Tuesday, April 1, 2025
Homeकल्चर +आकाशवाणी संगीत संमेलनाला...

आकाशवाणी संगीत संमेलनाला पं. भीमसेन जोशींचे नाव!

आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना करण्यात येईल तसेच आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित ‘अभिवादन’ कार्यक्रमात ते बोलत होते.  ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संगीतातील अखेरचा शब्द असलेल्या पंडित भीमसेन जोशींनी अनेक तानसेन बनवलेच, परंतु त्याचबरोबर सर्वसामान्यांना कानसेनदेखील बनवले. संगीतामध्ये जीवनाला प्रेरणा देण्याची ताकद आहे. मोठमोठ्या मैफिली गाजवणारे पंडित भीमसेन जोशी मनाने अत्यंत कोमल होते आणि गरिबातल्या गरिबांसाठीदेखील त्यांनी आपल्या संगीताचा खजिना उपलब्ध करून दिला. परदेशातील मैफिलीमध्ये गाणारे पंडितजी पुण्यातील गणेशोत्सवात छोट्या छोट्या मैफिलींमध्येदेखील अत्यंत उत्कटतेने आणि आत्मीयतेने गायचे अशी आठवण प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितली.

अटलजींच्या काळात पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न दिल्याच्या आठवणींनादेखील जावडेकर यांनी यावेळी उजाळा दिला. हा संगीताचा सर्वोच्च सन्मान असून अशा कलाकारांच्या सन्मानामुळे देशाची मान उंचावते असे ते यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी बोलताना आकाशवाणीने संगीताला घरोघरी नेल्याची आठवण करून दिली आणि दूरदर्शन नसतानादेखील संगीत प्रसारणाची धुरा आकाशवाणीने समर्थपणे सांभाळली असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी संगीताच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी संगीताचे व्याकरण शुद्ध ठेवूनदेखील ते लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम केले असे प्रतिपादन केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘मोनोग्राम’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भीमसेनजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्या गायनाने समारंभाची शान वाढवली. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांच्या वादनाने या सत्राचा समारोप झाला. उद्या या कार्यक्रमाचा समारोप होईल.

Continue reading

‘मुंबई लोकल’ येत आहे ११ जुलैला!

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला "मुंबई लोकल" हा चित्रपट येत्या ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या...

भारती देसाई, गोपाळ लिंग सन्मानित

भारती देसाई, गोपाळ लिंग यांना "ओम् कबड्डी प्रबोधिनी"ने यंदाचे आपले पुरस्कार जाहीर केले. तेहरान, इराण येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्त्व करून सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सोनाली शिंगटेचादेखील यावेळी सन्मान करण्यात येईल. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ...

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...
Skip to content