एचआयव्ही / एड्सबाबत युवकांमध्ये खेळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे महाविद्यालयीन युवा वर्गासाठी ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात आली. युवकांमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाचा अजित यादव तर युवतींमध्ये झुनझुनवाला महाविद्यालयाची सोनी जैसवाल यांनी पहिला क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेतर्फे गोवा येथे होणाऱ्या ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था ही बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित संस्था आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको) मार्गदर्शक नियमावलीनुसार मुंबईमध्ये एचआयव्ही / एड्स नियंत्रणासाठी ही संस्था कार्यरत आहे. एचआयव्ही / एड्सबाबत जनजागृती करण्याकरीता या वर्षीही मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘रन फॉर एण्ड एड्स’ अंतर्गत वडाळा येथे काल (दिनांक १० सप्टेंबर २०२३) ‘एमडॅक्स रेड रन मॅरेथॉन स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत ५५० महाविद्यालयीन युवक-युवतींनी सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० स्वयंसेवक मॅरेथॉन मार्गावर कार्यरत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त तथा मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक रमाकांत बिरादार यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी उपायुक्त बिरादार यांच्या हस्ते MDACS HIV CARE या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर एचआयव्ही / एड्सबाबतची संपूर्ण माहिती, वैद्यकीय तपासणी, उपचार आदींबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच, या आजाराबाबतचे गैरसमजही दूर केले जाणार आहेत. उपायुक्त बिरादार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, युवकांनी युवा दूत बनून आपल्या महाविद्यालयांमध्ये, समाजामध्ये एचआयव्ही / एड्सबाबत जनजागृती करावी. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नवी दिल्ली) यांचेकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनेनुसार संपूर्ण मुंबईत महाविद्यालयीन युवकांकरीता व शालेय विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत युवकांमध्ये एचआयव्ही / एड्सबाबत जनजागृती करण्याकरीता पथनाट्य स्पर्धा, रिल मेकींग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांकरीता एचआयव्ही / एड्स या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा भरवण्याचे नियोजन आहे.

या स्पर्धेत युवक गटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सिद्धार्थ कॉलेजच्या अजित यादव याने प्रथम, सिद्धार्थ कॉलेजच्याच विष्णू यादव याने द्वितीय तर मालाड पश्चिम येथील प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेजच्या मुकेश यादव याने तृतीय क्रमांक पटकाविला. युवती गटामध्ये घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाच्या सोनी जैसवालने प्रथम, चेंबूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या मेघा खोत हिने द्वितीय तर गिरगाव चौपाटी येथील विल्सन महाविद्यालयाच्या समारा डिसोझा हिने तृतीय क्रमांक पटकाविला. बिरादार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, उपसंचालक (माहिती शिक्षण संपर्क) उमेश घुगे यावेळी उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्स्था (नॅको) मार्फत राष्ट्रीय पातळीवरील गोवा येथे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

