Homeटॉप स्टोरीराज्यसभा निवडणुकीत शेवटच्या...

राज्यसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत नेते धास्तावलेलेच!

राज्य विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या राज्यसभा सहा जागांसाठी आज झालेल्या मतदानात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक कायम राहिली.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार आखाड्यात आहेत. शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि संजय पवार, भारतीय जनता पार्टीतर्फे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, काँग्रेसतर्फे इम्रान प्रतापगढी तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून प्रत्येक मोठ्या राजकीय पक्षाने आपापल्या सदस्यांना तसेच समर्थकांना हॉटेलमध्ये उतरवले होते. भाजपाने त्यांच्या आमदारांची हॉटेल ताजमध्ये, शिवसेनेने ट्रायडंटमध्ये, काँग्रेसने वेस्टइन तर राष्ट्रवादीने ब्ल्यू सी हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. तब्बल २४ वर्षांनी राज्यसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होत होते.

विधानभवनात आज सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सकाळी आठ वाजल्यापासूनच विधानभवनात हालचाली वाढू लागल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आठ वाजताच विधानभवनात दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा आमदारांचा एक गट विधानभवनात दाखल झाला. पाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार विधानभवनात दाखल झाले. मात्र, शिवसेनेचे आमदार ११ वाजेपर्यंत विधानभवनात पोहोचले नव्हते. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर तसेच सुनील प्रभू मात्र विधानभवनात दिसत होते. पावणे नऊच्या सुमारास देवेंद्र फडणवीस विधानभवनात आले. सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच भाजपाच्या नेत्यांकडून आपला अतिरिक्त उमेदवार निवडून येण्याचा दावा केला जात होता.

दत्त्तात्रय भरणेंनी केले पहिले पहिले मतदान

सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांच्या एका गटाने मतदानाला सुरूवात केली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिले मत टाकले. साडेनऊ वाजेपर्यंत २० जणांनी मतदान केले होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे २८८ पैकी २८७ आमदार मतदान करणार होते. त्यातले दोन आमदार, राष्ट्रवादीचे नवाब मलिक तसेच अनिल देशमुख यांना मतदान करायला परवानगी द्यायची की नाही हा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे त्यांचे काय होणार याची चिंता राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतावित होती.

.. आणि मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप आले

भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराला तोंड देत आहेत. त्यामुळे ते मतदानासाठी येतील का, या चिंतेने भाजपाचे नेते अस्वस्थ होते. अखेर साडेदहाच्या सुमारास एका रूग्णवाहिकेतून टिळक विधानभवनात दाखल झाल्या. चंद्रकांत पाटील यांनी त्यांची विचारपूस केली. नंतर पीपीई किट परिधान करून व्हीलचेअरवरून त्या मतदानस्थळी पोहोचल्या आणि त्यांनी मतदान केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या एका रूग्णवाहिकेतून लक्ष्मण जगताप विधानभवनात दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर जगताप यांनीही मतदान केले. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांची चिंता काहीशी दूर झाली. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी वॉकर घेऊन विधानभवनात आले.

एमआयएमचा काँग्रेसला पाठिंबा

दरम्यान, महाविकास आघाडीने पाठिंबा मागितला नसला तरी आम्ही काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना समर्थन द्यायचे ठरवले आहे, असे एमआयएमचे नेते खासदार इम्तियाझ जलील यांनी जाहीर केल्याने सत्ताधाऱी नेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. १२ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आणि मग महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा मतदानाचे डावपेच आखण्यात आले. याच काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांचा कोटा दोन मतांनी वाढवला. त्यामुळे शिवसेनेत काहीशी चिंता वाढली होती.

दिलीप मोहिते व अण्णा बनसोडेंनीही वाढवली चिंता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला फारसे महत्त्व देत नाहीत. आपली कामे होत नाहीत म्हणून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते तसेच अण्णा बनसोडे यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. कालपासून ते दोघेही पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे फोन स्वीकारत नव्हते. अखेर अजितदादांनी शिष्टाई केली आणि त्यानंतर हे दोघेही मतदानासाठी आले व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला.

नवाब मलिक व अनिल देशमुख यांच्या पदरी निराशा

मुंबई उच्च न्यायालयाने कारागृहात असलेले नवाब मलिक यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी अखेर मतदान करण्याचा नाद सोडला. कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे दुसरे नेते अनिल देशमुख नवाब मलिक यांच्या याचिकेकडे डोळे लावून बसले होते. नवाब मलिक यांना दिलासा मिळाला नाही हे पाहताच त्यांनीही आपली तलवार म्यान केली.

बहुजन विकास आघाडीचे पत्ते गुलदस्त्यातच

दुपारी दोन वाजता बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आपल्या दोघा सहकाऱ्यांसह विधानभवनात दाखल झाले. मतदानानंतरही त्यांनी कोणाच्या पारड्यात मते टाकली हे सांगितले नाही. जे आमच्या मतदारसंघांतील समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी मदत करतील त्यांना आम्ही मते दिली, असे त्यांनी स्पष्ट केले. दुपारी तीन वाजता सर्व आमदारांनी मतदान केले आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

आदित्य ठाकरेंच्या मतपत्रिकेवर स्टँपच नाही

शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना दिलेल्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा स्टँपच नसल्याचे ठाकरे यांच्याच लक्षात आले. त्यांनी ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर त्यांना दुसरी मतपत्रिका देण्यात आली.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content