Sunday, March 16, 2025
Homeमाय व्हॉईसऐसपैस गप्पा नीलमताईंशी:...

ऐसपैस गप्पा नीलमताईंशी: एक स्त्रीवादी नेतृत्त्वाचे आत्मकथन…     

विधानपरिषद, या ज्येष्ठांच्या सभागृहाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून संवाद साधत लेखिका करूणा गोखले यांनी महाराष्ट्रातील स्त्री चळवळ, महिलांचा राजकीय सहभाग, दलित चळवळ आणि दलितेतर, विविध राजकीय पक्ष आणि स्त्री नेतृत्त्वाला त्यात मिळणारी वा नाकारली जाणारी संधी, राजकारण्यांमधील साहित्यसृजन, फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी असा विस्तृत पट उभा केला आहे. ऐसपैस गप्पा या गप्पाच राहतील, त्याचा “गौरवग्रंथ” होऊ दिला जाणार नाही अशी भूमिका लेखिकेने पुस्तकाच्या प्रारंभीच मनोगत व्यक्त करताना मांडली आहे, जी पुस्तकाच्या अखेरपर्यंत कसोशीने जपलीदेखील आहे. त्यामुळे उपरोक्त विषयांसंदर्भातील गत चार दशकांचे महत्त्वाचे दुवे तपासून बघण्यासाठी ‘राजहंसं’चा हा नीरक्षीर ठेवा एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

स्त्रीवादी भूमिकेचा जागर…

अभ्यासात हुशार परंतु लहानपणीच सामाजिक भान प्राप्त झालेली वडिलांची लाडकी कन्या, वरळीतील वास्तव्य आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’तील अग्रलेखांचा प्रभाव, पोद्दार महाविद्यालयातून डॉक्टर होत वैद्यकीय व्यवसाय, संवेदनशील लेखिका आणि कवयित्री, पुढे ‘युक्रांद’मधील धडाडीचा सहभाग, विंदांच्या सुन्षा आणि लेखनाला त्यांची मिळणारी शाबासकी, ‘युक्रांद’मधून बाहेर पडत क्रांतीकारी महिला संघटनेची उभारणी, राजकीय मंच अपरिहार्य म्हणून जाणीवपूर्वक आणि प्रदीर्घ चिंतनानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाची त्यासाठी केलेली निवड, सरचिटणीसपदाची पेललेली जबाबदारी, ब्रह्मकुलोत्पन्न असूनही ‘भारिप’चे नेटाने केलेले कार्य, सोशल इंजिनिअरिंगचे ते तेव्हा ठरलेले वेगळे उदाहरण, मात्र अनेक कारणांमुळे भारिपचा राजीनामा, स्त्री आधार केंद्र, आंतरराष्ट्रीय महिला हक्क परिषदांमधील सक्रिय सहभाग, शिवसेनेच्या माध्यमातून सलग चार वेळा विधानपरिषद सदस्यत्व आणि सर्वसहमतीने दोन वेळा उपसभापती, अलिकडच्या नव्या राजकीय समीकरणात नवी भूमिका, लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यबुद्धीने नित्यनेमाने अहवाल सादर करण्याची शिस्त आणि हे सर्व करीत असताना स्त्रीवादी भूमिकेचा अष्टौप्रहर जागर…

करूणा गोखले यांनी वाचकांनाही या गप्पांमध्ये छान सहभागी करून घेतले आहे. राजकीय मंचावर नीलमताईंचे ‘डावी’कडून ‘उजवी’कडे झालेले स्थित्यंतर आणि त्याचवेळी नास्तिकतेकडून आस्तिकतेकडेही झालेला भावनिक प्रवास, तीर्थक्षेत्र विकासासाठीची त्यांची तळमळ या गप्पांच्या ओघातच आपल्याला कळते. भवताल बदलला, भूमिका बदलल्या मात्र त्यांचा स्थायीभाव, स्त्री अत्याचाराविरूद्धचे लढाऊ कार्यकर्तेपण मात्र अद्याप तसेच टणक आणि टिकाऊ राहिल्याचे वाचकांना जाणवते.

‘साथी सारे गाऊ एकसुरात’ऐवजी विसंवादाचे सूरच अनेकदा उमटत राहिले. पण कोरसचे रूपांतर कोलाहलात होणार नाही याची काळजी नीलमताईंनी घेत स्वतःतील स्वयंप्रेरित कार्यकर्तेपण कसे कायम ठेवले, त्याचाही हे पुस्तक म्हणजे एक लेखाजोखा आहे. या गप्पांमधून पुढे येणाऱ्या अनेकविध आठवणी महाराष्ट्रातील समकालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या आहेत. म्हणूनच त्या ‘डाव्या’ आणि ‘उजव्यां’नी दुर्लक्षित करून चालणार नाही.

