Thursday, June 13, 2024
Homeमाय व्हॉईसवो भूली दास्तां.....

वो भूली दास्तां.. लो फिर याद आ गयी…

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कालच वाढदिवस झाला. खरं तर दुर्दैवाने आता वाढदिवस म्हणता येणार नाही; कारण शरीराने त्या आपल्यात नाहीत. म्हणून जयंती म्हणायचं… बाकी त्यांच्या सुरांच्या / आठवणींच्या रूपात त्या आपल्याचबरोबर आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी रोजच मनात पिंगा घालतात. कलाकार होत्या, त्यामुळे अर्थातच मनस्वी होत्या. टोकाचा राग आणि टोकाचं प्रेम ही अशा लोकांची खासियत असते. त्यांचा राग तर त्यांच्या गाजलेल्या, सुपरिचित भांडणांत दिसलाच. त्यांचं प्रेम कसं होतं हे दाखवणाऱ्या या दोन आठवणी!

शांताबाई शेळके आणि त्यांची मैत्री जगजाहीर आहे. एकदा मी पार्ल्यातून माझ्या ऑफिसमधून निघाले आणि त्यांचा फोन आला. त्या दिवशी त्यांना शांताबाईंची खूप आठवण येत होती. पुढे पवईचा डोंगर उत्तरेपर्यंत म्हणजे जवळपास दीड तास आम्ही फोनवर बोलत होतो. शांताबाई त्यांना कशा भेटल्या, इथपासून ते शांताबाईंच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. शांताबाईंचा कुणी कुणी कसा गैरफायदा घेतला… मात्र शांताबाई कसं कर्तव्यभावनेने, प्रेमाने सगळ्यांचं करत राहिल्या… शांताबाईंच्या कविता… असं बरंच काही त्या बोलत होत्या. बाकीही बरेच विषय या गप्पांमध्ये निघाले; पण प्रमुख होता तो शांताबाई!

शांताबाईंविषयी बोलताना त्यांनी जे सांगितलं, त्यातलं बरंच मला माहित होतं. दोन-तीन गोष्टी नव्या कळल्या; पण त्यांच्या एका वाक्याने मी स्तंभित झाले. त्या असं म्हणाल्या की, शांताबाई इतक्या मोठ्या कवयित्री होत्या, पण मराठी साहित्यविश्वाने त्यांची उपेक्षा केली. या वाक्याने मी चाट पडले. कारण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत सगळं काही शांताबाईंना मिळालं. तरी त्यांची उपेक्षा झाली असं लतादीदींना का वाटत असेल, असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते बघून मला गंमत वाटली.

त्या म्हणाल्या, ‘शांताबाई एवढ्या छान कविता लिहायच्या, पण त्यांना कवितेसाठी जेमतेम शंभर रुपये मानधन मिळायचं. त्यांची योग्यता खरंतर पाचशे रुपये मिळण्याची होती. मी शांताबाईंना तसं सांगितलंसुद्धा… तर त्या म्हणल्या- कवितेला एवढं मानधन कोणी देणार नाही. त्यावर मी त्यांना असं म्हटलं की, किमान तीनशे रुपये तरी मागा. पण शांताबाई फारच साध्या होत्या. त्यामुळे त्यांनी तेवढेही मागितले नाहीत. जे मिळाले ते गोड मानून त्या स्वस्थ राहिल्या.

हे ऐकल्यावर मी दीदींना असं म्हटलं की, दीदी त्या काळात कथेला चाळीस रुपये मानधन मिळत होतं. कवितेला पाचशे किंवा तीनशे रुपये तरी कोण देणार? 100 रुपये म्हणजे खूपच जास्त मिळत होतं त्यांना. पण दीदी आपला मुद्दा सोडायला तयार नव्हत्या. त्या म्हणाल्या, हो, पण त्या किती छान कविता लिहायच्या… मी म्हटलं, प्रश्नच नाही त्या छानच लिहायच्या. पण त्यांचे सगळेच समकालीन छानच लिहीत होते. सगळ्यांना एवढं मानधन दिलं असतं तर केवळ कवितांच्या मानधनामध्येच अंक बंद करावे लागले असते… दीदींना व्यवहार कळत नव्हता असं नाही. त्या प्रचंड बुद्धिमान होत्या. त्यामुळे अर्थकारण त्यांना बरोबर समजत होतं. मात्र मैत्रिणीचं प्रेम इतकं होतं की, त्यांना असंच वाटत होतं की शांताबाईंना त्यांच्या कवितेच्या योग्यतेच्या मानाने मानधन मिळालं नाही. ते मिळायला हवं होतं!

