अॅड. अहमदखान पठाण यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. बार कॉन्सिलच्या मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अॅड. पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अॅड. पठाण हे बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, या वकिलाच्या शिखर परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. यापूर्वी तीन वेळा त्यांनी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यपदीही ते तीन वेळा निवडून आले आहेत. ते वक्फ मंडळाचे विद्यमान सदस्यही आहेत.
त्यांच्या अध्यक्षपदावरील निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पदाला न्याय देऊन वकिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी प्रतिक्रिया पठाण यांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केली आहे. विधि क्षेत्रातील एक नामवंत शिक्षक म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विधि क्षेत्रात वकील आणि न्यायाधीशपदावर कार्यरत आहेत. अॅड. पठाण पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील बादशहा तलाव येथील आहेत. कुटुंबातील पहिले वकील असलेल्या पठाण यांनी स्वःकर्तृत्वाने हे यश संपादन करून नवीन पिढीसाठी आदर्श निर्माण केला आहे.

