्याने सायराजींनी मला भेटायला बोलावलं. आमची भेटही झाली. त्यानंतर आजतागायत आम्ही सतत संपर्कात आहोत. पण काही ना काही कारणाने पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं काम मात्र पुढे सरकू शकलं नाही.

त्यात स्वतः दिलीप साब, सायराजी यांची आजारपणं, त्यांच्या घरातल्या अन्य काहींची आजारपणं, मृत्यू, अशी अनेक कारणं होती. त्यामुळे दिलीप साहेब यांच्या भेटीचा योग काही येऊ शकला नाही. त्यांच्या घरापर्यंत जाऊनही त्यांची भेट घेता न आल्याची खंत आता कायम राहील.

 एक मात्र नक्की. उदयताराजी, सायराजी, दिलीप कुमार यांच्याशी भावा-बहिणीचे पवित्र नाते असलेल्या लता दीदी यांच्याकडून त्यांचे इतके किस्से समजले की, त्यांनीही मला खूप समृद्ध केलं आहे. वेळ मिळाल्यास रोज किंवा किमान अधूनमधून ते सांगायला मला आवडेल. रुपेरी पडद्यापलीकडला हा राजा माणूसही तेवढाच देखणा होता..

आज कदाचित कुणाला माहित नसेल, पण ब्रिटीशांविरुद्ध भाषण दिल्याबद्दल एक दिवस येरवडा तुरुंगात काढून आला होता तो.. आणि खवय्या असलेल्या, मजबूत आहार असलेल्या या अभिनेत्याने त्या तुरुंगात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासकट अन्य गांधीवाल्यांबरोबर उपोषणही केलं होतं. दिलीप कुमार यांचा गांधीजींशी काही संबंध नव्हता. पण, ‘गांधीवाले’ ही तिथल्या जेलरने सगळ्याच स्वातंत्र्य सैनिकांसाठी कुत्सितपणे वापरलेली शिवी होती. ती दिलीप साहेबांना प्रचंड आवडली होती. ते किताबासारखी ती अभिमानाने मिरवत. 

प्रेमळपणा हाही त्यांचा स्वभाव होता. मात्र वाईट हे वाटतं की शेवटची काही वर्षं ते एखाद्या जिवंत प्रेतासारखे वावरत होते. ते इतका काळ टुकीने राहू शकले याचं पूर्ण श्रेय सायराजींना जातं. त्यांच्या धर्मात वट सावित्रीची पूजा नाही. पण त्या सावित्रीसारखंच त्यांनी असंख्य वेळा दिलीप साहेबांना मृत्यूच्या मुखातून खेचून आणलं होतं. त्यांच्याशी जे चॅटिंग व्हायचं त्यातही ‘दिलीप साहेबांसाठी दुआ करा’ अशीच विनवणी असायची. एक चॅट मुद्दाम शेअर करते आहे. त्यांच्या मनःस्थितीची कल्पना त्यातून येऊ शकेल. आज ते दुआंचं बळ तोकडं पडलं. एक प्रेमकहाणी अखेर संपली!

सायराजींच्या दुःखाची आज कल्पनाही करवत नाही. 

‘अलविदा दिलीपसाब’ म्हणतानाही मन कचरतं आहे…. 

Continue reading

नमन लतादीदींना..

लतादीदींची आज जयंती! त्यांचा बारा वर्षांचा सहवास, स्नेह मला लाभला. या काळात अगदी त्यांच्या पलंगावर त्यांच्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा.. गप्पांमध्ये सहज ऐकलेलं त्यांचं गाणं.. त्यांच्याकडून ऐकलेल्या असंख्य आठवणी.. आईच्या मायेने त्यांनी केलेला आग्रह, त्यांचं आगत्य, त्यांचा ‘परफेक्शन’चा अट्टहास.....

वो भूली दास्तां.. लो फिर याद आ गयी…

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कालच वाढदिवस झाला. खरं तर दुर्दैवाने आता वाढदिवस म्हणता येणार नाही; कारण शरीराने त्या आपल्यात नाहीत. म्हणून जयंती म्हणायचं... बाकी त्यांच्या सुरांच्या / आठवणींच्या रूपात त्या आपल्याचबरोबर आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी रोजच मनात पिंगा घालतात....

सीमाताईंना अखेरचा निरोप!

काही मृत्यू विलक्षण पेचात टाकतात. ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली याचं दुःख मानायचं की ती यातनाचक्रातून सुटली याचा आनंद मानायचा हेच कळत नाही. सीमा देव, सीमाताईंचा मृत्यू तसा आहे. २०१९ साली व्यास क्रिएशन्सच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला त्या शेवटच्या भेटल्या. तेव्हाही...
Skip to content