ल

अशीच एक आठवण त्यांची जुनी मैत्रीण पद्मा सचदेव यांच्याबाबतची आहे. पद्माताई मुंबईत आल्या की फोन करायच्या. तसा एकदा त्यांचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या की, मी आणि दीदी तुझ्या घरी येणार आहोत. तू जेवण कर मग आपण दिवसभर गप्पा मारू. मी चाट पडले. कारण दीदी अहंकारी नव्हत्या. माझ्यासारख्या कुणाच्या घरी जाण्यात कमीपणा मानणाऱ्या नव्हत्या. पण तेव्हा त्यांची तब्येत एवढी नाजूक होती की, षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या दीनानाथ मंगेशकर स्मृती समारोहालासुद्धा त्या जात नव्हत्या. तर त्या ठाण्यापर्यंत प्रवास करून येतील आणि चार मजले चढतील ही शक्यताच नव्हती. त्यामुळे मी पद्माताईंना परत विचारलं. त्या म्हणाल्या, हो. दीदी हो म्हणाल्या आहेत.

त्यांचा फोन ठेवल्यावर मी दीदींना फोन केला आणि त्या खरंच हो म्हणाल्या आहेत का, असं विचारलं. त्या म्हणाल्या, हो. तिची इच्छा होती म्हणून मी हो म्हटलं. कारण म्हातारपणी वाटतं हो असं कुठे कुठे जावं… मग तिचा विरस मी का करू? हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. आपल्या मैत्रिणीच्या भावनांना त्या किती जपत होत्या, हे बघणं मनोज्ञ होतं.

आपल्याला पटकन प्रतिक्रिया द्यायची सवय असते. ‘हो’ तर ‘हो’ किंवा ‘नाही’ तर ‘नाही’. निदान माझा तरी स्वभाव तसाच आहे. त्यामुळे मी दीदींना म्हटलं की, अहो, पण नंतर तुम्ही जेव्हा नाही सांगाल तेव्हा त्यांना दुःख नाही का होणार? तेव्हा त्यांचा विरस नाही का होणार? त्यापेक्षा सुरुवातीलाच सांगून टाकलं तर…? त्या हसल्या आणि म्हणाल्या, तिचीही तब्येत चांगली नसते. त्यामुळे आत्ता ती कितीही उत्साहात असली तरी तिलाही ते जमणार नाहीच. पण मी नाही असं सांगून तिला आत्ताच दुःखात कशाला टाकू? त्यामुळे ती म्हणते तसं करत राहा.

त्यानंतर ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’सारखं आमचं या गेट-टुगेदरचं नियोजन चालू राहिलं. पद्माताई फारच मनापासून ते करत होत्या. पण हे होणार नाही हे मला माहीत होतं. त्यामुळे मी दीदींनी सांगितल्याप्रमाणे त्यात भाग घेत होते. शेवटी दीदींचं म्हणणं खरं ठरलं. काही दिवसांनी पद्माताई आजारी पडल्या. मग त्यांचा माझ्याकडे येण्याचा उत्साह बारगळला. ‘मला नाही हो जमणार… खरं तर दीदी पण यायला तयार होती…’ असं त्या म्हणाल्या. मला त्यांचं वाईटही वाटत होतं आणि मनातून हसूही येत होतं. माणसांना हाताळण्याची दीदींची जी हातोटी होती, कौशल्य होतं त्यातून घेण्यासारखं खूपच होतं, असं माझ्या लक्षात आलं.

त्या शिवरायांच्या भक्त होत्या. समर्थांनी शिवरायांचं वर्णन करताना असं म्हटलंय की, ‘शिवरायांची सलगी देणे कैसे असे…’

दीदींची भक्ती पोकळ नव्हती. त्यांनी ते आत्मसात केलं होतं!

त्यांना विनम्र अभिवादन!! 

Continue reading

सीमाताईंना अखेरचा निरोप!

काही मृत्यू विलक्षण पेचात टाकतात. ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली याचं दुःख मानायचं की ती यातनाचक्रातून सुटली याचा आनंद मानायचा हेच कळत नाही. सीमा देव, सीमाताईंचा मृत्यू तसा आहे. २०१९ साली व्यास क्रिएशन्सच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला त्या शेवटच्या भेटल्या. तेव्हाही...

जिव्हाळ्याची बेटं?

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई गेल्यानंतर लिहिलेला माझा लेख खूप व्हायरल झाला. प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक ग्रुपमध्ये त्यावर चर्चा झाल्या. कोणी त्याचं अभिवाचन केलं व स्वतःच्या म्हणण्यासकट त्यांच्या त्यांच्या ग्रुप वर टाकलं.... एकूण यानिमित्ताने जे विचारमंथन झालं किंवा सुरू झालं...

ग्लॅमर मागचा अंधार…. हास्यामागची उदासी…..

ग्लॅमर मागचा अंधार.... हास्यामागची उदासी..... एकाकी मृत्यू..... गेल्या काही काळातल्या वेगवेगळ्या नामवंतांच्या बातम्या बघितल्या तर हेच लक्षात येतं.... कारणं वेगवेगळी असतील पण एकाकीपणा... उदासी... वैफल्य या काही गोष्टी यात समान दिसतात.... ती व्यक्ती आपल्या किती जवळची होती.... आपला कसा मित्र होती हे सांगणारे आणि...
error: Content is protected !!