नीलम

वरळीतील म्युनिसिपालटीच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या नीलमताईंनी पशुवैद्यकीय चिकित्सक असलेल्या आणि पुढे सिबागायगी कंपनीत संशोधक म्हणून उल्लेखनीय योगदान दिलेल्या आपल्या वडिलांकडून  सामाजिक प्रश्नांसंदर्भात संशोधन आणि चिकित्सकवृत्तीचा वारसा प्राप्त केल्याचे वाचकांच्या लक्षात येईल. म्युनिसिपालटीच्या शाळेतील शिक्षणामुळे वर्गात कष्टकरी-वंचित घटकांतील मुले-मुली असल्याने तसेच आई-वडिलांच्या वैचारिक खुलेपणाच्या संस्कारामुळे जात या सामाजिक बंधनाच्या चौकटीबाहेर आपण बालपणीच आल्याचे तसेच सर्वसमावेशीवृत्ती याच खुलेपणामुळे प्राप्त झाल्याचे त्या सांगतात. पुढे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जास्त बोलबाला झाल्याने गरीब-श्रीमंत मुलांमध्ये शालेय जीवनापासूनच एक भिंत तयार होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चिंतनशील आणि चिकित्सक स्वभावाला वाचनाची जोड मिळाल्याने एक संस्कारी स्त्री नेतृत्त्व कसे आकाराला येत गेले त्याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकात घडते. पंढरपूरला आजोबांच्या घरी असलेल्या कपाटांमधील पुस्तकांचा खजिना त्यांनी हट्टाने बालपणीच स्वत:साठी रिता करून घेतला होता.

महत्त्वपूर्ण निरीक्षणांची नोंद…

गोखले आणि गोऱ्हेंमधील या गप्पांमधून समाजकारणाच्यादृष्टीने काही महत्त्वाची निरीक्षणे आणि नोंदी पुढे येतात. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात समाजकारण आणि राजकारण यात योगदान देण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरूण-तरूणी फुलटाइमर म्हणून पुढे आल्या. त्यांचे विवाह झाल्यावर पुरूषाने समाजकारण-राजकारणाची आघाडी सांभाळायची आणि उच्चशिक्षित असल्याने स्त्रीने नोकरी पत्करून कुटुंबाची आघाडी सांभाळायची. यामुळे अनेक स्त्रियांमध्ये नेतृत्त्वक्षमता असूनही त्या पुन्हा त्याच चौकटीत जखडल्या गेल्या, अशी खंत नीलमताईंनी व्यक्त केली आहे.

दलित चळवळ, दलित समाज आणि दलित नेतृत्त्व यासंदर्भात त्या म्हणतात- “राजकीयदृष्ट्या दलित समाज नेहमीच फार मोठ्या कोंडीत सापडलेला होता. त्याच्यापुढे संभ्रम असा होता की, आपण सर्वसमावेशक अशा मेन स्ट्रीम पक्षाचे कार्यकर्ते होऊन, यथावकाश त्याचं नेतृत्त्व काबीज करून स्वत:च्या समाजाचे प्रश्न सोडवायचे की प्रामुख्यानं दलित समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटनांद्वारे राजकारण करून, त्यांच्यामार्फत सत्ताबदल होईल अशी आशा धरून स्वत:ला डेडिकेट करायचं? अशा संघटनांचं काम करत करत बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार शासनकर्ती जमात व्हायचं का? नक्की कोणता मार्ग पकडायचा? हे फार मोठं द्वंद्व आहे त्यांच्यापुढे. त्यामुळे विचारवंत कधीकधी सर्व संघटना एकाच तराजूत तोलतात, ते बरोबर नाही.”

