Homeटॉप स्टोरीविधान भवनात शेवटपर्यंत...

विधान भवनात शेवटपर्यंत नेते धास्तावलेलेच!

महाविकास आघाडीच्या नेत्यांना अखेरच्या क्षणापर्यंत चिंतेत ठेवणारे विधान परिषदेसाठी झालेले मतदान जेमतेम अर्धा तास राहिला असताना समाप्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले शेवटचे मत टाकले आणि अखेर मतदानाची प्रक्रिया संपली.

आज सकाळी सात वाजल्यापासूनच विधानभवन परिसरात लगबग सुरू झाली. नऊ वाजता विधानसभा सदस्यांकरवी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार होते. सकाळी आठ वाजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विधान भवनात पोहोचले. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाप्रमाणेच याहीवेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार पहिल्यांदा विधान भवनात पोहोचले. हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये भाजपा व त्यांचे समर्थक आमदार उतरले होते. या आमदारांचा पहिला गट चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी सव्वा आठच्या सुमारास पोहोचला. साडेआठ वाजता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विधान भवनात पोहोचले.

दरेकरांसह पाच उमेदवारांनी केले देवदर्शन

निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी विधान भवनात येण्यापूर्वी प्रभादेवीतल्या श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी श्री सिद्धीविनायकाचे आशिर्वाद घेतले. शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर तसेच आमशा पाडवी यांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या दर्शनानंतर हे चारही उमेदवार विधान भवनात आले.

क्षीतिज ठाकूर पहाटेच मुंबईत

बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. या तीन आमदारांची मते मिळविण्यासाठी आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या निवासस्थानी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उंबरठे झिजवले होते. ठाकूर यांचे चिरंजीव आमदार क्षीतिज ठाकूर परदेशात, अमेरिकेत होते. त्यामुळे ते मतदानाला येतील की नाही, अशी शंका अनेकांना होती. मात्र, आज पहाटे तीन वाजताच क्षीतिज मुंबईत उतरले. त्यानंतर ते मुंबईतच मुक्कामी राहिले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील यांच्यासह क्षीतिजही विधान भवनात मतदानासाठी दाखल झाले.

आजारी असतानाही आले खास मतदानासाठी

भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच मुक्ता टिळक सध्या कॅन्सरशी लढा देत आहेत. अशा स्थितीतही हे दोन्ही आमदार पक्षनिष्ठा दाखवत राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच आजही मतदानाला आले होते. पुण्याच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक वाहनाने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विधान भवनात पोहोचल्या. नंतर व्हिलचेअरने जाऊन त्यांनी मतदान केले. पुण्यातल्या चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेतून दुपारी दोन वाजता विधान भवनात आले. नंतर त्यांनीही व्हिलचेअरचा वापर करत मतदान केले. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी राज्यसभेप्रमाणेच याही खेपेला वॉकर घेऊन सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमाराला विधान भवनात पोहोचले.

शिवसेनेला बसला वाहतूक कोंडीचा फटका

भाजपा पाठोपाठ काँग्रेसच्या आमदारांचा ताफा फोर सिझन हॉटेलमधून विधान भवनात पोहोचला. त्यापाठोपाठ ट्रायडंट हॉटेलमध्ये उतरलेले राष्ट्रवादीचे आमदार विधान भवनात पोहोचू लागले. शिवसेनेचे आमदार पवईच्या वेस्ट इन हॉटेलमध्ये उतरले होते. काल रात्रीपासून आदित्य ठाकरे याच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिवसेनेच्या आमदारांचा ताफा एका बसने विधान भवनाकडे निघाला. आदित्य ठाकरेही याच बसमध्ये होते. परंतु जोगेश्वरी आणि अंधेरीदरम्यान असलेल्या ट्रॅफिक जॅममुळे हे आमदार मेटाकुटीला आले. त्यांना मार्ग मोकळा करून देण्याच्या प्रक्रियेत पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली.

प्रमुख नेत्यांनीच सांभाळली कमान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधारण सव्वादहा वाजता विधान भवनात आले. आल्यावर लगेचच ते आपल्या कार्यालयात गेले. शिवसेनेचा तसेच आपल्या समर्थक आमदार त्यांना भेटूनच मत द्यायला जात होता. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची, अजित पवार यांनी राष्ट्रवादीची तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची कमान सांभाळली होती. साधारण ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे तसेच सुप्रिया सुळे विधान भवनात आले. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी काही चर्चा केली. मतदानाचा कोटा आयत्यावेळी बदलण्याबाबत ही चर्चा होती, असे कळते.

पहाटेपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांचा खल

काल रात्रीपासून पहाटेपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांमध्येही त्यांचा दुसरा उमेदवार, भाई जगताप यांना कसे निवडून आणायचे यावर चर्चा चालली होती. याच काळात काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह काही नेत्यांशी तसेच अजित पवार यांच्याशीही चर्चा केल्याचे कळते.

आपापले उमेदवार सांभाळा

सत्तेतल्या महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवताना सहावा उमेदवार दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढली होती. तीनही पक्षांच्या नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांची काळजी घेतली जात होती. कोणत्याही पक्षाकडे अतिरिक्त मते नव्हती. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपले उमेदवार सुरक्षित करण्यासाठी पुरेशी मते हवी होती. परिणामी कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांचा कोटा जाहीर केला नाही. शेवटपर्यंत प्रत्येकजण अंदाजच व्यक्त करत राहिला.

दिलीप मोहितेंनी शेवटपर्यंत वाढवली धाकधूक

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, अण्णा बनसोडे यांनी आजही विधान भवनात पोहोचायला बराच वेळ घेतला. त्यात माणिकराव कोकाटे तसेच आशुतोष काळे यांचीही आज भर पडली. हे चारही आमदार राष्ट्रवादीच्या इतर आमदारांसोबत ट्रायडंटमध्ये उतरले नव्हते. कालपासून ते नॉट रिचेबल झाल्याने राष्ट्रवादीचे नेते धास्तावले होते. मात्र, अजितदादांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यात यश मिळवले. त्यानंतर एकेक करत हे आमदार मतदानाला पोहोचले. कोकाटे यांनी तर शेवटी साडेतीनच्या सुमाराला अजितदादांबरोबर मतदान केले. आपल्या मतदारसंघातली कामे २० तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिले होते. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले हे आश्वासन कितपत पूर्ण झाले याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपण मतदानाबाबत निर्णय घेऊ, असे दिलीप मोहिते यांनी सांगितले.

… अखेर रवी राणा अवतरले

भाजपा समर्थक अपक्ष आमदार रवी राणा गेल्या दोन दिवसांपासून भूमीगत होते. दोनच दिवसांपूर्वी अमरावतीच्या न्यायालयाने त्यांच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट बजावण्यासाठी अमरावती पोलीस राणा यांच्या खार येथील निवासस्थानी दोन वेळा गेले होते. त्यामुळे रवी राणा यांना मुंबईत येताच पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे त्यांचे एक मत जाते की काय, अशी भीती भाजपाच्या गोटात होती. मात्र, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक ते विधान भवनात दाखल झाले. हातात हनुमान चालीसा घेत त्यांनी माध्यमांशी संवादही साधला आणि नंतर मतदान केले.

अदितदादांचा देहू दौरा रद्द

शिवसेनेच्या सदस्यांनी मतदान केल्यानंतर पक्ष कार्यालयात आमदारांशी काही मिनिटे बोलून मुख्यमंत्री ठाकरे दोन वाजता विधान भवनातून बाहेर पडले. तोपर्यंत २७५ आमदारांचे मतदान झाले होते. अजित पवार कोकाटेंची वाट पाहत होते. उरलेल्या दहा आमदारांमध्ये त्यांचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी दादा तळ ठोकून होते. त्यातच देहूहून तुकोबांची पालखी निघणार होती. अजितदादा तेथे उपस्थित राहणार होते. उशिर होत असल्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरने तेथे जाण्याचे ठरवले. मात्र, नंतर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर तेथे जाणार नसल्याचे लक्षत येताच अखेर त्यांनी आपला हा दौराच रद्द केला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, सुनील शेळके, खासदार श्रीरंग बारणे पालखी निघताना उपस्थित होते.

साडेतीन वाजता संपले मतदान

संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी तीन वाजेपर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले. त्याचदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने मतदान करण्यास परवानगी नाकारली. शिवसेनेचे एक सदस्य रमेश लटके यांचे निधन झाल्याने एकूण २८५ आमदार मतदान करणार होते. त्यामुळे सहा जणांचे मतदान बाकी होते. नंतरच्या काळात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, बविआचे तीन आमदार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी मतदान केले आणि साडेतीन वाजण्याच्या सुमाराला सर्व मतदान झाले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content