मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केल्याचे स्पष्ट झाले.
काल दुपारी एका नाट्यमय घटनेत अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे आठ इतर आमदारही उपस्थित होते. याच शपथविधीच्या वेळेला पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल तसेच सरचिटणीस सुनील तटकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची ही भूमिका नसल्याचे सांगत अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचे जाहीर केले. त्याच वेळेला या सर्व प्रकरणी आपण न्यायालय किंवा तत्सम यंत्रणेकडे जाण्याऐवजी जनतेमध्ये जाऊ, अशी घोषणाही केली. या घोषणेनुसारच त्यांनी आजपासून महाराष्ट्र ढवळून काढायला सुरुवातही केली. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होऊन ते लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी रवानाही झाले.
मात्र, काल दुपारनंतर शरद पवार यांचे सहकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा काढल्या. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी झालेले अनिल पाटील यांची मुख्य प्रतोदपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली. त्याचबरोबर आव्हाड यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून घोषितही करून टाकले. निवडणूक आयोगाकडेही यासंबंधी सर्व माहिती देण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वावरच विश्वास
आज दुपारी अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते विधानसभेचे अध्यक्ष निवडतात हे वास्तव समोर मांडले. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस देशपातळीवर तसेच राज्यपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीत काम करणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
सोबतच्या सर्व आमदारांचे हित अबाधित
आम्हा आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस काढण्याचा जयंत पाटील यांना अधिकारच नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आमच्यासोबत आहे. आमच्याबरोबर आलेल्या एकाही आमदाराला कायदेशीर किंवा घटनात्मकदृष्ट्या भविष्याला कोणताही धोका पोहोचणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील व जितेंद्र आव्हाडांविरोधात कारवाई
शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही बेरजेचे राजकारण करतो. त्यामुळे कुणाच्या हकालपट्टीचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी सांगितले. जयंत पाटील तसेच जितेंद्र आव्हाड या दोन सदस्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे, असेही ते म्हणाले.
सुनील तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष
त्याआधी प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची संघटनात्मक बाजू स्पष्ट केली. 21 जूनला झालेल्या पक्षाच्या अधिकृत मेळाव्यात आपली राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याआधी सप्टेंबर 2022मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात आपल्याला उपाध्यक्ष नेमण्यात आले होते. त्याचवेळी सर्व संघटनात्मक नियुक्त्या करण्याचे अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीच्या माध्यमातून मला देण्यात आले. याच अधिकाराचा वापर करत आपणच जयंत पाटील यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले. आज त्यांना या पदावरून आपण मुक्त करत आहोत. त्यांच्या जागी सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. कालच त्यांची आपण या पदावर नेमणूक केलेली आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाचा सर्व कारभार सुनील तटकरे यांच्याकडे तातडीने सोपवावा, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल यांनी जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी झालेली नेमणूक रद्द करत त्या जागी अनिल पाटील यांची पुन्हा नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे प्रदेश स्तरावरचे सर्व पदाधिकारी नेमण्याचे अधिकार सुनील तटकरे यांना देण्यात आल्याचे पटेल यांनी जाहीर केले.
शरद पवार निर्णय फिरवू शकत नाहीत
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत घेतलेली भूमिका आणि निर्णय आम्हाला लागू होत नाहीत. त्याचे कारण, हा निर्णय कार्यकारिणीने बहुमताने घेतलेला आहे. शरद पवार बहुमताने घेतलेला निर्णय फिरवू शकत नाहीत. पक्षांतर्गत वाद होऊ नये असा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील. कोणाची भूमिका योग्य आहे याचा अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.
रूपाली चाकणकर नव्या महिला प्रदेशाध्यक्षा
नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती जाहीर केली. पक्षाच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सूरज चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, सूरज चव्हाण, उमेश पाटील तसेच संजय तटकरे यांची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी घोषित केले. येत्या पाच तारखेला मुंबईत बांद्राच्या एमईटी शिक्षण संस्थेच्या सभागृहात पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल निलंबित
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांची पक्षविरोधी कारवायांबद्दल हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही लढाई आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारी जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
सर्व बाबी तपासूनच निर्णय
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या विविध सदस्यांकडून आपल्याकडे अनेक निवेदने आली आहेत, असे नमूद केले. या सर्व निवेदनांचा अभ्यास करून घटनात्मकदृष्ट्या योग्य असा निर्णय आपण घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