मिश्किल प्रसंग…

स्त्री हक्कांसाठी नेहेमीच लढाऊ पवित्र्यात असलेल्या नीमलताई स्वभावाने मात्र तितक्याच मिष्किलदेखील आहेत. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना रटाळ विषय त्याच पद्धतीने शिकविणाऱ्या प्राध्यापिका वर्गावर यायला निघाल्या की त्याची वर्दी अगोदरच एका विशिष्ट ठिकाणी लपून द्यायची जेणेकरून त्या तासाला सर्वांना दांडी मारणे सोयीचे होईल, अशी ‘नेतागिरी’ची जबाबदारीही त्या पार पाडत होत्या. मात्र एकदा तशी वर्दी इतरांना देताना त्या कशा पकडल्या गेल्या, हा आणि असे अनेक किस्सेही आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील विनोदाला आपण दाद द्यायची नाही असा निग्रह व्यक्त करणाऱ्या नीलमताई सतत वैचारिक वाचनाचा कंटाळा आल्याने रूचीपालट म्हणून एका प्रवासात सुनीताबाईंना ‘उपदेशपांडे’ म्हणणाऱ्या ‘पुलं’चे ‘तुम्हाला कोण व्हायचंय… पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर…?’ ऐकून प्रफुल्लित झाल्याचे सांगतात… मंत्री आस्थापनेवरील स्टाफचे नको ते उद्योग हा नेहमीच टिकेचा विषय ठरत असतो. नीलमताई या चळवळीतून पुढे येत सत्तापदावर आल्याने त्यांचा चळवळीतील कार्यकर्त्यांप्रमाणे स्टाफदेखील प्रामाणिक आणि बांधिलकी जपणारा असेल, असा समज होता. या श्रद्धेला तडे देणाऱ्या आणि उद्विग्न करणाऱ्या प्रसंगांना त्यांना कसे सामोरे जावे लागले याचा एक नमुनादेखील आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो.

पुस्तकातील विभाजकांसाठी निवडण्यात आलेले विषय आणि छायाचित्रे यांची आकर्षक मांडणी यामुळे ते नुसते चाळायला म्हणून हाती घेतले तरी निम्मेअधिक वाचून होते.

१) जडणघडण २) प्रसंगी अखंडित वाचीत जावे ३) दिसामाजी काही तरी लिहावे ४) देव, धर्म आणि समाजकारण ५) दलित चळवळ आणि दलितेतर समाज ६) नेते आणि कार्यकर्ते ७) विरोध आणि कार्यपूर्ती ८) आपत्ती व्यवस्थापन ९) समारोप १०) जाता जाता अशी पुस्तकाची विभागणी असून कोणतेही पान उलगडून आपण या दोघींमधील गप्पांचा वाचनानंद घेऊ शकतो.

कम्युनिस्टांचा मोर्चा, जनसंघीयांची पूजाअर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा अन् काँग्रेसलाच सत्तेच्या खुर्च्या असा तो जमाना होता… नीलमताईंच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजवाद्यांचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या चर्चा आणि वितंडवादाच्या गुंतवळ्यात फारसे न अडकता कृतीशीलतेला त्यांनी सतत दिलेले प्राधान्य हे होय. बाबासाहेबांच्या समग्र लेखनातील चिंतनशीलता आणि भगवद्गीतेतील कर्मयोग यांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे त्या या गप्पांमध्ये सांगतात.

आता प्रतिक्षा कादंबरीची…

मार्क्सप्रणित रशियन राज्यक्रांतीच्या अगोदरचे समाजवादी समाजरचनेचे आद्य आविष्करण म्हणजे ‘पॅरिस कम्युन’ (सन १८७१)! राशीन येथील ‘कम्युन’मध्ये नीलमताईंनी वास्तव्य केले हाते. दहा किलोमीटर पायपीट करीत ‘रोहयो’च्या कामांना भेटी दिल्या. अनुभवाला थेट भिडणारा, अत्याचाराची घटना जेथे घडली असेल… तेथे प्रत्यक्ष जाऊन धडकण्याचा त्यांचा स्वभाव आणि त्यानुषंगिक निवेदन नव्या पिढीतील सर्वक्षेत्रीय कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. राशीन ते राजभवनातील या पुस्तकाचे प्रकाशन हा संदर्भपट फार मोठा परंतु आपल्या संसदीय लोकशाहीच्या वाटचालीच्यादृष्टीने तितकाच आश्वासक आहे…

या ऐसपैस गप्पांचा पट विस्तृत असला तरी त्याचा केंद्रबिंदू अर्थातच स्त्रीवादी नेतृत्त्वाची स्त्रीवादी भूमिका हाच राहिला असल्याने गोदूताई परूळेकर, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी, प्रमिला दंडवते या तत्कालीन ज्येष्ठ पिढीतील रणरागिणींचाही आणखी परामर्ष गप्पांच्या ओघात येणे उचित ठरले असते. प्रकाशन सोहोळ्यात प्रा. सदानंद मोरे यांनी आता नीलमताईंनी कादंबरी लिहायला घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली ती अतिशय रास्त आहे. त्यांचे समृद्ध असे राजकीय-सामाजिक अनुभवविश्व आणि संवेदनशील मन यांनी आता सशक्त व्यक्तिरेखांचा नव्याने शोध घ्यावा, यासाठी शुभेच्छा…

(लेखक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

Continue reading

Skip to content